मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
‘शिवतीर्थावरील दसरा मेळावा’ ही ठाकरेंची प्रबोधनाची परंपरा गेली ५९ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि ठाकरेंचे हे प्रबोधन असेच भविष्यातही महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवत राहील, याबाबत सर्वसामान्यांना खात्री आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत काही विशिष्ट सोहळे केवळ पक्षीय कार्यक्रम म्हणून न राहता समाजजीवनावर छाप उमटवतात. त्यापैकी शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा सर्वात महत्त्वाचा. १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आरंभ केलेला हा मेळावा २०२५ पर्यंत सलगपणे पार पडत आला असून, याच व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या राजकीय दिशा आणि प्रवाह निश्चित झालेले दिसतात. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...” या गर्जनेने सुरू होणारे ठाकरेंचे भाषण हे लाखो हिंदुस्थानी मनाचा ठाव घेत आले आहे. ठाकरेंची ही प्रबोधनाची परंपरा गेली ५९ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि ठाकरेंचे हे प्रबोधन असेच भविष्यातही महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवत राहील, याबाबत सर्वसामान्यांना खात्री आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) मैदानावर भरला होता. तो दिवस आणि तो मेळावा शिवसेना तसेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यानंतर फक्त चार महिन्यांत पहिला दसरा मेळावा भरवण्यात आला. व्यासपीठावरून बाळासाहेबांनी आपले वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या लढाऊ विचारांना उजाळा दिला. “मराठी माणसाने उभं रहायला हवं, स्वतःच्या हक्कासाठी लढायला हवं” हा संदेश त्यांनी दिला. त्या पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांनी “मुंबईत मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे” हा मुद्दा सर्वात ठळकपणे मांडला. यामुळेच पुढे शिवसेनेचा “मराठी माणसाचा हक्क” हा मुख्य धागा ठरला. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंग, कार्टूनधर्मी मांडणी, थेट भाष्य करणारी शैली या पहिल्याच मेळाव्यात प्रकट झाली. त्यांच्या उपरोधिक वाक्यांनी आणि थेट टोमण्यांनी श्रोत्यांवर छाप पाडली. हजारोंच्या संख्येने लोक शिवतीर्थावर जमले होते. मुंबईत मराठी माणसाचे स्थान आणि भविष्य याबाबतची अस्वस्थता त्या गर्दीतून स्पष्ट दिसत होती. या पहिल्या मेळाव्यामुळे शिवसेनेच्या राजकीय प्रवासाची औपचारिक सुरुवात झाली. ‘दसरा मेळावा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन’ ही परंपरा त्याच दिवशी निर्माण झाली. हा फक्त पक्षाचा मेळावा नव्हता, तर मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा आवाज होता. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला जे महत्त्वाचे स्थान मिळाले त्याची बीजे इथे रोवली गेली. हा पहिला मेळावा म्हणजे एका नव्या राजकीय शक्तीचा जन्म होता. बाळासाहेबांच्या विचारांची, नेतृत्वशैलीची आणि मराठी अस्मितेच्या आंदोलनाची ही सुरुवात होती. पहिल्या मेळाव्याने मराठी युवकांना रोजगार आणि न्याय मिळावा, मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी राहावी, अशा ठाम मागण्यांचा आवाज दिला. ७०-८०च्या दशकात या व्यासपीठावरून काँग्रेस, डावे विचार व बाहेरून आलेल्या मजुरांविरोधात रोखठोक भाष्य झाले. “मराठी माणूस” हा त्याकाळचा केंद्रबिंदू ठरला. १९९०नंतर शिवसेना-भाजप युती तसेच राममंदिर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा राष्ट्रीय स्तरावर झळकला. “गर्वसे कहो हम हिंदू है” हा घोष या व्यासपीठावरून दुमदुमला. १९९५मध्ये युती सरकार स्थापल्यानंतर हा मेळावा सत्ता आणि जबाबदारी यांचा अहवाल देणारा कार्यक्रम ठरला. शेवटच्या दशकात बाळासाहेबांची तब्येत ढासळली. तरीही भ्रष्टाचारविरोधी इशारे, मत न विकण्याचा आदेश आणि हिंदुत्वाशी प्रामाणिक राहण्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला. २०१२ मध्ये बाळासाहेबांचा काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वीचा अखेरचा मेळावा भावनिक ठरला; रेकॉर्डेड संदेशातून ‘उद्धव आणि आदित्यची काळजी घ्या’ अशी हाक देत त्यांनी एक युग संपवले.
उद्धव ठाकरे यांनी चालवला पुढे वारसा
दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवला आणि अव्याहतपणे पुढे नेत असंख्य संकटांवर मात करत संघर्षरत ठेवला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला. उद्धव ठाकरे यांनी भाषणाची आक्रमक शैली बदलून विचारपूर्वक आणि सौम्य, पण ठाम पद्धतीने विरोधकांना आवाज दिला आणि शिवसैनिकांना शिवसेनेचा वैचारिक वारसा आपल्याकडेच आहे हे दाखवून दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वस्त जेवण योजना, वीजमाफी अशी जनकल्याणकारी आश्वासने, तसेच भाजपच्या हिंदुत्वाच्या मक्तेदारीवर प्रखर टीका हे त्यांच्या भाषणांचे प्रमुख मुद्दे राहिले. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यांतील भाषणे ही केवळ राजकीय प्रहार नव्हेत, तर विचारधारेचा प्रवास आहेत. हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी जपली, पण तिला सर्वसमावेशकतेची चौकट दिली. त्यामुळे आज त्यांच्या भाषणांमधून एक वेगळा संदेश घुमतो “हिंदुत्व हे द्वेषाचे नाही, तर समतेचे आणि माणुसकीचे प्रतीक आहे.” त्यांच्या भाषणांतून दोन स्पष्ट धागे दिसतात. हिंदुत्वाचे सातत्य आणि सर्वसमावेशकतेकडे झुकलेला दृष्टिकोन. २०१५ च्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आणि समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. हे स्पष्टपणे बाळासाहेबांच्या परंपरेशी जोडलेले हिंदुत्व होते. पण याचबरोबर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सामान्य जनतेच्या समस्या, महागाई, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांना देखील अग्रक्रम दिला. यामुळे हिंदुत्वाचा विषय धार्मिक चौकटीत न अडकता सामाजिक, आर्थिक अंगानेही पुढे आला. २०१९ मध्ये त्यांनी दहा रुपयांत थाळी, आरोग्यसेवा, वीजदर कपात असे लोकजीवनाशी निगडित प्रस्ताव मांडले. यामागे विचार स्पष्ट होता - हिंदुत्व हे केवळ धार्मिक घोषणेत न राहता जनतेच्या पोटापाण्याशी जोडले पाहिजे. याच काळात त्यांनी राम मंदिराचा कायदा आणण्याची मागणीही केली, म्हणजे परंपरा आणि वर्तमानकाळातील जनहित या दोन्हीचा संगम साधण्याचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर २०२०च्या मेळाव्यात त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या अधिक सर्वसमावेशक केली, “आमचे हिंदुत्व म्हणजे केवळ घंटा बडवणारे नाही, तर हृदयात राम आणि प्रत्येक हाताला काम हा हिंदुत्वाचा मार्ग आहे.” असे सांगत त्यांनी धार्मिक कट्टरतेपेक्षा लोककल्याणाचा आधार घेतला. याचवेळी केंद्रातील भाजप सरकारवर कठोर टीका करून त्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली होणाऱ्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२२मध्ये शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव यांचे भाषण अधिक धारदार झाले. “रोजगार गुजरातला जातोय, महाराष्ट्र मागे पडतोय.” असे सांगत त्यांनी केंद्रावर आणि भाजपवर थेट हल्ले केले. “माझ्या पक्षाचे काय होणार?” या प्रश्नाला त्यांनी उत्तर कामातून दिले आणि “विश्वासघातकींचे काय होणार?” हा प्रश्न विचारून गद्दारांच्या त्या काळातील राजकीय संकटाचे भवितव्य दाखवून दिले. त्यांच्यासाठी हिंदुत्व म्हणजे जमिनीशी, माणसांशी, समस्यांशी नाळ जोडणारी विचारसरणी. या सर्व वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांतून एक स्पष्ट प्रवास दिसतो तो म्हणजे बाळासाहेबांच्या आक्रमक हिंदुत्वापासून सर्वसमावेशक हिंदुत्वापर्यंत. यात सातत्य आहे, कारण हिंदुत्व हा धागा कधी तुटलेला नाही.
२०१९नंतरच्या राजकीय उलथापालथीत आणि शिंदे गटाच्या बंडानंतर या ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. कोविडकाळात मेळावा व्हर्च्युअल पद्धतीने झाला. २०२२ पासून शिंदे गटाच्या बंडामुळे दोन स्वतंत्र मेळावे दिसू लागले. पण शिवतीर्थावरील परंपरा ठाकरेंचीच हे अनेकदा सिद्ध झाले. शिंदेंना कधी बीकेसी तर कधी आझाद मैदानावर धाव घ्यावी लागली. पण ठाकरेंची वैचारिक बैठक बाळासाहेबांच्या रिकाम्या खुर्चीने कशी साध्य होणार? त्यामुळे ठाकरेंची शिवसेना जरी भाजपने कटकारस्थान करून शिंदेंकडे सोपवली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नावाने शिवसेना पुन्हा जिवंत केली आणि घडवली वाढवली. ठाकरेंचे कर्तृत्व म्हणतात ते यालाच. म्हणूनच शिवसेना म्हटल्यावर केवळ आणि केवळ ठाकरे एवढेच नाव समोर येते आणि मराठी माणसाच्या हिंदू माणसाच्या हृदयावर ते कायमस्वरूपी कोरले गेले आहे, तसेच दसरा मेळावा म्हटले की, तो शिवतीर्थावरील ठाकरेंचाच मेळावा हे देखील अलिखित सत्याचा एक भाग झालेले आहे. शिवसेनेसमोर गेल्या ५९ वर्षांत अनेक संकटं आली आणि गेली.
काळ पुढे सरकत राहिला. मात्र शिवसेना तशीच राहिली. ही परंपरा अशीच पुढे सुरू आहे आणि राहणार आहे. शिवाजी पार्क मैदानालाही जणू दरवर्षी दसरा जवळ आला की, आस लागते ती ठाकरेंच्या त्या गर्जना ऐकण्याची... जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...हे ऐकण्याची...
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष