खरेदीचा पूर की पर्यावरणपूरक खरेदी?

खरेदी करताना पहिला प्रश्न स्वत:लाच विचारावा की, ही खरेदी, ही वस्तू ही माझी गरज (नीड) आहे की इच्छा, हाव (ग्रीड)? येणाऱ्या सणांच्या उत्सवांमध्ये मार्केटमध्ये उत्पादनांची भाऊगर्दी होईल.
खरेदीचा पूर की पर्यावरणपूरक खरेदी?

- नेहा जोशी

ग्राहकमंच

आई, तू आमच्यासाठी काही करू नकोस. मी माझ्या मैत्रिणींसाठी पिझ्झा हट मधून पिझ्झा ऑर्डर करते. आज बुधवार आहे. त्यांची 'बोगो' (BOGO) ऑफर आहे." माझ्या लेकीच्या ह्या वक्तव्याने मी जरा चक्रावलेच. सावरून तिला विचारले, "हे ‘बोगो’ म्हणजे काय ग?" "मीन्स बाय वन गेट वन (buy one get one) फ्री" इति कन्यारत्न! माझे विचारचक्र सुरु झाले. ह्या मुली खाणार चिमणी एव्हढे. पण एकावर एक फ्री म्हणून गरजेपेक्षा जास्त मागवणार आणि उरलेले वाया जाणार. अन्न तर वायाच वर पैशाचाही अपव्यय ! विचार करता करता अनेक ‘बोगो’ ऑफर्स माझ्या नजरेसमोरून तरळून गेल्या. एकावर एक साडी फ्री, एकावर एक साबण फ्री, उन्हाळ्यात एकावर एक आईस्क्रीम फ्री, एकावर एक शीतपेयं फ्री ! हे म्हणजे ‘फ्री फ्री फ्री’चा धबधबा. याचा आणखी प्रकार म्हणजे अमुक एक रुपयांची खरेदी करा, मग डिलिव्हरी फ्री किंवा काही रुपयांची सूट मिळेल. आता काही दिवसातच श्रावण सुरु होईल आणि अनेक सण येतील. तेव्हा गिफ्ट हॅम्पर्सच्या ऑफर्सचा अगदी महापूर येईल.

काहीतरी फ्री आहे असे वाटले की, आपण सहजच खरेदी करण्यास प्रवृत्त होतो. मुळात खरेदी आणि त्यातून मिळणारा आनंद ह्याचे अतूट नाते आहे. परंतु तो आनंद शाश्वत आहे का ? हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या फ्रीच्या नादात आपण गरज नसताना अधिकाच्या वस्तू खरेदी करतो आणि कळत-नकळत पर्यावरणाला हानी पोहोचवतो. कुठल्याही वस्तूचे उत्पादिन करताना त्यासाठी अनेक नैसर्गिक संसाधने वापरली जातात. उदाहरणार्थ, आपण एखादे गिफ्ट हॅम्पर खरेदी केले तर त्यात पॅकेजिंगसाठी कितीतरी जास्त प्रमाणात कागद वापरलेला असतो. म्हणजेच हा कागद निर्माण करताना किती झाडे तोडली गेली आणि त्यामुळे पर्यावरणाचा किती ऱ्हास झाला, याचा विचारही आपण करत नाही. खरे पाहता आपण जर विचारपूर्वक पर्यावरणस्नेही खरेदी केली तर आपण हा ऱ्हास थोड्याफार प्रमाणात रोखू शकतो.

नीड का ग्रीड?

खरेदी करताना पहिला प्रश्न स्वत:लाच विचारावा की, ही खरेदी, ही वस्तू ही माझी गरज (नीड) आहे की इच्छा, हाव (ग्रीड)? येणाऱ्या सणांच्या उत्सवांमध्ये मार्केटमध्ये उत्पादनांची भाऊगर्दी होईल. त्यावेळी कितीही प्रलोभने असली तरी वरील प्रश्नामुळे अतिरिक्त खरेदी होणार नाही. खरेदी करताना कापडी पिशवीचाच वापर करू, असाही नियम करावा.

खोटे दावे ओळखा

खरेदी करताना काहीवेळा ते उत्पादन पर्यावरणस्नेही आहे असे वाटून आपण खरेदी करतो. पण खरे तर ती वस्तू उत्पादित करताना त्याचा केवळ १०% भागच किंवा केवळ त्याचे वरील आवरणच पर्यावरणस्नेही असते. अर्थात कोणत्याही अशा जाहिरातीतील दाव्यांना न भुलता पूर्ण माहिती घेऊन मगच खरेदी करावी.

फ्री डिलिव्हरी आणि वाहतूक खर्च

अनेक वेळा आपण जाहिरातीत दिलेल्या सामाजिक संदेशांना भुलतो. उदाहरणार्थ 'कुछ मीठा हो जाये', 'अपनो को करीब लाये', 'डिलिव्हर द लव्ह' अशा घोषवाक्यांनी (टॅगलाईन्स) चालवलेल्या जाहिरातींचे उत्सवकाळात तर पेव फुटते. त्या आनंदी जल्लोषात आपणही खरेदी करून मोकळे होतो. पण फ्री डिलिव्हरीच्या मोहजालात अडकताना त्यामुळे होणारा इंधनाचा अपव्यय हा विचार बाजूला पडतो. त्यापेक्षा एखाद्या स्थानिक उत्पादकाकडून वस्तू घेतली तर ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो. शिवाय काही तक्रार उदभवलीच तर त्याचे तत्काळ निवारण होऊ शकते .

अतिरिक्त खरेदी-अतिरिक्त कचरा

खाद्य वस्तूंची अतिरिक्त खरेदी झाली तर त्या खराब होऊन वाया जातात. त्यामुळे कितीतरी प्रमाणात आपण कचरा निर्माण करतो. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न परत पर्यावरण दूषित करतो.

होम मेड वस्तू वाढवा

आपली उत्सवातील खरेदी अधिकाधिक पर्यावरणस्नेही होण्यासाठी आपल्याला घराघरातील बाल ग्राहक मदत करू शकतात. त्यांच्या मदतीने आपण कापडाच्या, झाडांच्या बिया वापरून राख्या बनवू शकतो. खाऊ बनवताना काही पारंपरिक पाककृतींना उजाळा देऊ शकतो. घरच्या घरीच कमीत कमी साहित्यात गिफ्ट हॅम्पर बनवू शकतो. जाहिरातीतील सामाजिक संदेश घ्यायला काहीच हरकत नाही. पण तो संदेश लक्षात घेऊन काही सामाजिक संस्थांना भेट देता येईल. बाबूंच्या राख्या, दिवाळीत बाबूंचे आकाशकंदील किंवा भेटवस्तू म्हणून वेतापासून बनविलेले दागिने देखील घेऊ शकतो. गणपती उत्सवात स्वहस्ते बनवलेली मूर्ती आणि सजावट करावयास काहीच हरकत नाही. दिवाळीत फटाके उडविण्यापेक्षा किल्ले, भेटकार्ड स्वतः बनवू शकतो.

आवश्यक वस्तूंची यादी करा

'ओनिओमानिया' म्हणजे 'खरेदीचे व्यसन' ही समस्या जगभरात उग्र रूप धारण करत आहे. त्याचे मूळ कारण खरेदी केली की काही जणांना 'फील गुड' वाटते आणि नैराश्य दूर झाल्यासारखे भासते. पण ते तात्कालिक असते. कालांतराने परत खरेदी केली जाते. ह्यावर उत्तर म्हणजे शाश्वत जीवनशैलीचा अवलंब. उदाहरणार्थ, येणाऱ्या सणांसाठी स्वहस्ते भेटवस्तू बनविता येईल, सजावट आपणच केली तर सृजनशीलतेचा आनंदही मिळेल. ह्यावरील अजून एक पर्याय म्हणजे खरंच गरज आहे अशा वस्तूंची यादी बनविणे आणि मगच खरेदी करणे. मला अभिमानाने सांगावयास आवडेल की अशी यादीची यंत्रणा मुंबई ग्राहक पंचायत गेली ५० वर्षे राबवत आहे.

सजग ग्राहक म्हणून खरेदी करताना पर्यावरणाचा समतोल सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे 'उतणार नाही, मातणार नाही- घेतला वसा (पर्यावरण सरंक्षणाचा) टाकणार नाही' हे तत्त्व अवलंबिलेले बरे नाही का!

मुंबई ग्राहक पंचायत

Email : mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in