मारू नये सर्प संताचिया दृष्टी

सापांविषयी समाजात अंधश्रद्धांमुळे भीती आहे. भारतात फक्त चारच विषारी असूनही अनेक साप मारले जातात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळीच दवाखान्यात नेणे अत्यंत आवश्यक असते. त्यावर कोणतेही अंगारे-दुपारे न करता 'प्रति-सर्पविष' हे औषधच एकमेव उपाय आहे.
मारू नये सर्प संताचिया दृष्टी
photo : canva
Published on

भ्रम-विभ्रम

ज्ञानेश्वर गिराम

सापांविषयी समाजात अंधश्रद्धांमुळे भीती आहे. भारतात फक्त चारच विषारी असूनही अनेक साप मारले जातात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळीच दवाखान्यात नेणे अत्यंत आवश्यक असते. त्यावर कोणतेही अंगारे-दुपारे न करता 'प्रति-सर्पविष' हे औषधच एकमेव उपाय आहे.

साप म्हटले की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते. 'साप' हा शब्द जरी उच्चारला, तरीसुद्धा लगेच आपण 'अरे बाप रे..!' असे म्हणतो, कारण प्रत्येकाच्या मनात सापाबद्दल भीती आहे. प्रत्येकाला असं वाटतं की, सर्पदंश झाला म्हणजे आपण मरणारच! कारण सापाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा गैरसमज आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे सापाबद्दल असलेले अज्ञान. आणि या अज्ञानामुळेच आज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरामध्ये अनेक साप मारले जातात.

आपण महाराष्ट्रापुरता विचार केला, तर जवळपास ५४ प्रकारचे साप आढळतात. त्यापैकी फक्त चारच साप हे विषारी आहेत. त्यामध्ये ज्यांना आपण 'बिग फोर' असे म्हणतो, त्यात नाग, मण्यार, फुरसे आणि होनस या सापांचा समावेश होतो. या विषारी सापांचा दंश झाला तर मरण येतेच असे नाही, कारण प्रत्येक वेळी त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती आणि त्याला तात्काळ मिळालेला प्रथमोपचार हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

सर्पमित्र म्हणून गेल्या २० वर्षांचा माझा अनुभव सांगतो की, बहुतेक साप हे अज्ञानामुळेच मारले जातात. आणि ज्या व्यक्तीला सर्पदंश होतो, त्याला योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे ती व्यक्ती दगावते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळीच दवाखान्यात नेणे अत्यंत आवश्यक असते. त्यावर कोणतेही अंगारे-दुपारे न करता 'प्रति-सर्पविष' हे औषधच एकमेव उपाय आहे. परंतु अनेक वेळा काही कारणामुळे दवाखान्यात जाण्यास उशीर होतो आणि काही अघोरी उपचार केल्यामुळे सुद्धा सर्पदंश झालेली व्यक्ती दगावते. अशावेळी काहीच करू न शकल्याची खंत वाटते.

बऱ्याच वेळेस सर्पमित्र आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून साप वाचवतात. परंतु अनावधानाने काही चुका त्यांच्याकडून होतात आणि त्यांना देखील सर्पदंश होतो, कारण चुकीला माफी नसते. अशा वेळी त्यांनाही तात्काळ दवाखान्यात नेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा हे सर्व मित्र साप पकडल्यानंतर जेव्हा तो निसर्ग अधिवासात सोडतात, तेव्हा अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. काही नवशिके सर्पमित्र साप निसर्ग अधिवासात सोडताना त्याचे छायाचित्रण करतात किंवा त्याला हाताळण्याच्या नादात सर्पदंश होतो आणि ते आपल्या जीवाशी खेळतात. असे अनेक प्रकार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवले आहेत. त्यामुळे सर्पमित्रांनी देखील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. साप पकडल्यानंतर तात्काळ त्याला निसर्ग अधिवासात सोडणे अत्यंत गरजेचे आहे.

माझा अनुभव सांगतो की, आम्ही ज्या वेळेस साप पकडण्यासाठी एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा त्या सापाला संबंधित व्यक्तीने आधीच जखमी केलेले असते किंवा त्याच्याशी छेडछाड केलेली असते. त्यामुळे तो चवताळलेला असतो. सर्पमित्राने प्रथम खात्री करून घेणे आवश्यक असते की सापाला काही जखम तर नाही ना? किंवा तो चवताळलेला तर नाही ना? तो कोणत्या जातीचा आहे, याची ओळख करून त्याला सुरक्षितपणे पकडणे आवश्यक असते. सापही वाचला पाहिजे आणि सर्पमित्र देखील वाचला पाहिजे. हेच खरे कौशल्य! कधी कधी घाईगडबडीत अनेक घटना घडल्याचे आपण ऐकतो. लोकांच्या मनात सापाबद्दल अनेक गैरसमज आहेत. जसे की: साप डूख धरतो? साप चावल्यास कडूलिंबाचा पाला किंवा मिरची खायला द्यावी? साप उलटल्याशिवाय विषबाधा होत नाही? सापाचे विष मंत्राने उतरते? कोंबडीचा गुद्दार सर्पदंशाच्या जागी लावल्याने विष उतरते? दोन सापांपैकी एक मारल्यास दुसरा बदला घेतो? साप धनाचे रक्षण करतो; त्याच्या डोक्यावर दिवा असतो; केस असतात? नागाच्या पूजेने तो प्रसन्न होतो? नागाला नागमणी असतो; साप दूध पितो? साप मुंगसाला चावल्यास त्याच्यातील अमृताने विष मरते? साप माणसांना एकटक बघतो; अति वेगाने पळतो? रात्री शिट्टी वाजवल्यास साप घरात येतो? मांडूळ सापाला हाडे नसतात; काळ्या जादूसाठी वापर होतो? धामण जनावराच्या पायाला विळखा घालून दूध पितो? धामण व म्हशीची नजरानजर झाल्यास म्हैस मरते? धामण सापाने शेपटी मारल्यास नपुंसकत्व येते? सापाची कात विषारी असते? रॉकेलने साप जिवंत होतो? साप मारल्यास त्याच्या रक्तातून साप निर्माण होतो? केवडा व रातराणी यांचा सुगंध सापांना आवडतो? हरणटोळ साप टाळू फोडतो? अजगर भक्ष श्वासाने ओढून झाडाला विळखा घालतो? सर्पमित्र साप विकतात, विष विकतात, सापांचे दांत काढतात? कोणीही साप पकडू शकतो? अशा सर्व समज-गैरसमजांचे आम्हाला वेळोवेळी निरसन करावे लागते. तरीही लोक ऐकत नाहीत. ते त्यांच्या मतावर ठाम असतात. अशावेळी आम्हाला अनेक उदाहरणे देऊन त्यांना समजावावे लागते. या सर्वांना कारणीभूत आहे – आपली चित्रपटसृष्टी आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक प्रकारच्या कथा – ज्यातून सापांबद्दल भीती निर्माण झालेली आहे.

गेल्या वीस वर्षांत मी अनेक सापांना जीवदान दिले आहे. विशेष बाब म्हणजे, मला आजवर कोणत्याही विषारी सापाचा सर्पदंश झालेला नाही. पण बरेच सर्पमित्र सांगतात की त्यांना विषारी सापांचा किमान दोन-चार वेळा दंश झाला आहे, आणि ते त्याचा मोठेपणा मिरवतात. आपल्याला सापही वाचवायचे आहेत आणि सर्पमित्र देखील. यासाठी विविध साधनांचा वापर सर्पमित्रांनी आवश्यकपणे करायलाच हवा. यामध्ये कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी नागपंचमीच्या एक आठवडा आधी 'सर्प प्रबोधन यात्रा' हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांतर्गत आजवर जवळपास ५० हजार विद्यार्थी आणि १००० शिक्षकांना लाभ देण्यात आलेला आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन पोस्टर आणि चित्रांद्वारे हे प्रबोधन केले जाते. शाळा, कॉलेज तसेच शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांनाही या कार्यक्रमाचा फायदा झाला आहे. यामुळे साप आणि माणूस दोघांचेही प्राण वाचले आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की, तरुण सर्पमित्रांनी कोणतीही स्टंटबाजी न करता सापांना सुरक्षितपणे पकडून निसर्ग अधिवासात मुक्त करावे व पर्यावरण रक्षण करावे. तरच खऱ्या अर्थाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत पाचशे वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे; 'मारू नये सर्प संताचिया दृष्टी' ही गोष्ट व्यापकपणे सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही.

सर्पमित्र व अंनिस कार्यकर्ते

logo
marathi.freepressjournal.in