मग तुम्ही कुणापैकी ?

भारतातले सर्व प्रश्न केवळ जाती धर्मानं निर्माण केले आहेत.
मग तुम्ही कुणापैकी ?

परवा बुटाच्या तळाचे सोल उचकटले. मी मग रस्त्यावर बसलेल्या जुने चप्पलदुरुस्ती करणाऱ्या व पॉलिश करणाऱ्या इसमाकडे गेलो. गडी म्हातारपणाकडे झुकलेला. तरीबी काम करणारा होता. मी त्याला बूट दिले. तो म्हणाला, “बूट शिवावा लागेल. त्याला काही वेळ लागेल. बूट इथं ठेवून तुम्ही तुमच्या इतर कामासाठी जाणार असाल तर जा. मला मोबाइल नंबर द्या. काम झालं की रिंग करतो. मग तुम्ही येऊन बूट घेऊन जावा.” मी माझा नंबर देण्याऐवजी त्याला माझे व्हिजिटिंग कार्ड दिले. त्यानं कार्ड अगदी त्याच्या डोळ्याजवळ नेऊन नीट वाचले. त्याला आनंद झाला होता. तो आनंदाने म्हणाला, “अरे, तुमी शिंदे हाय होय? म्हणजे मग तुम्ही आमच्या पैकीच आहे. या थोड्या वेळाने रिंग केल्यावर.” मी काहीही बोललो नाही. नुसती मान हलविली व तिथून निघालो. तासभर ऑफिसमध्ये काम केले. तासाभराने मोबाइलवर त्याचा फोन आला. तो म्हणाला, “बुटाचं काम झालंय. येऊन घेऊन जावा.” मी त्याच्याकडे गेलो. त्यानं बूट शिवून चकाचक पॉलिश करून ठेवला होता. मी तो माझ्या पायात घातला. खिशातून पैसे काढत काढत त्याला विचारले, किती द्यायचे? तो हसत हसत म्हणाला, “त्याचे ५० रुपये होतात. इतरांच्याकडून मी ५०च्या खाली घेतच नाही; पण तुम्ही पडला शिंदे. तुम्ही आमच्यापैकी. माझी सासरवाडी शिंदे घरण्यातलीच. त्यामुळे तुमच्याकडून मी ४० रुपयेच घेणार.” मी मनात विचार केला की, मी त्याला त्याच्या जातीचा वाटलो. म्हणून तो त्याच्या कष्टाच्या पैशात कमी करतोय. ना ओळख ना पाळख; पण मी त्याला त्याचा जातवाला वाटलो. मी जातवाला आहे की नाही, याची खात्री न करताच कष्टाच्या कमाईतील १० रुपयांवर त्यांन पाणी सोडले होते. मला वाटलं मी त्याचा जातवाला नाही, असं सांगावं; पण तो इतक्या खुशीत होता की, मला तसं सांगायचं धाडस झालं नाही. मी, ४० रुपये देऊन तिथून मुकाट्यानं निघालो. त्या प्रसंगानंतर मी विचार करू लागलो. जातीसाठी पैसे कमी घेणारा कष्टकरी. का असा विचार करत असेल. त्यानं स्वतःचा तोटा का करून घेतला? काही केल्या माणसाच्या डोक्यातून जात निघत नाही. जाता जात नाही ती जात. आपल्या सर्व समस्यांचं मूळ जातच ठरली आहे. भारतातले सर्व प्रश्न केवळ जाती धर्मानं निर्माण केले आहेत. जातीअंताचा लढा बरेच वर्षांपूर्वी सुरू झाला होता. जाती-अंत करण्यासाठी समाजसुधारकांच्या कैक पिढ्या खपल्या. त्यांनी त्यांची आयुष्य पणाला लावली. काही प्रमाणात त्यांना यशही आले.

जाती संपत आल्या, असं वरवर वाटायला लागलं; पण त्याच वेळी जातीउद्धाराने एकदम उचल खाल्ली. शिकली-सवरलेली माणसं जाती धर्माच्या जोखडात अडकायला लागली. ही चिंताजनक बाब आहे. मी २०१८ साली एका दैनिकात दर रविवारी सदर लिहित होतो. त्याचं नाव ‘ध्यास परिवर्तनाचा’ असं होतं. बिगर वैदिक परंपरांचे महापुरुष त्यानिमित्ताने मी लिहिले. मी चार्वाक बळीराजापासून हे राजर्षी शाहू राजापर्यंत अनेक महापुरुषांची कामगिरी त्या सदरात लिहिली. त्यात भगवान बुद्ध, महावीर, बसव, चक्रधर, नामदेव, तुकोबा, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई, महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे, लहू साळवे, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर अशा विविध जाती-धर्माच्या नायकांचा समावेश होता. लेख प्रसिद्ध झाला की, मला अनेकांचे फोन येत. गंमत अशी की, महापुरुष ज्या जातीचा असेल त्या जाती बांधवांचे फोन जास्त असायचे. ते भरभरून माझं कौतुक करायचे. संबंधित महापुरुषाबाबत बोलायचे. त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं की, आपल्या शिकलेल्या माणसांनी महापुरुषांना त्यांच्या जाती धर्मात सीमित केलं आहे. त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाला जातीच्या मर्यादा घातल्या आहेत, त्यातून संतसुद्धा सुटलेले नाहीत. जाती जातीची संमेलने मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

जाती जातीच्या संस्था निघत आहेत. जातीच्या कार्यक्रमासाठी हॉल बांधले जात आहेत. जाती उद्धार जोमात आहे. जातीअंत कोमात चालला आहे. जातीअंताची लढाई क्षीण होत चालली आहे. ते समाजला घातक आहे. सामाजिक सलोखा कमी होत चालला आहे. समाज दुभंगत चालला आहे. समाजाची वेगवेगळी शकलं होत आहेत. हे अतिशय धोक्याचं आहे. याला पायबंद कसा घालायचा हे सुचत नाही. समाजसेवक आपल्या जातीचा आहे म्हणून फोन करून कौतुक करणारे शेवटी हमखास त्यांची लायकी दाखवायचे, कारण त्यांचा शेवटी एक प्रश्न असायचा. साहेब, मग तुम्ही कोणापैकी? या प्रश्नाने माझं काळीज अक्षरश: चिरत जायचं. मी बरीच पुस्तके धुंडाळून, संदर्भ शोधून लिहिलेल्या लेखाचं कौतुक माझी जात विचारून करणं हे मला भयानक वाटायचं. मी हसत हसत म्हणायचो, मला काय माझी जात माहीत नाही; पण मी माणूस आहे. हे बोलणे सोपे आहे; पण प्रत्यक्ष व्यवहारात जात इतक्या खोलवर घुसलेली आहे की, ती सहजासहजी निघेल असं वाटत नाही. कोणत्या जातीत जन्माला यायचं हे कुणी ठरवू शकत नाही. प्रयत्न न करता व कोणतेही कौशल्य पणाला न लावता जात आपसूक मिळते. मग त्याचा इतका दुराभिमान माणसं का बाळगतात, हे मला न सुटलेलं कोडं आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in