
सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार सोहळा आयोजित करताना सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनाच बोलाविले जात नाही, अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत. असा कसा हा सामाजिक न्याय विभागाचा कारभार आहे?
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेले महाराष्ट्र राज्य हे भारत देशाला पुरोगामीत्व, परिवर्तन, समता आणि सामाजिक न्यायाची दिशा दाखविणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेला सांस्कृतिक, ऐतिहासिक; सामाजिक आणि वैचारिक वारसा हा प्रचंड उच्च कोटीचा प्रगल्भ विचारांचा युगप्रवर्तक ; क्रांतिकारी आणि समृद्ध वारसा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेला; इथल्या सुसंस्कृत राजकारणाचा, राजकीय नेत्यांच्या सामाजिक बांधिलकीला देशात उच्च कोटीचा मान लाभलेला आहे. आपापसातील मतभेद विसरून विरोधक आणि सत्ताधारी हे महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमी एकत्र येण्याची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. मैत्रीभाव जपणारे राजकीय नेते महाराष्ट्राला लाभले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कितीही वैचारिक मतभेद असले, तरी त्यांच्यातील वाद कधीही व्यक्तिगत पातळीवर गेलेला नाही. वैचारिक वाद, मतभेद बाजूला सारून अनेकदा विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांनी मैत्रीभाव जोपासलेला आहे. याचे किस्से अन्य राज्यातही सांगितले जातात. महाराष्ट्राच्या विधानसभेचा, महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा आदराने उल्लेख केला जातो. ही गौरवशाली परंपरा सन २०१४पासून खंडित होऊ लागली आहे.
सन २०१४पासून देशात नरेंद्र युग सुरू झाले आणि महाराष्ट्रात देवेंद्र युग सुरू झाले. ईडीची पीडा मागे लागलेले अनेक लोक देवेंद्र फडणवीस यांना शरण आले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वैर आता शांत होत आहे; मात्र मधल्या काळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोपांचा, टीकेचा सामना सगळे सांस्कृतिक विक्रम मोडणारा होता. तसाच सामना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू आहे. त्या सर्व सामन्यात संजय राऊत यांची बोल बोल बोलिंग अविरत सुरू आहे. त्याचा आनंद महाराष्ट्राने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की, देवाभाऊ आपल्या राज्यात चालले आहे काय? सामाजिक न्याय खात्यावरच अन्याय होतोय?
सर्वांना सोबत घेऊन जाणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वच समाजाच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या, रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीला मोठी साथ दिली आहे. त्यामुळे रिपब्लिकन जनतेच्या अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या आहेत; मात्र त्या अपेक्षांची धूळ होताना रोज दिसत आहे. अपेक्षाभंग होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात आयोजित केला. त्या सोहळ्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा व्हावा, असे आपल्याला का वाटले नाही? राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनाही का वाटले नाही? राज्याचे प्रमुख म्हणून हा सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार सोहळा आयोजित करताना त्यात मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मानाचे स्थान देऊन निमंत्रित करायला पाहिजे होते, ते झाले नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत, त्यात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे. आपण या छोटी पण मनात मोठी जखम करणाऱ्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनाच बोलाविले जात नाही, असा कसा सामाजिक न्याय विभागाचा कारभार आहे?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी मध्यंतरी मोठी भूमिका घेतली. त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्रालय बंद करा, अशी मागणी केली होती. सामाजिक न्याय मंत्रालयाचा निधी वारंवार अन्य विभागाला वळवला जातो. त्यावर मंत्री संजय शिरसाठ यांनी तीव्र आक्षेप घेऊन निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी खंत व्यक्त करीत सामाजिक न्याय मंत्रालय बंद करण्याची मागणी केली होती. स्वतः कॅबिनेट मंत्रीच आपले सामाजिक न्याय मंत्रालय बंद करा, अशी मागणी करतात. तेव्हा त्या मागची कारणे गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलेली लोकभावना समजून घेणे आवश्यक होते. संजय शिरसाठ यांनी व्यक्त केलेला उद्वेग हा राज्यातील प्रत्येक मागासवर्गीय आंबेडकरी समाजाच्या मनातील उद्वेग होता. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे; मात्र तरीही लाडकी बहीण योजनेसाठी दलित आदिवासी कल्याणाचे बजेट अन्यत्र वळविले जात आहे. ज्या समाज कल्याण विभागावर, दलित, वंचित, निराधार, असहाय्य, सामाजिक अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची जबाबदारी आहे, त्या सामाजिक न्याय मंत्रालयावर आज घनघोर अन्याय होत आहे. सामाजिक न्याय खात्यावरच अन्याय होत असेल, तर सामाजिक न्याय खाते काय सामाजिक न्याय देईल?
२०१४ सालापासून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन जनता महायुतीच्या पाठीशी आहे. निवडणुकीत रिपब्लिकन प्रमुख रामदास आठवले यांची आठवण काढणारे महायुतीचे सर्व पक्ष निवडणूक झाल्यावर रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन प्रमुख रामदास आठवले यांना सोयीस्कर विसरतात. अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये उद्घाटन लोकार्पण सोहळ्यात रिपब्लिकन पक्षाला आणि रिपब्लिकन प्रमुख रामदास आठवले यांना डावलले जाते. हा अन्याय आहे. सर्वांना सोबत घेऊन जातील, असे नेते म्हणून 'देवा भाऊ देवा भाऊ, सर्वांचा भाऊ' अशा घोषणा निवडणुकीत आम्ही देत होतो. आता मुख्यमंत्री देवभाऊ आहेत. पण देवाभाऊ फक्त लाडक्या बहिणींचेच कसे भाऊ? निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा, गरीब, गरजू बेरोजगार, दलित, आदिवासी, बहुजन या सर्वांचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांचे भाऊ आहात. त्यामुळे देवभाऊ तुमच्या राज्यात सामाजिक न्यायावर अन्याय होऊ देऊ नका. गोरगरिबांच्या, दलितांच्या हिताचा त्यांच्या तोंडचा घास काढू नका. सामाजिक न्यायाचा निधी अन्यत्र वळवून सामाजिक न्यायावरच अन्याय करू नका! दलित, आदिवासी यांच्या कल्याणचा, सामाजिक न्यायाचा, आदिवासी विकासाचा निधी अन्य खात्यांकडे वळवू नये, असा कायदा करून या दलित आदिवासींच्या हक्काच्या निधीला संरक्षण द्यावे, ही तमाम दलित आदिवासींची मागणी आपण पूर्ण करावी. सामाजिक न्यायाची जाण असणारे देवाभाऊ नक्कीच हा कायदा करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. तूर्त एवढेच.
- प्रसिद्धी प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)