दंगलीनंतरचे कवित्व! चौकशी होण्याआधीच काही राजकीय पक्ष आणि नेते निष्कर्ष काढून मोकळे

नामांतराच्या बाजूने आणि विरोधात प्रचंड संख्येने सरकार दरबारी आपली बाजू मांडण्यासाठी चढाओढ लागली होती
दंगलीनंतरचे कवित्व! चौकशी होण्याआधीच काही राजकीय पक्ष आणि नेते निष्कर्ष काढून मोकळे

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात मध्यरात्री जी दंगल उसळली होती, ती सुमारे चार तासांनंतर नियंत्रणात आली. किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे आणि घोषणा देण्याचे पर्यवसान दंगलीत झाले. किराडपुरा भागात उसळलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच दंगलखोर जमावाने लक्ष्य केले. या दंगलीत पोलिसांच्या वाहनांसह १७ वाहनांची जाळपोळ करण्यात आली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. तरीही जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून गोळीबार करावा लागला. या पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा इस्पितळात मृत्यू झाला. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी झाले. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जी दंगल उसळली, त्यास जबाबदार कोण, याची चौकशी होण्याआधीच काही राजकीय पक्ष आणि नेते निष्कर्ष काढून मोकळे होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर असे औरंगाबाद शहराचे नामकरण झाल्यानंतर शहरातील वातावरण तणावाचे झाले होते. नामांतराच्या बाजूने आणि विरोधात प्रचंड संख्येने सरकार दरबारी आपली बाजू मांडण्यासाठी चढाओढ लागली होती. शहरात असे तणावाचे वातावरण असतानाच दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाचे निमित्त झाले आणि किराडपुरा भागात दंगल उसळली. या दंगलीच्या चित्रफिती राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या काही चॅनेलवरून दाखविल्या जात असताना काही मराठी वृत्तवाहिन्यांनी अशा चित्रफिती त्यांच्याकडे उपलब्ध असतानाही त्या प्रदर्शित न करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे! सामाजिक सलोखा आणखी बिघडू नये म्हणून या वृत्तवाहिन्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद मानायला हवा! तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दंगलीचे खापर राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर फोडले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी तर राज्यात असंतोष निर्माण करण्याचा एकमात्र हेतू विद्यमान सरकारचा असल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर विधान परिषदेतील विरोधी नेते अंबादास दानवे यांनी, भाजप-शिवसेना आणि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमन यांच्यामुळे दंगल उसळली, असा आरोप केला आहे. गेल्या महिन्यात भाजप, शिंदे गट आणि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमन यांनी संभाजीनगरमधील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच हा हिंसाचार उसळला असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही पोलिसांना सावध केले पण पोलिसांनीही आपले कर्तव्य बजाविले नाही, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही, जातीय संघर्ष रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल सरकारवर ठपका ठेवला आहे. या दंगलीमागील ‘मास्टरमाइंड’ कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणीही अजित पवार केली आहे. तर २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीने संभाजीनगरमध्ये जी सभा आयोजित केली, त्यास मोडता घालण्यासाठी दंगल घडवून आणल्याचा आरोप मविआने केला आहे. राजकीय लाभासाठी भाजप आणि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमनने दंगल घडविल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला. असे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मजलिस इत्तेहादुल मुस्लिमनचे खासदार इम्तियाझ जलील यांनी, या दंगलीची उच्च पातळीवर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या हिंसाचाराची सांगड एका विशिष्ट समाजाशी घातली जाता कामा नये, अशी मागणीही त्यांनी केली. जमावाने मंदिरास लक्ष्य केले असते आणि मी घटनास्थळी वेळेत पोहोचलो नसतो तर या दंगलीचे लोण राज्यभर पसरले असते, असे जलील यांनी म्हटले आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यासाठी आपण काही मशिदीच्या मौलानांशीही संपर्क साधला होता. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली, असे खासदार जलील यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जातीय दंगल का, कशामुळे आणि कोणामुळे उसळली याची कारणे दंगलीच्या चौकशीनंतरच बाहेर येतील. पण त्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेस राजकीय रंग देऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या दंगलीचे निमित्त करून राजकीय लाभ घेण्याचा कोणीच प्रयत्न करता कामा नये, हे राज्यातील सूज्ञ नेत्यांना सांगायला हवे का?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in