कोर्टाच्या आवारातून
ॲड. विवेक ठाकरे
सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी म्हणून ओळख असलेल्या सोनम वांगचुक यांना हिंसक आंदोलनानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होत आहे.
सन २००९चा हा काळ. ‘थ्री इडियट्स’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. बोमन इराणीचा वीरू सहस्त्रबुद्धे, ओमी वैद्य यांनी चतुर रामालिंगम म्हणजे सायलेंसरची भूमिका साकारून धमाल उडवून दिली होती. यावेळी सर्वात लक्षात राहिला तो आमिर खानने साकारलेला ‘रणछोडदास शामलदास छांछड’ उर्फ रँचो उर्फ फुनसुख वांगडू हे पात्र आणि लढाखमधील डोंगररांगांमधील प्रयोगशील शाळेचा शेवटचा सीन... इथेच प्रेक्षकांना रँचो उर्फ फुनसुख वांगडू म्हणजेच ‘सोनम वांगचुक’ यांची पहिली ओळख झाली. त्यानंतर दीड दशक सोनम वांगचुक विविध रूपात, विविध भूमिका घेत भारतीयांसमोर येत राहिले. आता सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक केली असून, देशातील एक विशिष्ट वर्ग त्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी शक्ती पणाला लावत आहे. त्यामुळे खरा सोनम कोण याचा चेहरा देशासमोर आला पाहिजे.
सोनम वांगचुक यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी अशी आहे. १९८८मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीनगर येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले. सन १९७५मध्ये त्यांचे वडील जम्मू-काश्मीर सरकारमध्ये मंत्रीही होते. सोनम हे 'स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख'चे संस्थापक आहेत. सौरऊर्जेचा वापर प्रकाश आणि उष्णतेसाठी, जीवाश्म इंधनाऐवजी पर्याय वापरणारे, अशा प्रकारचे कॅम्पस डिझाइन करण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. पुढे त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी आणि उच्च शिक्षणात अत्यावश्यक कौशल्य निर्माण करून शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी 'हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख'ची स्थापना केली. याद्वारे नवनवीन प्रयोग राबवले. १९९४ मध्ये सरकारी शाळा व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार, ग्रामीण समुदाय आणि नागरी समाजाच्या सहकार्याने ‘ऑपरेशन न्यू होप’ सुरू करण्याचे श्रेय सोनम वांगचुक यांना जाते. जानेवारी २०१४ मध्ये वांगचुक यांनी बर्फ स्तूप नावाचा एक प्रकल्प सुरू ज्याद्वारे एप्रिल-मे महिन्यांत नैसर्गिक हिमनदी वितळण्याचे पाणी वाहू लागण्यापूर्वी लडाखमधील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटावर उपाय शोधणे होते. २०१६ मध्ये त्यांनी फार्मस्टेज लडाख नावाचा एक प्रकल्प सुरू केला, जो पर्यटकांना लडाखमधील स्थानिक कुटुंबांसोबत राहण्याची सुविधा देतो. सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीमने युरोपातील पहिला बर्फाचा स्तूप बांधला. सन २०२१ मध्ये सोनम यांनी भारतीय सैन्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे तंबू विकसित केले. असे नावीण्यपूर्ण एक ना अनेक प्रयोग केले. या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना देशविदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ज्यात सन २०१८ साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार, हिमालयीन प्रदेशातील प्रख्यात तंत्रज्ञ पदवी आणि शाश्वत वास्तुकलासाठी जागतिक पुरस्कार यांचा समावेश आहे.
लडाखचा लढा काय आहे?
तब्बल ६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला लडाख हा प्रांत पर्वतराजीने नटलेला नितांतसुंदर नैसर्गिक प्रदेश आहे. लडाखच्या सीमा चीनशी जोडल्या असल्याने प्रादेशिक व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रांत अत्यंत महत्त्वाचा आहे. लडाख याआधी जम्मू-काश्मीर राज्याचा भाग होता. पण ५ ऑगस्ट २०१९ साली केंद्र सरकारने राज्यघटनेतील कलम ३७० व ३५ (अ) हटवून जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपवला. तसेच जम्मू-काश्मीरचे द्विविभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. कलम ३७० रद्द करण्यापूर्वी लडाखमधून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत चार व विधानपरिषदेत दोन आमदार निवडून जायचे तर दोन खासदार निवडून जात होते. लडाख केंद्रशासित झाल्यामुळे तेथील नायब राज्यपालाच्या अखत्यारित केंद्राचा कारभार आला. लोकनियुक्त प्रतिनिधित्व संपले आणि केवळ एक खासदार या प्रदेशातून निवडून येऊ लागला. कलम ३७० हटवताना केंद्राने दिलेली आश्वासनेही पाळली नाहीत, असे लडाखवासीयांचे म्हणणे आहे.
१) लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा. २) राज्यघटनेचे सहावे परिशिष्ट लागू करण्यात यावे. (या सहाव्या परिशिष्टानुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांना विशेष तरतुदी लागू आहेत. यानुसार त्यांना स्वायत्त जिल्हा परिषद स्थापन करता येते, प्रादेशिक परिषद स्थापन करता येते. आदिवासी भागांमध्ये स्थानिक कायदे, जमीन वापर वनक्षेत्र आणि जमावबंदीसंबंधित बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिषदांना अधिकार प्राप्त होतो. तसेच स्थानिक पातळीवर कायदे बनवण्याचा व अंमलबजावणी करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ज्यामुळे त्या विशिष्ट प्रदेशाच्या गरजा आणि परंपरांचे जतन होण्यास मदत होते.) ३) लडाखमध्ये लोकसभेची आणखी एक जागा वाढवण्यात यावी. ४) तसेच लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात यावी. या मागण्यांसाठी लडाखमधील अॅपेक्स बॉडी लेह, कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांच्यासह अनेक सामाजिक-राजकीय संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहे तो सोनम वांगचुक! या मागण्यांसाठी फेब्रुवारी २०२४ साली लडाखमध्ये बंद पाळण्यात आला. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. ६ मार्च रोजीही लेखमध्ये कडाक्याच्या थंडीत व शून्य तापमानात शेकडो नागरिकांसह सोनम वांगचुक यांनी तब्बल २१ दिवस उपोषण केले होते. १ सप्टेंबर रोजी चलो दिल्ली पदयात्रा काढत शेकडो आंदोलकांसह दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले. मात्र या आंदोलकांना दिल्लीतील वाघा बॉर्डरवर अडवण्यात आले. अशा प्रकारे लेह-लडाख प्रांत आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत होता.
याच मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून सोनम उपोषणाला बसले होते. पण सरकार पूर्ण राज्याच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे लडाखमधील हजारो तरुण रस्त्यावर उतरले. दि. २४ सप्टेंबर रोजी लेह-लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारात जमावाने भाजपचे कार्यालय जाळून आपला संताप व्यक्त केला. यावेळी सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह ६०हून अधिक लोक जखमी झाले. या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली असून, त्यांना राजस्थानमधील जोधपूरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणं व जमावाला चिथावणी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेचा परकीय निधीचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांच्या संस्थेला दिलेली जमीन सरकारने परत घेतली आहे, तर त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या देणग्यांची व त्यांच्या संपत्तीची सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. तसेच त्यांनी भेट दिलेल्या पाकिस्तान व चीनच्या दौऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानबदलासंदर्भातील एका परिषदेसाठी सोनम आपल्या पत्नीसह पाकिस्तानला गेले होते. अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यामुळेच पाकिस्तानला गेले म्हणून षडयंत्र रचणे, आयएसआयशी संबंध आहेत असा आरोप करणे हे पूर्णपणे खोटे आरोप असून, बदनामीचे षडयंत्र आहे, असे त्यांची पत्नी गीतांजली यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.
सोनम वांगचुक हा आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषय बनला आहे. त्यानिमित्ताने लेह-लडाखवासीयांचे प्रश्नही केंद्रस्थानी आले आहेत. जगभरातील प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, न्यायसंस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारे सोनम प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. भारतावर सांप्रदायिकतावादाचा डाग लागला आहे. जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. नजीकच्या काळातील घडामोडी पाहता भारताचे परराष्ट्र धोरण फसले आहे, याची खात्री पटते. ७० वर्षांत राष्ट्र म्हणून आपण जे कमावले त्याची माती व्हायला नको. तपास यंत्रणेचा, न्यायसंस्थेचा आता कस लागणार आहे. केवळ सूडबुद्धीने कारवाई केल्यास सरकारवर, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह येता कामा नये. नाहीतर सोनमच्या रूपाने सरकारने आपल्या राजसत्तेवर आणि लोकशाहीवर शेवटची पाचर मारली आहे, असे व्हायला नको.
वकील, मुंबई उच्च न्यायालय