

देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
अवघ्या २० वर्षांची राजकुमारी सैन्य दलातील खडतर प्रशिक्षण घेत असल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काय आहे हा प्रकार? ती हे प्रशिक्षण का घेत आहे? याने कोणता इतिहास रचला जाणार आहे?
युरोपमधील राजेशाहीचा इतिहास नेहमीच जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, सध्या स्पेनमध्ये जे घडत आहे, ते केवळ कौतुक करण्यासारखे नसून ऐतिहासिक बदलाची नांदी ठरणारे आहे. गेल्या १५० वर्षांतील स्पेनच्या पहिल्या राज्यकर्ती राणी (रेनिंग क्वीन) बनण्यासाठी २० वर्षीय राजकुमारी लिओनोर सज्ज होत आहेत. राजवाड्याच्या सुखसोयी सोडून रणांगणावरील तब्बल तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या राजकुमारीने आपल्या जिद्दीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
आधुनिक स्पेनची खरी सुरुवात १४६९ मध्ये झाली. राणी इसाबेला (कॅस्टिल) आणि राजा फर्डिनांड (अरागॉन) यांच्या विवाहामुळे स्पेनमधील दोन मोठी राज्ये एकत्र आली. १४९२ मध्ये त्यांनी शेवटच्या मुस्लिम राजवटीचा (ग्रॅनडा) पराभव केला आणि ख्रिस्तोफर कोलंबसला अमेरिकेच्या शोधासाठी पाठवले, ज्यातून स्पॅनिश साम्राज्याचा पाया रचला गेला. १६व्या ते १७व्या शतकात स्पेन हे जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते. ‘चार्ल्स पाचवा’ आणि ‘फिलिप दुसरा’ यासारख्या राजांनी युरोपपासून अमेरिकेपर्यंत राज्य केले. याला स्पेनचा ‘सुवर्णकाळ’ मानले जाते. मात्र, १७०० मध्ये या घराण्याचा शेवटचा राजा निपुत्रिक वारल्याने सत्तेसाठी युद्ध झाले. महायुद्धानंतर फ्रान्सच्या बोरबॉन घराण्याची सत्ता स्पेनवर आली. आजचे राजघराणे याच ‘बोरबॉन’ वंशाचे आहे. या काळात राजेशाही अनेकदा हटवली गेली आणि पुन्हा आली. १८०८ मध्ये नेपोलियनने आक्रमण करून आपल्या भावाला राजा बनवले. १८७३-१८७४ मध्ये पहिली प्रजासत्ताक व्यवस्था आली. १९३१ मध्ये लोकांच्या रोषामुळे राजा अल्फोन्सो १३ वा याला देश सोडावा लागला आणि दुसरी प्रजासत्ताक व्यवस्था आली. १९३६-३९ च्या गृहयुद्धानंतर फ्रान्सिस्को फ्रँको या हुकूमशहाने सत्ता हस्तगत केली. त्याने स्वतः जिवंत असेपर्यंत सत्ता गाजवली, पण मरण्यापूर्वी त्याने राजा अल्फोन्सोच्या नातवाला म्हणजेच जुआन कार्लोस याला आपला वारस घोषित केले. १९७५ मध्ये जुआन कार्लोस राजा झाल्यानंतर सर्वांना वाटले की, तो हुकूमशाहीच पुढे नेईल, पण त्याने अनपेक्षितपणे स्पेनमध्ये लोकशाही आणली. यासाठी सुरुवातीला त्याचे खूप कौतुक झाले.
स्पेनमध्ये ‘बोरबॉन’ घराण्याचा वारसा अत्यंत जुना आणि समृद्ध आहे. परंतु, गेल्या दीड शतकात स्पेनच्या गादीवर केवळ पुरुष राजांचेच वर्चस्व राहिले आहे. राजकुमारी लिओनोर जेव्हा गादीवर बसतील, तेव्हा त्या १५० वर्षांनंतरच्या पहिल्या महिला राज्यकर्त्या असतील. त्यांचे वडील, राजा फेलिपे सहावे, यांच्या पावलावर पाऊल ठेवत लिओनोर केवळ नावाने नव्हे, तर कर्तृत्वाने ‘कमांडर-इन-चीफ’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एका राणीला केवळ मुत्सद्देगिरी माहीत असून चालत नाही, तर तिला आपल्या सैन्याचे नेतृत्वही करता आले पाहिजे. हे ओळखून लिओनोर यांनी तीन वर्षांचे व्यापक लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण केवळ औपचारिक नव्हे तर अत्यंत आव्हानात्मक होते.
लिओनोर यांच्या प्रशिक्षणातील सर्वात रोमांचक टप्पा म्हणजे त्यांची सागरी मोहीम. ‘जुआन सेबॅस्टियन डी एल्कॅनो’ या ऐतिहासिक प्रशिक्षण जहाजावरून त्यांनी तब्बल १७,००० मैलांचा प्रवास पूर्ण केला. भर समुद्रात लाटांशी झुंज देत त्यांनी नौदलातील शिस्त आणि तांत्रिक बाबींचे ज्ञान आत्मसात केले. नुकताच त्यांनी वायू दलाच्या प्रशिक्षणातील मोठा टप्पा गाठला. ‘पिलाटस PC-2१’ या विमानातून त्यांनी एकट्याने उड्डाण (सोलो फ्लाइट) करून सर्वांना थक्क केले. आकाशात झेपावणारी ही राजकुमारी केवळ विमान उडवत नव्हती, तर स्पेनच्या बदलत्या भविष्याचे दर्शन घडवत होती.
लिओनोर यांचे व्यक्तिमत्त्व केवळ लष्करी प्रशिक्षणापुरते मर्यादित नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेल्समधील विख्यात ‘यूडब्ल्यूसी अटलांटिक कॉलेज’मध्ये झाले आहे, जिथे जगभरातील निवडक विद्यार्थी शिक्षण घेतात. विशेष म्हणजे, राजकुमारी लिओनोर यांचे सहा भाषांवर प्रभुत्व आहे. स्पॅनिशसह कॅटलान, गॅलिशियन, बास्क या प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी व अरबी भाषा त्या अस्खलित बोलतात. ही भाषिक विविधता त्यांना स्पेनच्या विविध भागांतील लोकांशी आणि जागतिक नेत्यांशी जोडण्यास मदत करणारी ठरेल. आजच्या काळात जेव्हा राजेशाहीकडे केवळ एक शोभेची वस्तू म्हणून पाहिले जाते, तेव्हा लिओनोर यांनी आपल्या कष्टाने या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. स्पेनमधील तरुणांसाठी त्या एक ‘रोल मॉडेल’ ठरत आहेत. सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यांच्या लष्करी गणवेशातील फोटोंनी एक वेगळीच लाट निर्माण केली आहे, ज्याला स्पेनमध्ये ‘लिओनोरमॅनिया’ म्हटले जात आहे. स्पेनच्या राज्यघटनेनुसार, राजा किंवा राणी हा देशाच्या सशस्त्र दलांचा सरसेनापती असतो. लिओनोर यांनी घेतलेले प्रशिक्षण त्यांना भविष्यात या जबाबदारीसाठी पूर्णपणे सक्षम बनवत आहे. जेव्हा त्या गादीवर बसतील, तेव्हा सैनिकांना त्यांच्याबद्दल केवळ आदर नसेल, तर ‘ही आपल्यातीलच एक आहे’ ही भावना असेल.
राजकुमारी लिओनोर यांनी आपल्या आजोबांचा काळाकुट्ट इतिहास पुसण्याचा चंग बांधला आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत स्पेनची राजेशाही मोठ्या वादांमध्ये सापडली आणि यामागील मुख्य कारण होते माजी राजा हुआन कार्लोस. लाचखोरी, करचुकवेगिरी आणि संशयास्पद परदेशी निधी स्वीकारल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले. सौदी अरेबियाकडून सुमारे १०० दशलक्ष डॉलर भेट स्वरूपात मिळाले आणि ही रक्कम स्विस बँक खात्यांत लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले. स्पेनमध्ये कर न भरल्यामुळे त्यांच्यावर चौकशी सुरू झाली. तसेच, २०१२ मध्ये आर्थिक मंदीच्या काळात राजा हुआन कार्लोस आफ्रिकेत हत्तीची शिकार करत असल्याचे उघड झाले. देश आर्थिक संकटात असताना राजाचा हा ऐषआरामी प्रकार जनतेला खटकला. या घटनेनंतर जनतेतील राजेशाहीविषयीचा आदर मोठ्या प्रमाणात कमी झाला. राजा हुआन कार्लोस यांचे जावई इन्याकी उर्दांगारिन (राजकुमारी क्रिस्टीना यांचे पती) यांच्यावर नूस प्रकरणात भ्रष्टाचार सिद्ध झाला. सरकारी निधीचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. यामुळे राजघराण्याची ‘नैतिक उंची’ प्रश्नचिन्हाखाली आली. अखेर सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये राजा हुआन कार्लोस यांनी राजगादी सोडली. त्यांचा मुलगा फेलिपे सहावा स्पेनचा राजा झाला. हा निर्णय राजेशाही वाचवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी घेतल्याचे मानले जाते. २०२० मध्ये हुआन कार्लोस स्पेन सोडून अबुधाबी येथे वास्तव्यास गेले. हे ‘स्वयंनिर्वासन’ स्पेनच्या इतिहासात अभूतपूर्व होते. सद्यस्थितीत राजा फेलिपे सहावा आणि राजकुमारी लिओनोर हे पारदर्शकता, साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांवर भर देत आहेत. स्पेनच्या राजेशाहीची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकुमारी लिओनोर यांची ही वाटचाल म्हणजे केवळ एका राजघराण्याची तयारी नव्हे, तर स्पेनच्या इतिहासातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. लष्करी शिस्त, आंतरराष्ट्रीय शिक्षण, आधुनिक विचार आणि परंपरेचा सन्मान या सर्वांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. स्पेनच्या पहिल्या ‘रेनिंग क्वीन’ झाल्यावरचा क्षण केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर प्रेरणादायीही असेल. विशेषतः नव्या पिढीसाठी. राजकुमारी लिओनोर यांचा प्रवास हा केवळ एका राजकन्येचा राणी होण्यापर्यंतचा प्रवास नाही, तर तो स्त्रीशक्तीच्या सक्षमतेचा प्रवास आहे. ‘पिलाटस’ विमानातून घेतलेली त्यांची झेप ही त्यांच्या वैयक्तिक यशाची नसून, संपूर्ण स्पेनच्या उज्ज्वल भविष्याची भरारी आहे. बोरबॉन घराण्याचा हा तरुण वारसा उद्या जेव्हा स्पेनची धुरा हाती घेईल, तेव्हा जगाला एका प्रगल्भ, धाडसी आणि सुशिक्षित ‘रेनिंग क्वीन’चे दर्शन घडेल यात शंका नाही.
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
bhavbrahma@gmail.com