Pahalgam terror attack : स्पिरिट ऑफ इंडिया

मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आपल्या हिंदू भावांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा दंडाला काळ्याफिती लावूनच नव्हे, तर थेट रस्त्यावर उतरून धिक्कार केला. यालाच म्हणतात सामाजिक बंधुभाव, मानवतावाद, राष्ट्रीय एकात्मता आणि राज्यघटनेला अभिप्रेत असलेले ‘स्पिरिट ऑफ इंडिया.’
Pahalgam terror attack : स्पिरिट ऑफ इंडिया
नवशक्ति अक्षररंग
Published on

- दुसरी बाजू

- प्रकाश सावंत

‘पाकिस्तान मुर्दाबाद! आतंकवाद मुर्दाबाद! हिंदुस्तान जिंदाबाद! इन्सानियत जिंदाबाद! हिंदू-मुस्लिम एकता जिंदाबाद!’ अशा घोषणा देत देशातील मुस्लिम समाज शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदींमध्ये एकवटला व त्याने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा दोन मिनिटे शांतता पाळून निषेध केला. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आपल्या हिंदू भावांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा दंडाला काळ्याफिती लावूनच नव्हे, तर थेट रस्त्यावर उतरून धिक्कार केला. यालाच म्हणतात सामाजिक बंधुभाव, मानवतावाद, राष्ट्रीय एकात्मता आणि राज्यघटनेला अभिप्रेत असलेले ‘स्पिरिट ऑफ इंडिया.’

मागील दहा वर्षांच्या काळात देशातील सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झालेले आहेत. विशिष्ट वर्गाकडून मुस्लिम धर्मीयांचा पराकोटीचा द्वेष पसरविण्यात आलेला आहे. त्यांची घरे-दुकाने वेचून लक्ष्य केली आहेत. मुस्लिम समाजाविषयी भेदभावपूर्ण व कलुषित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी वादग्रस्त धर्मसंसदा भरवून मुस्लिम समाजाविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, घुस घुस के मारेंगे’ अशी धार्मिक उन्मादाची द्वेषपूर्ण विधाने केली गेली आहेत. ही द्वेषाची भाषा दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर सत्ताधारी मंडळी, त्यांच्या समर्थक उजव्या संघटना आणि त्यांच्यावर पोसलेला मीडिया करीत आहे. हिंदू-मुस्लिम वादावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा लाजिरवाणा प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची व प्रक्षोभक विधाने करण्याची त्यांच्यात जणू काही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना, काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पाकधार्जिण्या दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू बांधव मारले गेले. या हल्ल्याच्या वेळी धर्मांध मुस्लिम दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना त्यांचे नाव व धर्म विचारून वेचून वेचून मारले. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची नवी आवृत्ती असलेल्या ‘टीआरएफ’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या नंदनवनात रक्तरंजित सडा शिंपला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व अन्य राज्यांमधील पर्यटक हकनाक बळी गेले आहेत. या भ्याड हल्ल्याचा आता सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. हा निषेधाचा सूर केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम समाज बांधवही रस्त्यावर उतरून करीत आहेत. हा निषेध देशभरातील मशिदींमधूनही केला जात आहे.

पहलगाम येथील मुस्लिम दहशतवाद्यांच्या हल्ल्याला स्थानिक घोडेस्वार सय्यद आदिल हुसेन शाह नावाच्या मुस्लिम तरुणाने प्रखर विरोध केला. हिंदू पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांच्या हातातील रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. काही हॉटेल व्यावसायिकांनी बाहेर गडबड सुरू झाल्याचे लक्षात येताच आपल्या पर्यटकांना हॉटेलबाहेर पडू दिले नाही. काही मुस्लिम बांधवांनी अवघड व अरुंद पायवाटांवरून पर्यटकांना आपल्या पाठीवर घेऊन सुरक्षित स्थळी हलवले व त्यांचे प्राण वाचवले. काहींनी पर्यटकांकडून त्यांच्या कामाचा मोबदला सुद्धा घेतला नाही. इथेच काश्मिरी बांधवांनी पैसा आणि धर्मापेक्षा ‘इन्सानियत’ मोठी असल्याची ओळख अधोरेखित करून माणुसकीविरुद्धच्या भ्याड हल्ल्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत.

एकेकाळी याच काश्मीर खोऱ्यातील काही मुस्लिम दहशतवाद्यांचे छुपे, तर काही उघडपणे समर्थन करीत होते. काही काश्मिरी तरुण हातात दगड घेऊन भारतीय लष्करावरच दगडफेक करीत होते. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मुस्लिम बांधवांच्या मानसिकतेमध्येही कमालीचा बदल झाला आहे. त्यांना शांतता व सलोखा हवा आहे. त्यांनाही आपल्या कुटुंबीयांसह देशाचा विकास हवा आहे. ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती जपणाऱ्या काश्मिरींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर रस्त्यावर उतरून दहशतवाद्यांचा खुलेआम निषेध नोंदवला आहे. काश्मीरमधील पर्यटनावरच आपल्या मुलाबाळांचे शिक्षण व भवितव्य अवलंबून आहे. त्यातूनच त्यांना रोजीरोटी मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबांना सुख-समाधान लाभणार आहे. ही भावना स्थानिक काश्मिरींमध्ये प्रथमच पाहायला मिळत आहे. त्यामुळेच काश्मीरमधील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी मशिदीमधूनच नव्हे, तर रस्त्यावर उतरून दहशतवादी कारवायांना कडाडून विरोध दर्शवला आहे. ही देशाचे ऐक्य व अखंडतेच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणता येईल.

विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा देशभरातील समस्त मुस्लिम बांधवांनी एकदिलाने, एकजुटीने निषेध नोंदवला आहे. बहुसंख्य मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या हिंदू बांधवांच्या हत्येचा निषेध नोंदवला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दंडावर काळ्या फिती लावून ‘पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद’चे बुलंद नारे दिले आहेत.

विशेष म्हणजे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मिरवेज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगरच्या ऐतिहासिक जामा मशिदीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीच्या जामा मशिदीतही दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. श्रीनगरच्या लाल चौकातील व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांवर काळे झेंडे लावून हल्ल्याचा निषेध केला. पहलगामचा हल्ला शांतताप्रेमी भारतीयांच्या सहजीवनावरच झालेला आहे. तिथे माणुसकीचा खून झाला आहे. इस्लाम धर्मात दहशतवादाला थारा नाही, हीच भावना देशभरातील मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे व ती अधिक महत्त्वाची आहे.

गेल्या काही वर्षांत देशात अनेक धार्मिक दंगली झाल्या आहेत. दंगलीच्या वेदना मुंबईकरांना काही नव्या नाहीत. या दंगलींचे बोलवते धनी नेहमीच नामानिराळे राहिले असले तरी त्यात सर्वसामान्य हिंदू-मुस्लिम बांधवांचीच अपरिमित हानी झालेली आहे. या दंगलीमध्ये सामाजिक बंधुभाव नष्ट होऊन विद्वेषाचे वातावरण वाढीस लागलेले आहे. परस्परांविषयीचा संशय कमालीचा वाढला आहे. त्याला सत्याधाऱ्यांनी धार्मिक रंग देऊन देशातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या उजव्या विचाराच्या संघटना व त्यांच्या समर्थक मीडियानेही साथ देऊन आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये भीतीची, दहशतीची व हतबलतेची भावना आहे. मुस्लिमांकडे ‘ते’ आपले नाहीत याच भावनेतून पाहिले गेले आहे. त्यांच्या प्रत्येक कृती विषयी संशय घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला मिळणारे छुपे वा उघड समर्थन जवळपास संपल्याचे पहलगामच्या निषेधाच्या सार्वत्रिक घटनांमधून दिसून येत आहे. आम्ही भारतीय आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आमचाही निरपराधांच्या हत्येला विरोध आहे. हाच संदेश समस्त मुस्लिम बांधवांनी देऊन देशाची उच्च संस्कृती-परंपरा, नीतिमूल्ये व विविधतेतून एकता जपणाऱ्या भारताची मान जगात उंचावली आहे. विद्वेषाचे, पक्षपाताचे धार्मिक राजकारण करणाऱ्यांना सावध व सामंजस्याची भूमिका घेऊन चांगलीच चपराक दिली आहे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in