सुरवात

सुरवात

करू करू म्हणता बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. १ जानेवारी आले, की आपण अगदी नवीन वर्षाच्या जोषात मस्त पैकी हे करूया...ते करूया... म्हणून ठरवतो. वास्तवात मात्र आज-उद्या करता-करता उत्साह पण राहतो बाजूला आणि सुरुवात काही होत नाही. मग ते नोकरी शोधणे असो, नवीन काही शिकणे असो, घराची आवराआवर असो, व्यायाम करणे असो, लिखाण करणे असो, की अभ्यासाची सुरवात असो. असे म्हणतात छान सुरवात झाली ना कि आपले अर्धे काम झालेचं म्हणून समजा.

खरंतर आपण जी प्रत्येक गोष्ट सुरुवात करण्यासाठी देखील चाल-ढकल करतो ना, तोच स्वभाव आपल्याला ध्येयाकडे जाण्यासाठी अडथळा निर्माण करतो. कारणे काहीही असू देत, आपण जेव्हा कारणे देतो, तेव्हा समजावे, हे आपण नुसते स्वतःच्या समजुतीसाठी पळवाट शोधत आहोत. सुरुवात खरंच महत्वाची असते. करना है तो करना है! राहुलचे बघा हं. राहुलने ठरवले होते, की आपण नवीन वर्षाच्या सुरवातीला मग १ तारखेला नाहीना जमले तरी चालेल, पण दरररोज थोडे चालायला सुरू करूया. पहिला दिवस गेला, नाही जमले चालायला जायला, नो प्रॉब्लेम. मग दोन तारखेला दिवसभराच्या ऑफिसच्या जवळ दोन-तीन मिटींग होत्या.

आजपण चालायला जमेल की नाही, माहित नाही. सकाळी तर लवकर निघायचे. मग काय? ठरले, गाडीने ऑफिसला तर जाऊया आणि मिटींग्जला वेळ आहे, तर मस्त चालत जाऊ. सुरुवात तर करू या! दुसऱ्या दिवशी मग पाचव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये लिफ्ट न वापरता जिन्याने चढ-उतार करायचे सुरू केले. तिसऱ्या दिवसापासून मग अगदी सकाळी व्यवस्थित वेळ ठरवून चालायला सुरवात केली. मग काय, दररोजच्या कामात त्याची पण व्यवस्थित घडी बसली. सानिका बऱ्याच दिवसांपासून नोकरी शोधत होती. काही केल्या तिच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. मुलाखतीची तयारी नाही, आपले पदवीचे विषय समजून घेणे नाही, जाऊन तर बघूया म्हणून दिलेल्या मुलाखती. कसे यश मिळणार? तेच जर व्यवस्थित स्वतःचे विषय समजून घेतले असते, मुलाखतीची नीट तयारी केली असती, तर नोकरी नक्की मिळाली असती. पण, परत तेच होईल-बघू. सुरवात ही स्वतःच्या पुर्व तयारीने होते.

आपले पदवी शिक्षण चालू असताना आपल्या विषयाची अवांतर पुस्तके वाचावीत, यशस्वी लोकांच्या मुलाखती पहाव्यात, नोकरीच्या मुलाखतीचे तंत्र समजून घ्यावे. स्वतःचे व्यतिमत्व घडवावे. आपणं आपल्यावर मेहनत घ्यावी आणि त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन सुरवात करावी. आपल्या हातात स्मार्ट फोन आहे, वापरा की स्मार्टली. प्रॉब्लेम कुठे येतो? हे सर्व प्लॅन्स फक्त मनात राहतात. सुरवात केली तर मग अंमलबजावणी (execution) होणार ना? सुरवात करा, कामात सातत्य ठेवा. प्रयत्न चालू ठेवा, एखादा दिवस कमी जास्त झाले तरी ठीक आहे, पण नियमितपणा नसेल तर मग लक्ष्य पण दूर राहतं. अडथळे, समस्या हे येणार, कोणी आपल्यासाठी रस्ता मोकळा आहे, या आता, असे सर्व तयार करून ठेवत नाही. आपला मार्ग आपण शोधायचा असतो. आळशीपणा, प्रलोभने हे पण आहेच. आपण मात्र आपले लक्ष्य काय, यावर नजर ठेवावी. जेव्हा तुम्हाला आपले ध्येय मिळवण्याची मनापासून ईच्छा असते, तेव्हा तुमचा पूर्ण फोकस तोच असतो. मग काय आंधी आए या तुफान हमे क्या? ये हुई ना बात! समस्या आहे तर उपाय पण आहे. आपण सगळे इतकं धावपळीचं आयुष्य जगत असतो, की होईल-होईल म्हणता म्हणता बरंच राहून जाते. पण, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जरुरी आहेत, त्यांना प्राधान्य देणे हे आपल्यालाच सुरू करायचे असते. वेळेचं नियोजन, पूर्व तयारी सोबतीला दृढनिश्चय, समर्पण आणि शिस्त (determination, dedication & amp discipline) ह्या गोष्टी असल्या तर अशक्य काहीचं नाही.

आपण सुरवातीपासून व्यवस्थित सगळे केले, की मग त्याचा आपल्याला फायदाच होतो. शेवटच्या क्षणाची धावपळ, टेन्शन बिलकुल येत नाही. यशाची खात्री तेव्हा असते, जेव्हा तुम्ही योग्य वेळी सुरवात करता. काही नवीन सुरवात करताना मला हे जमेल. मी हे करणारच, हे आपल्या मनाला बजावून सांगायचे. कुठल्या शंका, भीती मनात ठेवायच्या नाहीत. मग काय काही नवीन करण्याची, शिकण्याची सुरवात करताय आजपासून, आत्तापासून? शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in