

अस्वस्थ वर्तमान
डॉ. प्रवीण बनसोड
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाहीचा अर्थ पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विचारांच्या प्रकाशात आजच्या भारतीय लोकशाहीचे स्थान कुठे आहे?
२०२६ सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगल पर्वावर लोकशाहीचा नेमका अर्थ पुन्हा उलगडून पहावा असे वाटावे अशा काही घटना घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर २० मे १९५६ रोजी 'व्हाइस ऑफ अमेरिका' या नभोवाणी केंद्रावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजी भाषण दिले. त्या भाषणात भारतीय लोकशाहीसंबंधी मूलगामी चिंतन व्यक्त केले आहे.
भारतात लोकशाही आहे की नाही? सत्य काय आहे ? गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि संसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो दूर केल्याशिवाय या प्रश्नांचे निश्चित उत्तर समोर येणार नाही. असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, 'लोकशाही, गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे, शासनाचा प्रकार संसदीय असो वा अन्य, यात दिसून येत नाहीत. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध, तसेच लोकांच्या परस्परांतील सहजीवनात लोकशाहीची मुळे शोधावी लागतात.'
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय लोकांना डॉ. आंबेडकरांनी जॉन स्टुअर्ट मिल यांचा संदेश सांगितला आहे. 'आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत.'
जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला हा संदेश आजच्या परिस्थितीला किती तंतोतंत लागू पडतो ते आपणास दिसून येईल.
याबाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकोनेल याने मार्मिकपणे म्हटलेले आहे की, 'स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही, शीलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.'
या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशांपेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नाही. एखाद्याने धार्मिकबाबतीत भक्ती दाखविली तर ती त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचीच मुक्तता करू शकेल; परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यपूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल, असे बाबासाहेब म्हणतात.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसा हे तत्त्व मानले आणि आर्थिक समता प्रस्थापित व्हायची तर भांडवलदार कामगार संघर्ष संपला पाहिजे आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी भरून निघाली पाहिजे, असे महात्मा गांधींना वाटते. पण त्यासाठी सरकारी सक्ती किंवा सशस्त्र वर्गसंघर्ष हे मार्ग त्यांना अप्रस्तुत वाटतात. त्यापेक्षा शोषण वर्गांनी स्वतःला लोकांचे विश्वस्त समजून आपल्या मालमत्तेचा विनियोग करण्याची कल्पना त्यांना अधिक ग्राह्य वाटते.
व्यक्तीच्या शुद्ध अंतःकरणाचा आदर्शवाद महात्मा गांधी मानत होते, तर आर्थिक विषमता, मालमत्तेचे सदोष वितरण आणि त्यामुळे निरर्थक ठरणारी 'कायद्यासमोरील समानता' आणि 'समान मताधिकार' ही अरिष्ट्ये उद्योगप्रधान समाजापुढे भांडवलशाहीने उभी केली असून खासगी मालमत्तेचा हक्क त्या सर्वांच्या मुळाशी आहे, असे निदान पंडित नेहरूंनी केले आहे. सामाजिक-आर्थिक समतेसाठी सर्वप्रथम खासगी मालमत्तेवर कडक निर्बंध घातले पाहिजेत, उत्पादन साधनांवर सामाजिक नियंत्रण बसवले पाहिजे आणि विकासाची समान संधी प्रत्येकास दिली गेलीच पाहिजे, असे जवाहरलाल नेहरू यांना वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिप्रेत असणारी लोकशाही आज नेमकी कोणत्या स्थानावर उभी आहे याचा विचार करणे, प्रजासत्ताकाच्या निमित्ताने नक्कीच गरजेचे आहे.