-संदीप वाकचौरे
शिक्षणनामा
नवे वर्ष सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्षाचा अजूनही पंचवीस टक्के कालावधी शिल्लक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण येऊन तीन वर्ष पूर्णत्वाला जात आहेत. येत्या काही वर्षांत देशभर शिक्षणात बदल होण्याचा वेग उंचावणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच देशभरातील एम.फील अभ्यासक्रम बंद करण्याबाबत आदेशित केले आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रम स्थानिक भाषेत आणण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
पायाभूत व निम्न प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम आराखडे केंद्राने जाहीर केले आहेत. देशात निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. याच वर्षात केंद्र सरकारने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल जाहीर केला. राज्य सरकारचाही राज्य संपादणूक सर्वेक्षण अहवालही प्रसिद्ध झाला. केंद्राचा पी.जी.आय. अहवालही नेहमीप्रमाणे समोर आला आहे. आपल्या राज्याचे स्थान काहीसे घसरले आहे. महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्राची निर्मितीच्या दृष्टीने पावले पडत आहेत. शिक्षण हक्क कायद्याने आठवीपर्यंत विद्यार्थी त्याच वर्गात न ठेवण्याबाबतच्या तरतुदीत बदल करत राज्य सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीला नापास करण्याबाबतच्या शासन निर्णयाच्या अंमलबलबजावणीसाठी पावले टाकली आहेत. राज्यात समूह शाळा निर्मितीच्या दृष्टीने गतीने पावले टाकली जात आहेत. विविध कंपन्यांच्या सी.एस.आर.च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठीचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी राज्यातील सुमारे साडेचार लाख शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन यासंदर्भात पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. अशा काही महत्त्वाच्या प्रक्रियेसंदर्भाने राष्ट्रीय व राज्यस्तरावर अंमलबजावणी केली जात आहे. अर्थात हे सारे बदल शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने घडत आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अपेक्षित बदलाच्या दिशेने अधिक गंभीर स्वरूपात पावले टाकली जातील. धोरणाप्रमाणे नव्या काही संस्था उभ्या राहतील, अभ्यासक्रम बदलतील, पाठ्यपुस्तक बदलतील. बदल हे काळाच्या पटलावर अनिवार्य आहेत. काळाच्या सोबत चालल्याशिवाय प्रगतीची झेप घेता येणे शक्य नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.
आपल्या शिक्षणाची ध्येय अधिक उंच आहेत. देशात राबवल्या जाणाऱ्या विविध शिक्षणविषयक अभियान, चळवळी, कार्यक्रमाची ध्येयदेखील अधिक विस्तारलेली आणि उंच आहेत. देशातील शंभर टक्के विद्यार्थी शिकती व्हावीत म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या ‘निपुण भारत’सारख्या अभियानाची ध्येय अत्यंत उच्च राखण्यात आली आहेत. शिक्षणातून ही ध्येय साध्य झाली तर आपला देश जगाच्या पाठीवर सर्वोत्तम असेलच यात शंका नाही. त्याचवेळी येथील माणसं देखील जगातील सर्वाधिक आनंददायी असतील. ध्येय अधिक मोठे आहे आणि एका सर्वोत्तम राष्ट्र व माणसांच्या जडणघडणीसाठीची ती पाऊलवाट आहे. ध्येय अत्यंत उच्च असले तरी ते साध्य होण्याची वाट मात्र अधिक कठीण आहे हे ती पाऊलवाट चालताना सहजतेने जाणवत राहते. त्यामुळे सरकारने ध्येय आखले तरी त्या दिशेने जाण्यासाठी केवळ धोरण, निर्णय महत्त्वाचे नाही तर त्यासोबत अमंलबजावणी प्रक्रिया आणि ती राबवणारी माणसं, त्यांची मानसिकता देखील अधिक महत्त्वाची आहे. तो प्रवास जर गंभीरपणे सुरू झाला तरच उद्याचे भविष्य अधिक प्रकाशमय असणार आहे. अन्यथा मागील पानावरून पुढे चालू असेच घडत राहील.
निपुण भारत अभियानाच्या ध्येयात म्हटले आहे की, मुलांचे उत्तम आरोग्य व स्वास्थ्य राखले जाईल. त्या दृष्टीने शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आरोग्याचा पाया घातला जाईल हे घडणे अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करताना वर्तमानात केवळ बौद्धिक विकासासाठीचा विचार केला जात आहे. शिक्षणात आपल्याला जे काही अपेक्षित आहे, गुणवत्ता, प्रगती, समग्र विकास या गोष्टी साध्य करताना विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. आरोग्यासाठी जितके म्हणून प्रयत्न केले जातील तितक्या मोठ्या प्रमाणावर गुणवत्तेचे फलित प्राप्त होणार आहे. आपल्याला बौद्धिक विकास हवा आहे. विद्यार्थ्यांना मार्क हवे आहेत. अशावेळी शिकण्यासाठी मेंदू हा अवयव आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्याचा पुरेपूर विकास झाला तरच आपल्याला पावले टाकता येतील. त्याच्या विकासासाठी शारीरिक विकासाचा विचारही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना मैदानावर खेळू देणे, त्यातून त्यांच्या शरीराचा विकास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. बालकांसाठी मैदान, खेळ, विविध प्रकारच्या हालचाली हाच विकासाचा मार्ग आहे. शारीरिक विकास जर उत्तम झाला तर बौद्धिक विकासासाठी गरजेच्या असलेल्या मेंदूचा अधिक चांगला विकास होण्याची शक्यता आहे. शारीरिक विकास हा केवळ शारीरिक इतक्याच मर्यादित अर्थाने त्याकडे पाहिले जाऊ नये. त्याचा संबंध वर्गातील अपेक्षित शैक्षणिक गुणवत्तेशी आहे हेही लक्षात घ्यायला हवे. अर्थात शिक्षण धोरणात पायाभूत स्तरावर क्रीडा पद्धतीचा विचार अधिक गंभीरपणे करण्यात आला आहे. शारीरिक विकासाबाबत पालक, शाळा तितक्याशा गंभीरपणे पावले उचलत नाहीत. पालकांना उद्याची स्पर्धा झोपू देत नाही. बालक लहान असले तरी त्याचे भविष्य काय आहे हे त्यांना अगदी बालवाडीपासूनच चिंतेची वाट दाखवत असते. त्यामुळे शारीरिक विकासासाठी कोणतेच प्रयत्न होत नाही. विद्यार्थी स्वतःहून मैदानाची वाट चालू पाहतात, पण ती वाट म्हणजे पालकांच्या भविष्याच्या स्वप्नासाठी अडथळे आहेत असे वाटत जाते. त्यामुळे ती वाट हळूहळू बंद करण्याकडे पालकांचा कल असतो. स्पर्धा समग्र विकासाची नाही तर केवळ मार्काची राखण्यात आली आहे. त्यामुळे निपुण ध्येयात शारीरिक विकासाचा विचार केला आहे. त्यादृष्टीने अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा विचार देखील महत्त्वाचा असणार आहे. मुलांना बौद्धिक विकासाकडे घेऊन जायचे असेल तर त्याकरिता शारीरिक विकासाची पाऊलवाट समृद्ध करायला हवी. शारीरिक विकास उत्तम असेल तर अवतीभोवतीचा ताण, तणाव सहन करण्याची शक्ती निर्माण होईल. अलीकडे शारीरिक विकास नाही. त्यामुळे विद्यार्थी फार लवकर तणावाखाली येतात. त्यांना अभ्यासक्रमाचा बोजाही सहन होत नाही. मग अभ्यासक्रम अधिक पातळ करण्याचा विचार पुढे येतो. त्यापेक्षा आपणच शिक्षणातून समग्र विकासासाठीच जर पावले गतिमान केली तर अनेक समस्यांमधून सुटका होण्याची शक्यता अधिक आहे. ध्येय उत्तम असली तरी त्या दिशेने जाण्यासाठीचा प्रवास देखील तितकाच उत्तम व सुयोग्य असायला हवा. आपल्याकडे शालेयस्तरावर शारीरिक शिक्षणाचा विषय आहे. त्यासाठीच्या तासिका राखीव आहेत, अभ्यासक्रम आहे आणि मूल्यमापनही होते आहे. मात्र जितके महत्त्व बौद्धिक विकासासाठीच्या विषयांसाठी दिले जाते तितक्या प्रमाणात या विषयांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हेही वास्तव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शेजारील राष्ट्र जेव्हा पदकांची लयलूट करते तेव्हा आपल्या हाती फार काही नसते. तेव्हा मात्र पुन्हा एकदा क्रीडा शिक्षणाकडे वळत चर्चेला आरंभ करतो. प्रश्न निर्माण झाल्यावर उत्तर शोधण्याच्या प्रयत्नाने आपल्या हाती फार काही लागणार नाही आणि लागत नाही हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मुळात आपल्याला जर समृद्ध समाज व राष्ट्र निर्माण करायचे असेल तर त्याकरिता शालेयस्तरावर अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील. शारीरिकदृष्ट्या कुपोषित असलेला समाजाच्या मस्तकातून सशक्त विचारांच्या पेरणीची अपेक्षा कशी करता येईल? पालकांना आज जरी मार्क हवे असले तरी त्या मार्कांसाठी आणि पाल्याचे भविष्य अधिक निरामय, आनंदी करण्यासाठी बालकांच्या शारीरिक विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केवळ उत्तम आहार देऊन हे घडणार नाही तर त्यासाठी मैदानाशी नाते अधिक भक्कम करावे लागणार आहे. शेवटी पहिल्या आठ वर्षांत मेंदूची गरज म्हणून खेळाकडे पाहिले जावे. जेव्हा शारीरिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि एक अशक्त पिढी सतत घडविण्याचा मार्ग अनुसरतो. त्यातून समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. शेवटी उद्याचे समाज व राष्ट्राचे भविष्य हे समग्र शिक्षण विकासाच्या प्रक्रियेतूनच जाते याचा विचार करण्याची गरज आहे. ती वाट आपण चाललो नाही तर उद्याचा काळ आपल्यासाठी निरोगी, निरामय असण्याची शक्यता नाही.