पावलं पंढरीच्या दिशेने

गेली दोन वर्षं कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या दिनक्रमात मोठी उलथापालथ घडवून आणली.
पावलं पंढरीच्या दिशेने

दोन वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर यंदा निघणारी पायी वारी ही समस्त वारकऱ्यांसाठी एक आनंदयात्रा आहे. महाराष्ट्राला पायी वारीची प्रदीर्घ परंपरा आहे. तो विठ्ठलाशी, रमणीय ऋतूशी, निसर्गाशी आणि अध्यात्माशी जोडणारा धागा आहे. उराउरी भेटत एकमेकांच्या साथीने पुढे जाणारा तो एकतेचा सागर आहे. ही एकात्मता खचितच कुठे दिसावी... म्हणूनच यंदाचा हा योग आनंदनिधान ठरो हीच शुभकामना..!

गेली दोन वर्षं कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या दिनक्रमात मोठी उलथापालथ घडवून आणली. कधी नव्हे तो रस्त्यांनी शुकशुकाट अनुभवला, कामं ठप्प झाली. आता पुन्हा एक कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली असल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. पण आता पूर्वीपेक्षा स्थिती बदलली असून मोठ्या प्रमाणात झालेलं लसीकरण, वर्धक मात्रा घेणाऱ्यांची मोठी संख्या, पाळले जाणारे आरोग्यनिकष या सर्वांमुळे बाधितांची संख्या वाढली तरी आजाराचं गांभीर्य फारसं जाणवणार नाही अशी आशा वाटते. या आशेच्या आधारे अनेक भाविक यंदा पंढरीची वाट चालणार आहेत. पंढरीची पायी वारी करणं हा अनेक घरांमधला शिरस्ता आहे. आज्या-पणज्यापासून नातवंडांपर्यंत कित्येक पिढ्या खांद्यावर भागवत धर्माची पताका मिरवत ही वाट कापताना दिसतात. मुखात संतांचे अभंग, त्यांच्या नामाचा गजर, भजन-कीर्तनादी कार्यक्रमांनी शुद्ध होणाऱ्‍या वृत्ती, पावसामुळे शूचिर्भूत झालेल्या निसर्गाची साथ आणि त्या सावळ्या रुपाचं दर्शन घेण्याची आस म्हणजे पंढरीची वारी... लहान-थोर, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी आदी भेद मिटवणारी ही आनंदवारी यंदा मोठ्या दिमाखात निघणार आहे. ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष दुमदुमणार आहे. टाळ, पखवाज, वीणा बोलू लागणार आहेत. म्हणूनच या मनोरम सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण तयार राहायला हवं.

श्रीक्षेत्र देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज तर श्रीक्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा असतो. यासाठी असंख्य भक्तगणांची दाटी झालेली असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अव्याहतपणे चालत आली आहे. आजच्या आधुनिक युगात तर ही वारी हायटेक होत आहे. आधुनिक युगातली तरूणाई मोठ्या संख्येने आणि उत्साहाने वारीत सहभागी होत असल्याचं पाहून वारीचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवतं. वारी म्हणजे आनंदोत्सव, वारी म्हणजे चैतन्याचा झरा, वारी म्हणजे अमाप उत्साह आणि ऊर्जेचा स्त्रोत. ही ऊर्जा, हा उत्साह, हे समाधान पुढच्या वारीपर्यंत कायम राहतं. ‘एकदा तरी वारी अनुभवावी’ म्हणतात, ते उगीच नाही. वारीचा अनुभव याची देही, याची डोळा घ्यायला हवा. वारीमध्ये लाखोंचा भक्तसमुदाय उत्स्फूर्तपणे सहभागी होतो. सगळे वारकरी एकमेकांना ‘माऊली’ असं संबोधतात. एकमेकांच्या पायाला हात लावून नमस्कार करतात. माऊलीच आम्हाला वारीला घेऊन येते आणि पंढरपूरपर्यंत घेऊन जाते अशी त्यांची श्रध्दा असते. मुखाने ‘राम कृष्ण हरी’चा जप करत, भजन-कीर्तनात दंग होत सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने हा भक्तांचा महासागर ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता मजल-दरमजल करत चालत राहतो. तिकडे अवघं पंढरपूर या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतं. विटेवर उभं असणारं सावळं परब्रह्मही भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेलं असतं. वारकऱ्यांच्या स्नानासाठी चंद्रभागा खळखळ वाहत असते. वारकरी पंढरपूरमध्ये येऊ लागतात तसा विठुमाऊलीचा गजर घुमू लागतो. उत्तरोत्तर त्याचा नाद वाढत जातो.

संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात, मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो. आषाढी वारीसाठी या दोन्ही संतांच्या पालख्या पंढरपूरला जाण्यास निघतात. गेली दोन वर्षं त्या काही मोजक्या मंडळींसोबत वाहनातून नेण्यात आल्या. मात्र आता पालखीसोबत हजारोंचा जनसमुदाय असेल. या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देहू आणि आळंदीत हजारो, लाखो भक्तगण उपस्थित असतात. सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू असतो. दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. प्रसादाची दुकानं सजलेली असतात, इंद्रायणीचा काठ कोलाहल अनुभवतो.

आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागातून संतांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरमध्ये येत असतात. मुख्यत्वे आषाढी वारीच्या निमित्तानं मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामध्ये मोठ्या व्यापाऱ्‍यांबरोबर लहान व्यापारी, छोटे व्यावसायिक यांचा समावेश असतो. थोडक्यात, या काळात अनेकांच्या हाताला काम मिळतं. पंढरपूरमध्ये तर या काळातल्या विक्रीसाठी हळद, कुंकू, बुक्का, साखरफुटाणे, चुरमुरे यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्यासाठी व्यावसायिक, व्यापारी काही महिने आधीपासून तयारीत असतात. यावेळी हजारो, लाखो टन माल पंढरपूरमध्ये येत असतो. या काळात पेटी, तबला, पखवाज, विणा, टाळ यांनाही चांगली मागणी असते. या वाद्यांच्या दुरूस्तीवरही अनेकांचा भर असतो. त्यामुळे हे व्यावसायिकही काही महिने आधीपासून नवी वाद्यं तयार करण्याच्या तयारीला लागलेले असतात. किंबहुना, वर्षभराची उलाढाल याच वारीत होत असल्याचा अनेक व्यावसायिकांचा अनुभव आहे. त्यामुळे आषाढी वारीकडे असंख्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचं लक्ष लागलेलं असतं.

लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जागोजागी थाटण्यात आलेली हॉटेल्स, खानावळी, फळांची विक्री करणाऱ्‍या हातगाड्या, चहा, नाश्त्याची व्यवस्था करणारे यांना चांगलं उत्पन्न प्राप्त होतं. या काळात फळांची तसंच फराळाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या उत्पादकांनाही दिलासा मिळतो. शिवाय वाटेत ज्या ज्या गावी, वाड्या-वस्त्यांवर पालखी थांबते, तिथल्या किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायाची चांगली संधी प्राप्त होते. अनेकजण तर फिरतं हॉटेल घेऊन पालख्यांसोबतच राहत असतात. अलीकडे वारीच्या काळात पाण्याच्या पॅकबंद बाटल्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचं पाहायला मिळतं. शिवाय या सोहळ्यासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. त्या दृष्टीने वाहन चालक-मालकांनाही दिलासा मिळतो. गेली दोन वर्षं लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. हे नुकसानही कोट्यवधींच्या घरातलं आहे.

साहजिक सामान्य विक्रेती मंडळी यंदाच्या वारीच्या निमित्ताने कमाई करता येईल, अशी आशा बाळगून आहेत. पालखी सोहळ्याच्या वाटचालीत जागोजागी गणेश मंडळं, सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून अन्नदानाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून संबंधित व्यावसायिकांना काही प्रमाणात का होईना, कमाई करणं शक्य होतं. या साऱ्‍या बाबी लक्षात घेता यंदाची वारी अर्थचक्राला नव्याने गती देणारी ठरेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

‘ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या उक्तीनुसार वारकरी बांधव आहे त्या परिस्थितीत समाधान मानत आले आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या धीराने दोन वर्षांचा खडतर काळ काढला. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना केला. घरावर, व्यवसायावर येणारे अनेक आघात झेलले. मुलाबाळांच्या तोंडात घास घालण्यासाठी पडेल ते काम स्वीकारलं. आता तो काळ सरला आहे. पण आत्मिक समाधान राखल्यामुळेच ते मोठ्या संकटातून बाहेर पडल्यानंतरही समाधानी आहेत. आपलं दु:ख ते पचवू शकले आहेत. आता ते त्या सावळ्या विठुरायाला मनापासून प्रार्थना करत आहेत की हे विठुराया, अखिल मानवजातीवरचं कोरोनाचं संकट दूर केलंस. आता पुन्हा कधीही त्याची छाया आम्हावर पडू देऊ नकोस. चौथी लाट आली असल्याची- येत असल्याची शंका खोटी ठरु दे. सर्वत्र सुख-समाधान नांदू दे. भव्य-दिव्य अशा आषाढी वारी सोहळ्याला उपस्थित राहून, तुझं दर्शन घेऊन आम्हाला परमानंद मिळू दे. आता आम्हाला तुझ्या दर्शनाची आस लागली आहे. तुझं रूप डोळ्यात साठवत, नामस्मरण अखंड सुरू ठेवत आम्ही तुझ्या दरबारी येत आहोत.

सावळे सुंदर, रूप मनोहर |

राहो निरंतर हृदयी माझे ॥

हीच आमची तुझ्या चरणी मागणी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in