राजकीय बातम्यांचा अतिरेक थांबवा

सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे गाजर दाखविले
राजकीय बातम्यांचा अतिरेक थांबवा

हवामान खात्याने मान्सून लवकर सुरू होणार, असा अंदाज मे महिन्याच्या मध्यावरच व्यक्त करून शेतकऱ्यांना आशेचे गाजर दाखविले. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीप हंगामातील पेरण्यांची तयारी केली. मान्सून येत असल्याच्या, सक्रिय झाल्याच्या, पुढे सरकण्याच्या, अरबी समुद्रात व नंतर राज्यात धडकल्याच्या तारखाही सांगून झाल्या. पण, मान्सून काय आला नाही. नेहमी प्रमाणे त्यांचा अंदाज चुकला. हवामानतज्ज्ञही मग न्यायालयाप्रमाणे पुढच्या तारखा देत राहिले. खरीप हंगाम लांबत चालला. शेतकरी हवालदिल झाले. आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय बळीराजा पुढे राहिला नाही. सालाबादप्रमाणे बाजारात बोगस बी बियाणे, खते, शेती औषधे यांचा सुळसुळाट झाला. अस्मानी संकटाने मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला लुटण्यासाठी सुलतानी वृत्ती सरसावून बसल्या. त्यातच जाता जाता सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे गाजर दाखविले. माणसं त्याच्याकडे आशेने डोळे लावून बसली.

शेवटच्या घटका मोजत असलेल्या सरकारने सामान्य माणसाच्या प्रश्नाऐवजी शहरांची नांवे बदलण्यात त्यांची जीर्ण झालेली शक्ती खर्च करण्यात धन्यता मानली. त्यांच्या असंवेदनशीलतेने शेतकरी आणखीनच हतबल झाला. शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर व अन्य घटक अगतिकतेने पावसाची वाट बघत बसले. त्यांना चूल पेटण्याच्या काळजीने ग्रासून टाकले. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तिथं नियमित पाणी पुरवठा खंडित झाला. पुण्यासारख्या शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाऊ लागला. सर्व धरणातील पाणी पातळी कमी होत चालली. अशा बिकट परिस्थितीतच आषाढी एकादशी आली. महाराष्ट्रासह आसपासच्या आंध्र कर्नाटकातील ग्रामीण बहुजन कष्टकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंड्या आपापल्या भागातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. पांडुरंगाच्या दर्शनासाठी तहान भूक हरपलेले वारकरी हा एक कुतूहलाचा आणि आंतरिक ओढीचा मामला आहे. ती एक विलक्षण अनुभूती आहे. वारीचा आणि दिंडीचा संबंध समतेशी आहे. तिथं उच्च नीच, लहान मोठा, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. आषाढी वारी अन दिंड्या, त्यातील सहभाग यात बहुजनांना विलक्षण आनंद मिळतो. त्यातच सव्वीस जून रोजी लोकराजा राजर्षि शाहू महाराजांची जयंती आली. राजघराण्याचा व राजसत्तेचा वापर विषमता, अंधश्रद्धा, अज्ञान याना हद्दपार करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, विवेक, शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केला आहे. हे नव्या पिढीला कानी कपाळी ओरडून सांगण्याची गरज आहे, त्यासाठी काही मूठभर लोक प्रयत्न करत आहेत. शाहू जयंती ही उपेक्षितांची पर्वणी असते. तेच जयंती साजरी करतात. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. दीड महिन्यांनी तो समारंभ होणार आहे. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या, बलिदान दिलेल्या, घरावर तुळशीपत्र ठेऊन गोळ्या झेलणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही जाणीव कुणी निर्माण करायची हा प्रश्न आहे. आजच्या पिढीला स्वातंत्र्याविषयी मुद्दाम चुकीची माहिती दिलेली आहे. त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. अशा अत्यन्त गंभीर प्रसंगी माध्यमांची फार मोठी जबाबदारी असते. त्यांनी ती गांभीर्याने पार पाडाव्याची असते. शेतकऱ्यांपुढे असलेले गंभीर प्रश्न, लांबलेला मान्सून, पंढरीची समतेची दिंडी, शाहू महाराज जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यापैकी कशाचीही दखल आपल्या देशातील प्रसार माध्यमांनी व त्यांच्या वाहिन्यांनी घेतली नाही. त्यांनी कशालाही त्यांच्या बातम्यांत कुठेही स्थान दिले नाही. त्याचा साधा उल्लेखही केला नाही. प्रिंट मीडियाने दखल घेतली. ती एक चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या मर्यादा आहेत.

इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांचं काय करायचं ? प्रसार माध्यमांना समाजाचा आरसा म्हंटलं जातं. या आरशात समाजाचं प्रतिबिंब कुठं दिसेचना. स्पष्ट राहू दे; पण पुसट-फिक्कट सुद्धा प्रतिबिंब दिसेना. त्याऐवजी राजकारणातील विदूषकांच्या मर्कटलीलाना अवास्तव प्रसिध्दी दिली गेली. आमदारांची फोडाफोडी, गद्दारी, बंड, कुरघोडी या सामान्य माणसाच्या भाकरीशी व भावनांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या गोष्टीची प्रसार माध्यमात व समाज माध्यमात नको तितकी चर्चा सुरू झाली व ती सतत सुरू राहिली. समाजाच्या जीवन मरणाचे प्रश्न, त्यांच्या भावना, त्यांच्या श्रद्धा याचा त्यांनी अजिबात विचार त्यांनी केला नाही. राज्यातल्या बारा कोटी जनतेचा ज्याच्याशी संबंध आहे त्याची कधी चर्चाच झाली नाही. जनतेच्या जीवनाशी, त्यांच्या समस्यांशी, प्राधान्यक्रमाशी संबंध नसलेल्या गोष्टीच्या चर्चेने अक्षरशः उच्छाद मांडला. सत्ता आणि राजकारण हेच एकमेव आपल्यासमोर प्रश्न आहेत असेच चित्र निर्माण केले गेले. त्याचा अतिरेक झाला. त्याचा उबग आला. त्या बातम्या नको वाटू लागल्या. त्यांची शिसारी आली. हे असंच सुरू राहिलं, तर लोक आपले दूरदर्शन संच आणि मोबाईल फोडून टाकतील की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. सामान्य माणसाची सहनशक्ती संपत चालली आहे. प्रसार माध्यमांना हात जोडून विनंती आहे, की बाबांनो हा राजकीय पोरखेळ, राजकारण्यांचे विदूषकी चाळे याना त्यांच्या मर्यादित प्रसिद्धी द्या. त्यांचा अतिरेक टाळा. सामान्य माणसाच्या भाकरीचे प्रश्न, त्यांच्या पोरांच्या नोकरीचे प्रश्न, त्यांच्या दैनंदिन जीवनातील जगण्या-मरण्याचे प्रश्न यांना ऐरणीवर आणा. जनतेच्या भावना, श्रद्धा, भक्ती याची नाळ पंढरीच्या वारीशी व पायी दिंडीशी जोडली गेली आहे. पंढरीची वारी अन त्यातली समता लोकांच्या समोर आली पाहिजे यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे आवश्यक व अपेक्षित आहे.

शाहू महाराजांच्यासारख्या युगपुरुषांचे कार्य नवीन पिढीसमोर आणायला पाहिजे त्याला प्रसिध्दी द्या. आमचा राजकीय बातम्यांना विरोध नाही. त्यांच्या अवास्तव अतिरेकाला आमचा आक्षेप आहे. त्याचा सातत्याने मारा करू नका. एवढेच सांगणे आहे. राजकारण समाजासाठी केलेले असते. सत्ता समाजासाठी येतात व जातात. समाज हाच त्यांचा केंद्रबिंदू असला पाहिजे. समाजपरिवर्तनासाठी सत्ता असते, राजकारण असते, त्यातल्या कोलांटउड्या याही समाजासाठी असतात. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी समाज केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील सात दिवस आणि दिवसातील चोवीस तास राजकीय बातम्या दाखविणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे. त्यांचं दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बदबडणे या त्यास विश्लेषण म्हणणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत. राजकीय मर्कटलीला आणि सुमार दर्जाच्या नेत्यांचे विदूषकी चाळे हे जनतेसमोरचे एकमेव प्रश्न नाहीत. याचे भान ठेवून काम करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास प्रसार माध्यमांची विश्वासार्हता गमावून बसण्याची वेळ येईल हे लक्षात ठेवा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in