महायुतीचे बलस्थान!

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. व्यावहारिक राजकारणाचे हे एक अनोखे संगम आहे.
महायुतीचे बलस्थान!

-ब्रिजमोहन श्रीवास्तव

मत आमचेही

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. व्यावहारिक राजकारणाचे हे एक अनोखे संगम आहे. ज्यामध्ये तिन्ही नेत्यांचे संयुक्त नेतृत्व राज्याच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन देत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये तीन प्रमुख मजबूत शिल्पकार म्हणून उदयास आले आहेत, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. मोदींच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्रातील संयुक्त नेतृत्व देशाच्या व राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी समर्पित आहे. राज्यातील अशा परिस्थितीवर चर्चा होणे गरजेचे आहे.

अनेक दशकांपासून राज्यातील नेते उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची राजकीय सक्रियता महाराष्ट्राने बघितली व अनुभवली आहे. राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करणे हा त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राबाहेर राजकारण करण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. १९८१ मध्ये पुणे को-ऑपरेटिव्ह बँकेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तेव्हापासून त्यांची राजकीय परिपक्वता, व्यावहारिक दृष्टिकोन आणि स्पष्टवक्तेपणा सर्वांनीच बघितला व अनुभवला आहे. त्यांचा हा गुण आज महायुतीचे बलस्थान ठरत आहे. अजितदादा पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच ऊर्जा मिळते. कोविड-१९ च्या काळात अजितदादा पवारांची झटपट निर्णय घेण्याची क्षमता व आर्थिक व्यवस्थापन देशाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, अजितदादा पवार यांची कोविडदरम्यान जटिल परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता पाहून त्यांचे कौतुक केले.

राज्याच्या या त्रिमूर्तीचे दुसरे नायक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ज्यांना सर्वांना सोबत घेण्याची कला अवगत आहे आणि परिणामी ते युतीचा धर्म पाळत आहेत. शिंदे यांच्या कार्यकाळात नागरी विकास प्रकल्प आणि उत्तम कचरा व्यवस्थापनावर बरीच कामे झाली आहेत. सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून शिंदे हे नेहमीच उपेक्षित समुदायांसाठी काम करतात. त्यांची धोरणे सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देतात.

त्याचप्रमाणे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत, त्यांनी राज्याचे भवितव्य घडवण्यासाठी दिलेले योगदान नेहमीच महाराष्ट्रासाठी दिशा देणारे ठरले आहे. त्यांच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ या आर्थिक सुधारणांच्या मोहिमेने, नवीन गुंतवणूक आकर्षित झाली व औद्योगिक विकासाला चालना मिळाली. यामुळे राज्यात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.

या तिन्ही नेत्यांच्या कार्यपद्धतीचे आपण मूल्यमापन केले असता, महाराष्ट्राच्या हितासाठी व विकासासाठी त्यांनी आपली राजकीय विचारधारा आडवी येऊ दिली नाही, असे आपल्याला लक्षात येते. या संयुक्त नेतृत्वामुळे महाराष्ट्र विकासात भरारी घेत आहे. त्यामुळेच राज्याचा ३३ लाख कोटी रुपयांचा जीडीपी येत्या काही वर्षांत सातत्याने वाढीच्या मार्गावर आहे. महायुतीने राज्यात स्थिर सरकार देऊन, उद्योजकांना गुंतवणूकदार होण्यासाठी प्रेरित केले आहे. राज्यातील तिन्ही नेत्यांना माहिती आहे की, महाराष्ट्र हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे महत्त्वाचे राज्य असून त्याला विशेष स्थान आहे.

युती सरकारमधील तिन्ही पक्षांना (राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप) आपापल्या हितसंबंधांचा समतोल राखणे तेव्हाच शक्य झाले, जेव्हा तिन्ही नेत्यांनी एकमताने राज्याच्या विकासाचा मुहूर्त साधला. आम्हाला कल्पना आहे की, प्रत्येक पक्षाची स्वतःची प्राधान्ये असतात, परंतु युतीसाठी एकमत निर्माण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण विविध विचारधारा असूनही एकोपा राखणे हे युतीत नेहमीच एक आव्हान असते, ज्याला केवळ सखोल राजकीय समजूतदारपणा दाखवून सामोरे जाता येते.

या तिन्ही नेत्यांकडे विकासाची समान दृष्टी आहे आणि ती पूर्ण करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे आणि ही भाग्याची बाब आहे. कारण महाराष्ट्र हे नेहमीच देशाचे भविष्य घडविण्याचे काम करणारे राज्य आहे. अशा स्थितीत सरकारची धोरणे तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविणे हे एक आव्हान आहे.

महाराष्ट्रात जलद शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार, वाहतूक सुविधा, सर्वसामान्य गरीबांसाठी घरे आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल साधणे, हे अवघड काम आहे. या तिन्ही नेत्यांना या क्षेत्रातील उणिवा आणि बलस्थाने अधिक चांगल्या प्रकारे समजतात. त्यामुळेच या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याचे परिणाम संपूर्ण राज्यात दिसून येत आहेत.

सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींचा विस्तारासाठी महाराष्ट्र सरकारचे एकत्रित प्रयत्न हे लक्षणीय यश आहे. पर्यावरण संरक्षणासह विकासाचा समतोल साधणे कठीण आहे, हे आपल्याला माहीत आहे. नागरी सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कडक कारवाईमुळे शहरी भागातील गुन्ह्यांना आळा बसला आहे व राज्यात जातीय सलोखा आणि शांतता आहे.

महाराष्ट्राच्या सीमा अनेक राज्यांना लागून आहेत, ज्यात पाणी वाटप करार, वाहतूक नेटवर्क आणि प्रादेशिक विकासासाठी सहकार्य आदींसाठी केंद्र सरकारची मदत अत्यावश्यक ठरते. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य आणि केंद्राचे चांगले संबंध असणे आवश्यक आहे व ही बाब अजितदादा पवार चांगलेच जाणतात.

महाराष्ट्रातील महायुती सरकारचे तीन नेते एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व पाहिल्यावर असे दिसते की, ते एकजुटीने काम करीत असून आणि महाराष्ट्राच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. त्यातून राजकीय आघाडीची नवीन दिशा देशात तयार केली जात आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे सतत समर्थन मिळत आहे व त्याला गती देण्यासाठी अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल संपूर्ण ताकदीने काम करत आहेत.

लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अधिकाधिक उमेदवार विजयी झाल्याचा फायदा महाराष्ट्राला होणार, हे राज्यातील मतदारांना माहीत आहे. त्यामुळेच एनडीएच्या उमेदवारांना जनतेची साथ मिळत आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी विकासाच्या नवीन पर्वाला सुरुवात केली आहे. येत्या ४ जूनला सगळीकडे आनंद उत्सव आपल्या सर्वांना दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र!!

(लेखक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय

सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in