हार नही मानूंगा, रार नही ठानूंगा

महाराष्ट्रासह काही राज्यांत आमच्या काही जागा कमी झाल्या असल्या तरी अनेक राज्यांत शंभर टक्के यश प्राप्त केले आहे.
हार नही मानूंगा, रार नही ठानूंगा

केशव उपाध्ये

विश्लेषण

महाराष्ट्रासह काही राज्यांत आमच्या काही जागा कमी झाल्या असल्या तरी अनेक राज्यांत शंभर टक्के यश प्राप्त केले आहे. जिथे अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही तेथे नेमक्या काय चुका झाल्या याचा तपशीलवार अभ्यास आमचे नेतृत्व करेल आणि त्या चुका दुरुस्त करून आम्ही जनतेला सामोरे जाऊ. काही हादरे बसले हे खरे आहे. पण अशा लहानमोठ्या मताधिक्याने आम्ही स्वस्थ बसत नसतो. सलग तीन निवडणुका बहुमतांनी जिंकणे ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

हत्तीला ओळखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातक कथेतील सहा आंधळ्यांप्रमाणे या लोकसभा निवडणुकीचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे, हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मतदारांनी दिलेल्या निकालाचा अर्थ लावण्याची घाई अनेकांना लागली आहे. राज्यात मतदारांनी जो काही कौल दिला त्याचा आधार घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदारांनी डावलल्याची चर्चा जाणीवपूर्वक घडवली जात आहे. या गृहितकाला किंचितही महत्त्व देण्याचे काहीच कारण नाही.

केवळ मतदानाच्या आकडेवारीचा अभ्यास केला तरी मतदारांनी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच स्पष्ट कौल दिल्याचे आढळते. विभिन्न विचारसरणीचे अनेक विविध पक्ष एकत्र येत ओढूनताणून केलेली आघाडी, संविधान बदलले जाईल अशी मतदारांना घातलेली भीती, धार्मिक आधारावरील फतवे ही सारी विरोधकांची युद्धनीती पाहता भाजपने २४० जागा जिंकल्या आहेत, हेच अधोरेखित करावे लागेल. पूर्वीच्या निवडणुकांचे निकाल आणि या निवडणुकीचे निकाल यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर कोणाची हार आणि कोणाची जीत हे लख्खपणे स्पष्ट होते.

एकूण मते आणि जिंकलेल्या जागा याआधारेच निवडणुकीच्या यशाचे मूल्यमापन व्हायला हवे. मतदारांनी नाकारणे म्हणजे काय हे १९७७, १९८०, १९८९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दिसून आले. १९८४ मध्ये काँग्रेसने ४१५ जागा जिंकल्या होत्या. १९८९ मध्ये काँग्रेसच्या तब्बल २२० जागा घटत त्या १९५ वर आल्या. २०२४ मध्ये भाजपची मते केवळ अर्धा टक्क्याने घटूनही जागा मात्र ६३ ने कमी झाल्या आहेत. १९७७ मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी या दोघांना पराभूत केले होते. गरिबी हटावचा नारा देत इंदिरा गांधींनी ३०० जागा जिंकत विजय मिळवला होता. मात्र १९७७ मध्ये काँग्रेसच्या जागा २०० ने घटल्या. यालाच पराभव किंवा मतदारांनी नाकारणे म्हणतात.

२०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसला केवळ ४२ जागा मिळाल्या होत्या. २००९ मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी २८.५५ होती, तर भाजपची १८.८० होती. २०१४ मध्ये काँग्रेसच्या पदरात १९.३१ टक्के मते पडली, तर भाजप तब्बल ३१ टक्क्यांवर पोहोचली. २०१४ मध्ये काँग्रेसची टक्केवारी नऊने घसरली आणि २००९ च्या निवडणुकीत २०६ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला १५० हून अधिक जागा गमवाव्या लागल्या होत्या. जागा आणि मतांच्या टक्केवारीतून मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचे स्पष्ट झाले होते. २०१९ मध्ये भाजपची मते ३१ वरून सहा टक्क्यांनी वाढत ३७.७ टक्के झाली, तर काँग्रेसच्या टक्केवारीत पाव टक्क्याची वाढ झाली. २०१४ ला १९.३१ टक्के मते मिळवणाऱ्या काँग्रेसची पुढील निवडणुकीत मात्र १९.६७ टक्केच मते वाढली होती. यावेळी भाजपची मते अर्ध्या टक्क्याने घटून ती ३६.५६ टक्के होती. भाजपच्या जागा मात्र ३६ ने कमी होत ३०३ वरून २४० वर आल्या. याचवेळी काँग्रेसची टक्केवारी पावणेदोन टक्क्याने वाढूनही जागा मात्र ४६ वरून वाढत ९८ वर पोहोचल्या. एकंदर काय, तर सर्व विरोधी पक्ष एकवटले तरी २०१९ च्या तुलनेत भाजपची मते केवळ अर्धा टक्क्याने घटली. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ नऊ जागा मिळणारा पक्ष मात्र भाजपला मतदारांनी नाकारल्याची बोंब ठोकत आहे.

राज्यात महायुतीला नाकारल्याचा कांगावा पूर्णपणे चुकीचा आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांमध्ये दोन लाखांचा फरक आहे. महायुतीला ४३.६० तर महाविकास आघाडीला ४३.९२ टक्के मते पडली आहेत. आघाडीला अडीच कोटी तर महायुतीला २ कोटी २८ लाख मते पडली. केवळ अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी मतांचा फरक असूनही महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. मुंबईत दोन लाख मते वाढूनही भाजपने जागा गमावल्या. आठ जागा चार टक्क्यांपेक्षा कमी मतांनी गमावल्या. ही आकडेवारी भाजप आणि महायुतीला मतदारांनी नाकारल्याचा केवळ दुष्प्रचार असल्याचेच स्पष्ट करते.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रचारासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात एकूण ११५ प्रचार सभा घेत पक्षाची भूमिका समर्थपणे मतदारांसमोर मांडली. बावनकुळे यांनी संघटना स्तरावर १४७ बैठका आणि शंभरहून अधिक अन्य बैठका घेतल्या. त्याचबरोबर ६९ जाहीर सभा घेतल्या. महाराष्ट्रासह काही राज्यांत आमच्या काही जागा कमी झाल्या असल्या तरी अनेक राज्यांत शंभर टक्के यश प्राप्त केले आहे. जिथे अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही तेथे नेमक्या काय चुका झाल्या याचा तपशीलवार अभ्यास आमचे नेतृत्व करेल आणि त्या चुका दुरुस्त करून आम्ही जनतेला सामोरे जाऊ. काही हादरे बसले हे खरे आहे. पण अशा लहानमोठ्या मताधिक्याने आम्ही स्वस्थ बसत नसतो. सलग तीन निवडणुका बहुमतांनी जिंकणे ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल. १९८४ साली दोन जागांपासून सुरू झालेला आमचा प्रवास ३५ वर्षांत ३०० च्या पलीकडे पोहोचला होता. प्रत्येक निवडणुकीत मिळणारे धडे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच निर्धाराने आमची पुढील वाटचाल सुरू राहील. अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दात सांगायचे तर,

हार नही मानूंगा, रार नही ठानूंगा

काल के कपाल पे लिखता मिटाता हूं

गीत नया गाता हूं

logo
marathi.freepressjournal.in