
देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
पहलगाम हल्ल्यानंतर जगभरात भारताची भक्कम बाजू मांडणे आणि पाकिस्तानचे पितळ उघडे पाडणे, यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ सध्या देशोदेशीचे दौरे करीत आहे. या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला कितपत यश आले आहे? पाकिस्तानवर त्याचा काय आणि किती परिणाम होत आहे? याचा विचार करणे आवश्यक आहे.
काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर अमानुषपणे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताच्या खूपच जिव्हारी लागला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसून आले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले. भारतीय सैन्याने अत्याधुनिक आयुधांच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी स्थळे नष्ट केली; मात्र, तडकाफडकी शस्त्रसंधी करण्यात आली. जी आजही कायम आहे. या शस्त्रसंधी संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. असो. भारताची भक्कम बाजू आणि पाकिस्तानचा काळा चेहरा तसेच कुटील कारवाया यांचा पाढा वाचण्यासाठी आणि किंबहुना तो देशोदेशी मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले. एकूण सात शिष्टमंडळे कुठकुठल्या देशांमध्ये जातील हे सुद्धा निश्चित करण्यात आले. देशावरील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि तातडीने खासदारांच्या शिष्टमंडळाचे दौरे सुरू झाले. आज या दौऱ्यांना एक आठवडा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यांनी नेमके काय साधले? याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
युरोप, आखात, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया अशा जगाच्या विविध भागांमध्ये हे दौरे होत आहेत. काही शिष्टमंडळाचे नेतृत्व हे विरोधी पक्षातील खासदारांकडे आहे, तर काही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे. गेल्या शुक्रवारी हे दौरे सुरू झाले. तसेच भारतीय पंतप्रधानांचे देशोदेशी अत्यंत जंगी स्वागत केले जाते, मिठी मारून त्यांच्याशी जवळीक साधल्याचे दिसून येते. शिवाय त्यांच्या दौऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर अनेक देशांनी भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मानानेही गौरविले आहे. त्यामुळे भारताचा देशोदेशी अत्यंत मोठा दबदबा आहे, असेच चित्र सर्वसाधारणपणे रंगविण्यात आले आहे. मात्र, ते किती खरे किंवा खोटे आहे? याचा प्रत्यय सध्या खासदार शिष्टमंडळाला आणि त्यांच्या दौऱ्यातून देशवासियांना दिसून येत आहे. खासदारांनी जे फोटो प्रसारित केले आहेत त्यातून दिसून येते की, ते विमानतळावर आहेत, तेथून बाहेर पडत आहेत, आलिशान हॉटेलमध्ये जात आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि चिंताजनक बाब म्हणजे या सातही शिष्टमंडळांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये त्या देशाचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्री यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतल्याचे दिसत नाही. त्याचे फोटो दिसत नाहीत. असे का झाले? जर भारताचे जगभरात एवढे वर्चस्व आहे, तर मग तेथील राष्ट्रप्रमुखांनी भारतीय शिष्टमंडळाची योग्य ती दखल घेतली नाही का? नसेल तर याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
खासदार शिष्टमंडळाच्या दौऱ्यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ज्या स्वरूपाची माहिती दिली जात आहे, त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, हे शिष्टमंडळ कुणाकुणाला भेटत आहे. केवळ तिथल्या प्रशासनातील अधिकारी, सरकारचे सल्लागार, माजी किंवा निवृत्त अधिकारी किंवा मान्यवर अथवा तेथील काही चर्चित व्यक्तिमत्त्व अशांची भेट घेतली जात आहे. त्यांच्यासमोर भारताची बाजू मांडली जात आहे. यातून नेमके काय साध्य केले जात आहे? खरंतर तेथील राष्ट्रप्रमुख, उपराष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री किंवा त्यांच्यानंतर जी महत्त्वाची व्यक्ती आहे त्यांची भेट घेणे, त्यांना माहिती देणे, पाकिस्तानचा बुरखा फाडणे आवश्यक आहे; मात्र ते होताना दिसत नाही. तसेच यासंदर्भात कोणीच काहीही बोलायला तयार नाही! शिष्टमंडळाकडून त्या- त्या ठिकाणी पत्रकार परिषदेचेही आयोजन केले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परदेशातील माध्यमांमध्ये या शिष्टमंडळाचे दौरे किंवा पत्रकार परिषदा यांचे विस्तृत वार्तांकन किंवा पाकिस्तानच्या कारभाराचे वाभाडे काढणारे लेख असे काहीच प्रसिद्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ या शिष्टमंडळांचा दौरा पूर्णपणे अपयशी होत आहे का? की हे शिष्टमंडळ पर्यटनासाठी दौरे करीत आहे?
शिष्टमंडळाच्या एकूण दौऱ्याचे स्वरूप, कामकाज आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद तसेच यश पाहता खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. हे शिष्टमंडळ पाठवून आपण नेमके काय साध्य केले? जर त्या त्या देशातील कमी महत्त्वाच्या लोकांना भेटायचे असेल आणि त्यांना माहिती द्यायची असेल तर मग तेथील भारतीय दूतावासही ते काम करू शकत नाही का? तेथील भारतीय दूतावासावर आपण एक प्रकारे अविश्वास दाखवतो आहोत का? जर पत्रकार परिषद घेऊनच बाजू मांडायची आहे तर आपले भारतीय राजदूत ते काम तेथे करू शकतात. किंबहुना त्यांच्या कार्याचा तो एक भागच आहे. तसेच भारतीय शिष्टमंडळाला त्या त्या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा उपराष्ट्रप्रमुख हे जर वेळ देत नसतील तर हे नेमके कशाचे द्योतक आहे? भारतीय विदेश नीतीचे आपण अतिशय मोठाले डांगोरे पिटतो, पण जेव्हा या नीतीचे अपयश समोर येते, त्यावेळी मात्र सारेच मूग गिळून गप्प बसतात. जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या देशाला जर अशा पद्धतीची वागणूक मिळणार असेल तर या संदर्भात आपण आता तरी काही शहाणे होणार आहोत का?
ऑपरेशन सिंदूरवेळी किंवा त्यानंतर तसेच आता खासदारांची शिष्टमंडळं दौरे करत असतानाही एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केलेला नाही किंवा त्या संदर्भात त्यांची कठोर भूमिका मांडलेली नाही. एवढेच काय, आम्ही भक्कमपणे भारताच्या पाठीशी आहोत असेही म्हटलेले नाही. खासदारांच्या शिष्टमंडळ दौऱ्यानंतर आतापर्यंत एकाही देशाने प्रसिद्धीपत्रक, निवेदन किंवा इतर काही विधान प्रस्तुत केलेले नाही. याचा अर्थ काय होतो? हा दौरा यशस्वी झाला असे म्हणायचे का? याउलट एवढे सारे दौरे करूनही जर पाकिस्तानवर त्याचा काहीच परिणाम होणार नसेल तर एक प्रकारे भारतालाही त्याचा फायदा झालेला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे ज्या भारतीय पंतप्रधानांचे देशोदेशी अतिशय जंगी स्वागत केले जाते, तसे आजवर कुणाही पंतप्रधानांचे करण्यात आले नाही अशा पद्धतीची प्रतिमा आणि वातावरण निर्मिती केली जाते ते भारतीय पंतप्रधान सध्या परदेश दौरा का करत नाहीत? पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी तेच का मैदानात उतरत नाहीत? याउलट ते भारतातील विविध शहरांमध्ये रोड शो, जाहीर सभा घेत आहेत. याचा अर्थ नेमका काय आहे? जर त्यांचा करिष्मा एवढा मोठा आहे तर त्यांनी विविध देशांमध्ये त्या त्या देशाच्या प्रमुखांची भेट घेऊन भारताची भक्कम बाजू तसेच पाकिस्तानच्या कुटील कारवाया का मांडल्या नाहीत? अनेक राष्ट्रप्रमुख हे भारतीय पंतप्रधानांचे खूप जवळचे मित्र आहेत, असे बोलले जाते. मग या जवळच्या मित्रांनी भारतीय शिष्टमंडळाला वेळ का दिला नाही? किंवा हे मित्र आणि भारतीय पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे तरी संपर्क का झाला नाही? त्यांनी भारताची बाजू का स्वीकारली नाही? पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले नाही? आपल्या भारतीय विदेश नीतीबाबत अंगुलीनिर्देश करणाऱ्या या बाबी खरेच खूप चिंताजनक आहेत.
भारतीय पंतप्रधान रोड शो, मन की बात, जाहीर सभा, उद्घाटन,भूमिपूजन यामध्ये व्यस्त असताना पाकिस्तानी पंतप्रधान मात्र कामाला लागले आहेत. त्यांनी विविध देशांचे दौरे सुरू केले आहेत. तुर्की, इराण यासह अन्य देशांच्या दौऱ्यावर ते निघाले आहेत. तसेच पाकिस्तानी मंत्रिमंडळातील सदस्य नुकतेच चीनलाही जाऊन आले आहेत. म्हणजेच दहशतवाद्यांना बळ देणारा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आपली बाजू बळकट करण्यासाठी कामाला लागला आहे. पाकिस्तानचा इतिहास हा नेमका काय? आणि कसा आहे? याबाबत फार काही बोलण्याची गरज नाही. असे असतानाही जगातील १९४ देशांपैकी एकही जण पाकिस्तानला दोषी ठरवत नसतील किंवा पाकिस्तानविरोधात साधे निवेदनही प्रसिद्ध करत नसतील तर याचा अर्थ काय? गेल्या सात दशकांमध्ये भारतीय नेते, नेतृत्व, विचारधारा आणि परंपरा यांचा जगभरात दबदबा असल्याचा दावा वारंवार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात भारताची देशोदेशी काय किंमत आहे? हे भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळ दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे, असे म्हणता येईल का? नेमके खरे चित्र कोणते? भारतीय पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यात त्यांचा जयघोष करणारे फोटो, व्हिडीओ की सध्या शिष्टमंडळाच्या होणाऱ्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद?
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व मुक्त पत्रकार.
bhavbrahma@gmail.com