भांडवली बाजाराशी निगडित आयुर्विमा पॅालिसी

गुंतवणुकीप्रमाणे भांडवली बाजारातून मिळणारा दीर्घकालीन परतावा असे दोन्ही लाभ हे अशा पॉलिसीचे उद्दिष्ट असते
भांडवली बाजाराशी निगडित आयुर्विमा पॅालिसी

आयुर्विम्याच्या अनेक प्रकारांपैकी एक म्हणजे शेअर बाजार, मनी मार्केट, इत्यादींशी निगडित असलेली आयुर्विमा पॉलिसी. काही वर्षांपूर्वी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची ‘युलिप’ ही अतिशय लोकप्रिय योजना याच प्रकारातली होती. आयुर्विमा कवच आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीप्रमाणे भांडवली बाजारातून मिळणारा दीर्घकालीन परतावा असे दोन्ही लाभ हे अशा पॉलिसीचे उद्दिष्ट असते; मात्र मुंबई ग्राहक पंचायतीकडे या पॉलिसीबद्दल ज्या तक्रारी येतात त्यातून समजते की, पॉलिसीधारकाला या पॉलिसीच्या रचनेबद्दल काहीही माहिती नसते, भांडवली बाजारातील धोके माहिती नसतात. त्यामुळे प्रथम या पॉलिसीच्या रचनेबद्दल माहिती करून घेऊ या.

इतर पॉलिसीप्रमाणेच येथेही विम्याचा हप्ता भरावा लागतो. हा हप्ता आपल्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, वार्षिक इत्यादी पर्यायांनी भरता येतो. एक रकमी हप्त्याचाही पर्याय आहे; पण ही रक्कम साधारणत: रु. एक लाख अथवा अधिक असते; मात्र बाजाराशी निगडित नसलेल्या विमा पॉलिसीचा हप्ता आणि बाजाराशी निगडित असलेल्या विमा पॉलिसीचा हप्ता यात एक मूलभूत फरक आहे. पहिल्या प्रकारच्या पॉलिसीत आपण भरलेला पूर्ण हप्ता जमा केला जातो; तर दुसऱ्या प्रकारच्या पॉलिसीत आपण भरलेल्या प्रत्येक हप्त्यातून काही शुल्क वसूल करून उरलेली रक्कम भांडवली बाजारात गुंतवली जाते; मात्र ही गुंतवणूक कशा प्रकारे करावी हे सांगण्याचे थोडे स्वातंत्र्य पॉलिसीधारकाला असते. त्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. पॉलिसीधारकाने ज्या पर्यायाची निवड केली असेल त्यानुसार हप्त्याच्या काही टक्के रक्कम शेअर बाजारात, काही टक्के रक्कम कंपनी रोख्यांत, तर उरलेली रक्कम सरकारी कर्जरोखे, मनी मार्केट, यामध्ये गुंतवली जाते. म्युच्युअल फंडातील ‘नक्त मालमत्ता मूल्य (NAV)’ संकल्पनेनुसार येथेही दिवसअखेरच्या मूल्यानुसार युनिट्स खरेदी केली जातात.  

आता गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. विमा कंपन्या ढोबळ मानाने तीन प्रकारे गुंतवणूक करतात. पहिला ‘आक्रमक’ (Aggressive) प्रकार. यात आपण भरलेल्या हप्त्याच्या जास्तीत जास्त ८० टक्के इतकी रक्कम शेअर बाजारात तर उर्वरित २० टक्के इतकी रक्कम रोखे, मनी मार्केट, इत्यादींमध्ये गुंतवली जाते. या प्रकारात धोका जास्त; पण चांगला परतावा मिळण्याचीही शक्यता असते. दुसरा प्रकार म्हणजे ‘मिश्र’ किंवा ‘मध्यम मार्गी’ (Hybrid/Moderate).  यात आपण भरलेल्या हप्त्याच्या ५० ते ६० टक्केपर्यंत रक्कम शेअर बाजारात, साधारणत: ३० ते ४० टक्के रक्कम  कंपन्यांच्या रोख्यात आणि १० ते २० टक्के रक्कम सरकारी रोख्यात गुंतवली जाते. यात धोका कमी आणि परतावा साधारण असतो. तिसरा प्रकार ‘सुरक्षित’ (conservative). यात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत रक्कम सरकारी रोखे, सरकारी ट्रेजरी बिले, अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते. २० ते ३० टक्के रक्कम कंपन्यांच्या रोख्यात तर १० ते २० टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. हा प्रकार सर्वात सुरक्षित असला, तरी परताव्याची रक्कम कमी असते. पॉलिसीधारकाचे सध्याचे वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, शेअर बाजारातील धोका पत्करायची तयारी, गुंतवणुकीचे उद्दिष्ट, इत्यादी गोष्टींचा आढावा घेऊन यापैकी एक प्रकार निवडावा लागतो. 

यातील सर्वात गुंतागुंतीचा आणि सहसा न सांगितला जाणारा किंवा मोघमपणे सांगितला जाणारा भाग म्हणजे अशा पॉलिसीसाठी दरवर्षी भरावे लागणारे ‘शुल्क’. हे शुल्क पॉलिसीधारक भरत असलेल्या हप्त्यामधून परस्पर वसूल केले जाते. सुरुवातीला हप्ता भरल्यावर त्यातील किती भाग कोठे गुंतवावा, याची विगतवारी करण्यासाठी शुल्क लावले जाते. दुसरे, पॉलिसी व्यवस्थापन शुल्क. शेअर बाजार जर अवाजवीरीत्या फुगला असेल, किंवा ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जात आहे, त्यांचा भाव चांगल्यापैकी वाढला असेल, तर विमा कंपनीचे फंड व्यवस्थापक ही गुंतवणूक काढून दुसरीकडे वळवतात; यालाच फंड व्यवस्थापन म्हणतात. या व्यवस्थापनासाठी म्हणून हे शुल्क आकारले जाते. पॉलिसीधारकाने वयाच्या कितव्या वर्षी पॉलिसी घेतली, त्यानुसार त्याचे उर्वरित आयुष्यमान किती आहे, ते एका विशिष्ट पद्धतीने काढले जाते.  त्यासाठीही काही ठरावीक शुल्क आकारले जाते.  प्रत्येक शुल्क एकतर पॉलिसीधारक भरत असलेल्या हप्त्यामधून वळते केले जाते किंवा त्याच्या खात्यात जमा झालेल्या युनिट्समधून युनिट्सच्या रूपात वळते केले जाते. अशा वेळी आपली जमा युनिट्स तेवढ्याने कमी होतात. त्यामुळे या सर्व शुल्कांची व्यवस्थित माहिती करून घेणे आवश्यक आहे.

विमाधारकाने हप्ता भरल्यानंतर हप्ता भरल्याचा दिनांक, हप्त्याची रक्कम, त्यापैकी किती रक्कम अथवा युनिट्स शुल्कापोटी वसूल केली, कोणत्या मूल्याला युनिट्स जमा झाली, विम्याची आत्तापर्यंतची एकूण रक्कम किती, गुंतवलेल्या युनिट्सचे सध्याचे बाजारमूल्य, इत्यादी सर्व तपशील विमा कंपनीने विमाधारकाला देणे बंधनकारक आहे.

पुढील भाग गुंतवणुकीचा. ‘शेअर बाजार इतका वर गेला आहे, तरी मला मिळणारे पैसे इतके कमी कसे?’ असा एक सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो. मुळात सर्व रक्कम फक्त शेअर बाजारात नव्हे, तर वर म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणीही गुंतवली जाते. त्या ठिकाणी शेअर बाजारसारखे किंवा तितके चढ-उतार नसतात. त्यामुळे गुंतवणुकीचा मोठा भाग जर सरकारी किंवा कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवला असेल, तर त्यातून मिळणारा परतावाही कमी प्रमाणात असतो. जरी गुंतवणुकीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला असेल, तरी ती गुंतवणूक कोणत्या कंपन्यांत आहे, त्यावरही परतावा अवलंबून असतो. शेअरबाजार वर गेला म्हणजे सगळ्या कंपन्यांचे भाव वाढले आणि खाली आला म्हणजे सगळ्यांचे भाव खाली आले, असे नसते. शेअर बाजार म्हणजे निव्वळ सट्टा हा समजही डोक्यातून काढून टाका. योग्य प्रकारे केलेली गुंतवणूक आणि धीर धरणे, यातून चांगला परतावा मिळू शकतो.

त्यामुळे अशा प्रकारच्या पॉलिसीत गुंतवणूक करण्याआधी पूर्ण पॉलिसी कागदपत्रे वाचून मगच सही करा. आमची तक्रार मार्गदर्शन केंद्रे आता परत सुरू झाली आहेत. तेथून विनामूल्य मार्गदर्शन मिळवा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in