सुनीता विल्यम्स, बुश विल्मोर अंतराळयान कधी परतणार?

सलग तिसऱ्यांदा अंतराळ सफर करून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकाऱ्यासह अंतराळ स्थानकात अडकल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे.
सुनीता विल्यम्स, बुश विल्मोर अंतराळयान कधी परतणार?
NASA

- पंकजा देव

विशेष

सलग तिसऱ्यांदा अंतराळ सफर करून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकाऱ्यासह अंतराळ स्थानकात अडकल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यांना घेऊन गेलेले 'बोईंग' चे 'स्टारलाइन' अवकाशयान कधी परतणार हे कोणीच निश्चित सांगत नाही आहे. अगदीच अडचणीच्या प्रसंगी 'स्पेस एक्स' त्यांना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते. मात्र ही वेळ टाळण्याचाच सगळ्यांचा प्रयत्न आहे, असे दिसते.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळ स्थानकात प्रवेश करून एक आगळा विक्रम नोंदवला आणि अंतराळ संशोधकांबरोबरच समस्त भारतीयांची मनेही अभिमानाने फुलून आली. मात्र 'स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशन' (आयएसएस) मधील त्यांचा मुक्काम लांबल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी यांना अंतराळात जाऊन जवळपास महिन्याभराचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही 'नासा' आणि 'बोईंग'चे हे 'स्टारलाइनर' अवकाशयान कधी परतणार हे निश्चित सांगता येत नाही. प्रत्यक्षात हे मिशन अवघ्या आठ दिवसांचे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हे दोघे अंतराळवीर १४ जून रोजी परत येणे अपेक्षित होते. मात्र अंतराळयान स्पेस स्टेशनवर नेत असताना हेलियम वायूची गळती झाली आणि 'थ्रस्टर्स' मध्ये काही बिघाड झाला. अर्थात अंतराळ संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यान पूर्णपणे सुरक्षित असून अंतराळवीरांना परत आणण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र असे असले तर त्यांना परत का आणले जात नाही, हा प्रश्नाचे उत्तरही मिळायला हवे.

यापूर्वी रशियाचे अंतराळवीरही असेच अवकाशात अडकले होते. परंतु वेळ न दवडता रशियाने दुसरे यान पाठवून अंतराळवीरांना परत आणले होते. मात्र अमेरिका ही तातडी दाखवताना दिसत नाहिए, सुनीता आणि विल्मोर यांच्या परतण्याचे वायदे करूनही त्यांना परत आणण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सुनीता यांच्या नावावर सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम आहे. मात्र आता या अंतराळवीरांची सुटका करणे आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांना परत आणण्यासाठी निश्चित तारीख जाहीर करणे गरजेचे आहे.

'स्टारलाइनर क्रू फ्लाइट टेस्ट स्पेसक्राफ्ट' ही एक 'स्पेस कॅप्सूल' आहे. ती बोईंग कंपनीने बनवली असून प्रवाशांना लो-अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी सोयिस्कर असे तिचे डिझाइन आहे. निम्न पृथ्वीकक्षाची श्रेणी पृथ्वीपासून सुमारे दोन हजार किलोमीटर इतकी आहे. 'नासा' च्या म्हणण्यानुसार, ही उंची इतकी कमी आहे की इथून पृथ्वीशी सहज संपर्क साधता येतो. तेथून पृथ्वी पाहता येते आणि आवश्यक वस्तूही पाठवता येतात. इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवे की, अमेरिकन कंपनी बोईंगने 'नासा'च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या सहकार्याने हे 'स्टारलाइनर' बनवले आहे. संबंधित वाहन एकावेळी सात जणांना घेऊन जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कॅप्सूल दहा वेळा वापरली जाऊ शकते आणि प्रत्येक वापरानंतर ती पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी अवघे सहा महिने लागतात.

जूनमध्ये हे 'स्टारलाइनर' अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले. ते तिथे आठ दिवस राहील आणि परतेल, अशी आधीची योजना होती. या काळात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर हेदेखील अंतराळ स्थानकावर राहतील, असे ठरले होते. अनेक देशांतील शास्त्रज्ञ या स्पेस स्टेशनमध्ये संशोधनासाठी एकत्र काम करत असतात. 'स्टारलाइनर' अंतराळयान अंतराळवीरांना घेऊन जाण्यास आणि त्यांना परत आणण्यास सक्षम असल्याचे सिद्ध करणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. पण हे 'स्टारलाइनर' लॉन्च झाल्यापासूनच अनेक समस्या समोर आल्या आहेत. त्याच कारणामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला हे वाहन सहा मे रोजी प्रक्षेपित होणार होते. मात्र प्रक्षेपणाच्या अवघ्या दोन तास आधी उलटी गणती अचानक थांबवावी लागली. 'अॅटलस व्ही'च्या वरच्या भागात बसवलेल्या प्रेशर व्हॉल्व्हमध्ये काही बिघाड झाल्यामुळे हा निर्णय . घेण्यात आला होता. त्यानंतरही अशाच काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले. अखेर पाच जून रोजी यान प्रक्षेपित करण्यात आले. अॅटलस व्ही रॉकेटमधून 'स्टारलाइनर' सोडण्यात येत वायूची गळती झाल्याचे शोधून काढले होते. पण त्यावेळी ही थांबवण्याचे पाऊल उचलले गेले नाही. विशेष बाब म्हणजे आताही मिशन टीमला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही, कारण नासा आणि बोईंगसाठी हे फक्त चाचणी उड्डाण आहे. त्यांचा उद्देश डेटा संकलित करणे हा आहे. तो साध्य झाल्यास भविष्यातील मोहिमांसाठी 'स्टारलाइनर' मध्ये आणखी काही सुधारणा करता येतील. ते पूर्वीपेक्षा अधिक चांगले बनवता येईल. हे सगळे असले तरी प्रक्षेपणाआधी दिसलेल्या हेलियम वायूच्या गळतीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे होते, असे काही तज्ज्ञ सांगतात. अंतराळ स्थानकाच्या दिशेने जाताना यानात आणखी जास्त प्रमाणात हेलियम वायूची गळती झाल्याचे दिसून आल्याचे बोलले जाते. 'भ्रस्टर्स'मध्येही काही समस्या होत्या. आता सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना परत आणण्यासाठी जो विलंब होत आहे, त्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे, असे सांगितले जात आहे.

'बोईंग' आणि 'नासा' ला न्यू मेक्सिकोमध्ये काही ग्राऊंड चाचण्या घ्यायच्या आहेत. मात्र त्यासाठी 'स्टारलाइनर 'च्या काही थ्रस्टर्समध्ये (रॉकेटला मार्गदर्शन करणारे उपकरण) झालेला बिघाड दूर करावा लागेल. र मिळालेल्या माहितीनुसार, पाचपैकी चार थ्रस्टर्सची दुरुस्ती करण्यात आली न आहे, परंतु एक अद्याप नादुरुस्त आहे. त्यामुळेच त्याचे काम थांबले आहे. याबाबत बोलताना 'नासा'च्या 'कमर्शियल क्रू प्रोग्राम'चे व्यवस्थापक स्टीव्ह न स्टिच म्हणाले की, अंतराळवीर कधी परत येतील हे सांगता येत नाही.

'स्टारलाइनर' परत आणण्यास उशीर होण्याचे आणखी एक कारण म्हणजे समस्येचे नेमके स्वरूप अद्याप पूर्णपणे कळलेले नाही. या कमर्शियल प्रोग्रामचे उपाध्यक्ष आणि प्रोग्राम मॅनेजर मार्क नप्पी यांच्या म्हणण्यानुसार, या समस्येच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी अभियंते सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र हे सगळे असले तरी आता सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांचे पुढे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अर्थात त्यांना सध्या कोणताही धोका नाही. पुढचे काही महिने सुरक्षित आणि सहज राहू शकतील इतकी पर्याप्त सामग्री आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी अंतराळ स्थानकावर उपलब्ध आहेत. मात्र एखादी मोठी समस्या उद्भवली तर आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना परत आणले जाऊ शकते. अर्थातच हा निर्णय परिस्थिती किती गंभीर आहे, यावर अवलंबून असेल.

थोडक्यात या सगळ्या अकल्पित घडामोडींमुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. 'डायप्रॉक्स मीडिया रिपोर्ट्स' मध्ये म्हटले आहे की, 'स्पेस एक्स' ही संस्था दोन्ही अंतराळवीरांना वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते. अंतराळ मोहिमांमध्ये अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित परत आणण्याची क्षमता 'स्पेस एक्स' कडे आहे; मात्र या संस्थेची मदत घ्यायची की नाही याचा अंतिम निर्णय 'नासा'ला घ्यावा लागणार आहे. रशियानेदेखील एक पर्याय समोर ठेवला आहे. त्यामुळेच रशियाशी चर्चा झाली तर त्यांचे सोयुझ अंतराळयानही अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना परत आणू शकेल. गेल्या वर्षी अंतराळवीरांची अशीच सुटका रशियाने केली होती. मात्र दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी 'स्पेस एक्स'वर सोपवली जाईल का, हाच मूळ प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे 'बोईंग' आणि 'स्पेस एक्स' एकमेकांचे स्पर्धक आहेत. त्यामुळे अगदीच अपरिहार्य स्थिती उद्भवल्याखेरीज असा निर्णय घेतला जाणार नाही.

सुनीता आणि तिच्या सहकाऱ्याच्या परतीला जो विलंब आहे त्याबाबत 'इस्रो'चे प्रमुख एस. सोमनाथ यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनीही सुनीता विल्यम्सचे पुनरागमन ही चिंतेची बाब नसल्याचे स्पष्ट केले आहे. अंतराळ स्थानकाची रचनाच अशी असते की, तिथे गेलेली मंडळी त्या स्थानकावर दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. खेरीज सुनीता यांना स्थानकात राहण्याचा प्रदीर्घ अनुभव आहेच. त्यामुळेच त्या पुढचे काही महिनेही अंतराळात राहू शकतात. त्यामुळेच अंतराळवीरांच्या पुनरागमनाची चिंता करण्याऐवजी नवीन क्रू मॉड्यूल आणि अंतराळात प्रवास करण्याची क्षमता तपासणे यावर भर द्यावा, असे 'इस्रो' प्रमुखांनी सांगितले आहे. सुनीता यांच्या नावावर अनेक विक्रम आणि मिशनची नोंद आहे. खरे तर नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणात प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. शिवाय त्या स्वतः डिझाईन टीममध्ये सहभागी आहेत. हे काम करताना त्यांनी आपल्या आधीच्या अनुभवांच्या आधारे पूर्वी आलेल्या अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळेच 'नासा'चे 'कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर' स्टीव्ह स्टिच यांनी म्हटले आहे की, आम्हाला त्या दोघांना परत आणण्याची अजिबात घाई नाही. मात्र 'स्पेस एक्स'ने दोन्ही अंतराळवीरांना परत आणल्यास बोईंगच्या 'स्टारलाइनर' प्रकल्पाला मोठा धक्का बसेल, हे देखील नाकारण्यात अर्थ नाही. कारण या अंतराळयानाच्या विकासावर बोईंगने प्रचंड वेळ आणि पैसा खर्च केला आहे. खेरीज दोघांनाही 'स्टारलाइनर 'वरूनच परत आणले गेले, तर समस्या नेमकी कुठे आली हे शोधणे कठीण होईल. कारण परत येताना सर्व्हिस मॉड्यूलचा काही भाग जळून नष्ट होईल. त्यामुळे हा धोकाही लक्षात घेण्याजोगा आहे.

logo
marathi.freepressjournal.in