एक पत्र, सुनीतासाठी; हवेत फक्त नऊ महिने...

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टार लाईनर कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेले. ही मोहीम फक्त आठ दिवसांची होती. पण तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस म्हणजे तब्बल नऊ महिने अवकाशात रहावं लागलं.
एक पत्र, सुनीतासाठी; हवेत फक्त नऊ महिने...
Published on

- विचारभान

- संध्या नरे-पवार

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टार लाईनर कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेले. ही मोहीम फक्त आठ दिवसांची होती. पण तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस म्हणजे तब्बल नऊ महिने अवकाशात रहावं लागलं. १९ मार्च २०२५ ला पहाटे या दोघांना यशस्वीरीत्या परत आणण्यात आलं. या मधल्या काळात जगभर या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेविषयी काळजी व्यक्त केली जात होती. या काळजीबरोबरच सुनीताविषयी स्त्री म्हणून एक कौतुकही होतं, ममत्वही होतं. म्हणूनच आज सुनीता परत आल्यावर तिच्यापर्यंत काही ‘या मनीचे त्या मनी’ पोहोचवायचं आहे.

प्रिय सुनीता,आलीस सुखरूप..ये..अगदी रोज नाही. पण आठवण येतच होती तुझी गेल्या नऊ महिन्यांमध्ये. विशेषत: रात्रीची. चांदण्यांनी भरलेले आभाळ न्याहाळताना. त्या काळोखात नजर तुला शोधायची. सभोवती चांदण्या लुकलुकत असतानाही तुझे ते हसरे डोळे आठवायचे. वाटायचं, या काळोखातच कुठेतरी तुझ्या यानाचा ठिपका असेल. तू त्या ठिपक्यातला एक छोटा बिंदू. त्या यानात गुरुत्वाकर्षणाशिवाय अधांतरी तरंगणारा. तरंगत तरंगत आपली सगळी कामं करणारा. काम म्हणजे अवकाश संशोधन. इथे बाईचं काम म्हटलं ना की स्वयंपाक-धुणीभांडी-साफसफाई एवढंच आठवतं सगळ्यांना. पण तू त्या अवकाशात ज्ञानाचे कण जोडत होतीस.

ज्ञानाचे कण. बाईच्या हाती सहजासहजी न येणारी ही बाब. तुला तिथून त्या पोकळीतून धरतीचा निळा ठिपका दिसत होता ना..या निळ्या ठिपक्यावर कित्येक शतकं स्त्रीलिंगाला ज्ञान घ्यायला बंदीच होती. तुला तिथे त्या अवकाशात हायपेशिया दिसते का ग कुठे? काळाच्या खूप आधी, चौथ्या शतकात ग्रीकमध्ये जन्माला आली. तत्कालीन बंदीला झुगारत ज्ञानसाधना करू लागली. गणिताचा, खगोलशास्त्राचा, प्लॅटो-ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागली. अलेक्झांड्रियातल्या एका शाळेची प्रमुख झाली. विद्यार्थ्यांना गणित, तत्त्वज्ञान शिकवू लागली. पण स्त्रियांनी शिकणं-शिकवणं मान्य नसलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांनी तिची हत्या केली. चौथ्या शतकात हे असं, तर एकोणिसाव्या शतकात, इथे पुणे शहरात लहानग्या बाहुलीला तिच्याच घरच्यांनी भाकरीत काचा घालून जीवे मारलं. सावित्री-जोतिबांच्या कार्याने प्रेरणा घेऊन तिचे वडील विश्राम रामजी घोले तिला शिकवू पाहत होते. घरच्या इतर मंडळींना हे मान्य नव्हतं. घराच्या चार भिंतीत बाहुलीच्या वाट्याला मरण आलं. वडिलांनी मात्र तिचं स्मरण म्हणून दारात हौद बांधला. आजही ‘बाहुलीचा हौद’ म्हणून तो ओळखला जातो. आजही मुलीला शिकवलं जातंय ते अर्थार्जनासाठी. ज्ञानप्राप्तीसाठी नाहीच. म्हणूनच गेले नऊ महिने मान पुन्हा पुन्हा वर होत होती आणि नजर तुझ्या अवकाशातील तरंगण्याचा वेध घेत होती.

घराचा, राज्याचा, देशाचा आणि पार पृथ्वीचाही उंबरा ओलांडून तू पल्याड, त्या अवकाश नामक पोकळीत गेलीस आणि अडकलीस. पण अडकूनही किती निश्चिंत होतीस. अर्थात असणारच. जिच्यात उंबरा ओलांडण्याचं धाडस असतं तीच आकाश कवेत घेणार ना.

उंबरा...उंबरठा..माहितीय तुला? अमेरिकेत जन्माला आलीस, वाढलीस तरी तू भारतीय वंशाची. गुजरातमधल्या मेहसाणा भागातली. इथल्या मातीशी नातं सांगणारी. म्हणूनच वाटलं, या उंबऱ्याची हद्द सांगावी तुला. इथे या भारतीय मातीत, बाईसाठी आजही उंबरा ओलांडणं सोपं नाही ग. उंबरा ओलांडताना कुठे गेली, कशाला गेली याचे तपशील द्यावे लागतातच घरातल्या पुरुषसत्तेला. नोकरी-शिक्षणासाठी बाहेर पडली तरी किती बाहेर जायचं याच्या चौकटी आखलेल्याच आहेत. नानातऱ्हेच्या लक्ष्मणरेषा आहेत इथे. म्हणूनच अगं, एकविसाव्या शतकातही इथल्या स्त्री चळवळीला काय कार्यक्रम हाती घ्यावा लागतो, तर ‘क्लेम द पब्लिक स्पेस’. सार्वजनिक अवकाशावर बाईचा अधिकार हवा. म्हणून मग गटागटाने रात्री रस्त्यावरून फिरणं, चौपाटीवर झोपणं असे उपक्रम राबवले जातात. तिथे त्या अवकाशातून पाहताना हे सारं खूप हास्यास्पद वाटेल ना.

सुनीता, तुझ्या मोहिमेमागे जागतिक भांडवलाचं भरभक्कम बळ उभं होतं. त्याशिवाय महाखर्चिक अंतराळमोहिमा पार कशा पडणार? पण इथे आजही शिक्षणाचं भांडवलंच सामान्य मुलींपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. शिक्षणामध्ये, सरकारी शाळांमध्ये शासन गुंतवणूकच करत नाही आणि भांडवलदार गुंतवणूक करतात ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये. सामान्य मुली अशाच राहतात, अडथळ्यांची शर्यत पार करत. त्यातूनच मुलांपेक्षा मुलींचं शाळागळतीचं प्रमाण मोठं आहे. तू ज्या गुजरात राज्यातून येतेस ना, तिथेही नववीच्या इयत्तेत जाईपर्यंत ३० टक्के मुलींची शाळागळती होते, तर बारावीत जाईपर्यंत ५६ टक्के मुली शिक्षणातून बाहेर फेकल्या जातात. का? तर आर्थिक परिस्थितीच्या बरोबरीने इतरही सामाजिक-सांस्कृतिक अशा अनेक लक्ष्मणरेषा आहेत ग. लैंगिक छेडछाड होण्याच्या भीतीच्या, प्रेमात पडून होणाऱ्या आंतरजातीय लग्नाविषयीच्या तिरस्काराच्या, कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या, जात-धर्माविषयीच्या अहंगडाच्या. इथे लक्ष्मणरेषांना कमतरता नाही. प्रत्येक लक्ष्मणरेषा मुलीचा सार्वजनिक वावर मर्यादित करत जाते. आजही फार थोड्या जणींना त्या लक्ष्मणरेषांना ओलांडता येतं.

सगळ्यात मोठी लक्ष्मणरेषा तर चारित्र्याविषयीच्या शंकाकुशंकांची आहे. परिटापासूनचा इतिहास आहे ना आपल्याकडे या शंकाकुशंकांविषयीचा. ही लक्ष्मणरेषा कदाचित तुला उमगणार नाही. तू वेगळ्या स्त्री-पुरुष समतावादी वातावरणात जन्मलीस आणि मोठी झालीस. तुझा जोडीदार विल्यम्स इथे पृथ्वीवर आणि तू तिथे अंतराळात आपल्या बुच विल्मोर या सहकाऱ्यासोबत. स्त्री ही पतीच्या मालकीची वस्तू असते या पारंपरिक गृहितकापासून तू आणि तुझा जोडीदार कोसो दूर आहात. आज तुझं कौतुक करणारे किती भारतीय या गृहितकाला नाकारायला तयार आहेत? ते आजही अग्निदिव्याच्या परंपरेला चिकटून आहेत. नऊ महिने घरापासून दूर होतीस तू. इथे बाई नऊ दिवस घराबाहेर असली तरी तिच्या घरचं जेवण कोण करतं, मुलांना कोण बघतं, नवऱ्याला गरम चपात्या करून कोण वाढतं.. असे नाना प्रश्न असतात. शिवाय कोणाबरोबर होती? सोबत बाई होती का बुवा होता? हे न उच्चारलेले प्रश्न असतातच. घराबाहेर पडून काही करायचं म्हटलं तर अशा अनेक साखळ्या असतात पायात. कसं करायचं बाईने ज्ञानार्जन?

खूप गोष्टी आहेत. पण शेवटी एकच. असू देत लक्ष्मणरेषा. ओलांडू आम्ही त्या जशा जमतील तशा. अंतराळात जायला नाही जमणार कदाचित. पण गावाची वेस ओलांडून तालुक्याच्या गावी तर जाऊ, तालुक्याच्या गावातून जवळच्या छोट्या शहरात तरी जाऊ, शहरातून मोठ्या शहरात, मोठ्या शहरातून एखाद्या आखाती देशात किंवा तुझ्या त्या अमेरिकेतही. अर्थात कष्टासाठी, पोटासाठी. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी. मग कदाचित पुढच्या पिढीमध्ये ज्ञानार्जनाची क्षमता येईल. पण त्यासाठी आम्हाला नऊ महिने गर्भात तर राहायला द्यायला हवं ना..समाजमाध्यमांवर काहीजण म्हणताहेत,

रहने दिया करो,

नौ महिने बेटियों को गर्भ में,

वो खुद ठहर आएंगी

नौ महिने अंतरिक्ष में...

खूप आहे सांगण्यासारखं. पण आता ए‌वढंच. तू विश्रांती घे.

sandhyanarepawar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in