अंधश्रद्धांत अडकविलेले पक्षी

अंधश्रद्धा आणि पक्ष्यांशी संबंधित मिथकांवर प्रकाश टाकणारा हा लेख विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन उभारण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः घुबडासंबंधी असलेल्या अंधश्रद्धांमुळे त्याची होणारी शिकार, धार्मिक गैरसमज आणि त्याच्या जैवमहत्त्वावर झालेले दुर्लक्ष याचे वास्तव या लेखात स्पष्ट केले आहे.
अंधश्रद्धांत अडकविलेले पक्षी
फोटो : Free Pik
Published on

भ्रम -विभ्रम

प्रा. डॉ. निनाद शहा

अंधश्रद्धा आणि पक्ष्यांशी संबंधित मिथकांवर प्रकाश टाकणारा हा लेख विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन उभारण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः घुबडासंबंधी असलेल्या अंधश्रद्धांमुळे त्याची होणारी शिकार, धार्मिक गैरसमज आणि त्याच्या जैवमहत्त्वावर झालेले दुर्लक्ष याचे वास्तव या लेखात स्पष्ट केले आहे.

उत्क्रांतीदरम्यान मानवी जीवनात अनेक दंतकथा, पौराणिक कथा, अंधश्रद्धा वगैरेंची निर्मिती झाली. त्यामध्ये सुरुवातीस विविध गोष्टींचे अज्ञान, आकलन, बाल्यावस्थेत असणारी तार्किकता इत्यादी कारणे होती. त्यामुळे आंधळा विश्वास हा जगातील सर्वच संस्कृतीचा भाग बनल्याचे दिसते. पण जसजशी बुद्धिमत्ता, विचारशक्ती विकसित होत गेली व वैज्ञानिक दृष्टिकोन वर्धिष्णू होत चालला तसतशी ही अंधश्रद्धा कमी व्हायला हवी होती. पण या अंधश्रद्धांचा लोकांवर फारमोठा पगडा असल्याने त्या फारशा कमी होताना दिसत नाहीत. बऱ्याच अंधश्रद्धांत आर्थिक स्वार्थ असल्याने त्या मुद्दाम पसरविल्या जातात. अंधश्रद्धाळू सारासार विचारशक्ती हरवून बसले असल्याने त्यांना ते बळी पडतात. अंधश्रद्धेत शकून- अपशकुनांचा फारमोठा बोलबाला असतो. यात गमतीचा भाग असा की, वेगवेगळ्या समाजात, जातीत, देश-प्रदेशात, परंपरांत त्याचा अर्थ वेगवेगळा लावला जाताना दिसतो. याशिवाय काही अंधश्रद्धा या वैयक्तिक असतात. म्हणजे, एखाद्याला अशी एखादी श्रद्धा चांगल्या शकुनाची वाटते तर दुसऱ्याला तीच अपशकुनी वाटते.

माणसाने या अंधश्रद्धांत अनेक प्राण्यांना अडकविले आहेत आणि यात सर्वांत सामान्य प्राणी म्हणजे पक्षी होय. पक्ष्यांचे उंच आकाशात उडणे हा आदिमानवाचा निश्चितच कुतूहलाचा, आश्चर्याचा आणि गूढ असा भाग असल्याने, देवाचे दूत, प्रतिनिधी किंवा प्रसंगी परमेश्वराचा अवतारच म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाई.

त्यामुळे पक्ष्यांविषयी अनेक विलक्षण मिथकांची, काल्पनिक गोष्टीची निर्मिती झाली ज्यात जीवन, मृत्यू, नशीब, प्रेम इत्यादी भावना निगडित असतात. देवाकडून पक्षी शकून-अपशकुन, आशा असे संदेश घेऊन येतात अशी पक्की धारणा त्यात असे.

जगातील अनेक संस्कृतीमध्ये पक्षी केंद्रित अंधश्रद्धा आढळतात. आजही, प्रगत वैज्ञानिक युगातही, त्या बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहेत. घुबड, पिंगळा, टिटवी, निळकंठ, धनेश, कावळा, चकोर, भारद्वाज, सुतार इत्यादी अनेक पक्ष्यांविषयी विविध अंधश्रद्धा आढळतात.

घुबड - या पक्ष्याविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. घुबडाची शारीरिक वैशिष्ट्ये, त्याचा वावर, वसतिस्थान, आवाज, भय उत्पन्न करतात. सर्वसाधारणपणे मोठी झाडे असलेली स्मशाने, पडके वाडे अशा ठिकाणी ते राहतात. त्यांचे डोळे मानवाप्रमाणे पुढच्या बाजूस असून ते सामान्यतः पिवळेजर्द किंवा लालबुंद असतात. हे डोळे हलू शकत नाहीत. त्यामुळे आजूबाजूला व मागे पाहण्यासाठी त्याची मान २७० अंशातून गरकन् फिरू शकते. उडताना पिसांचा आवाज होत नसल्याने, एकदम तो समोर आलेला कळतही नाही. तर निशाचर असल्याने रात्रीचा अंधार चिरत जाणारा त्याचा आवाज ऐकला की, अनेकांची गाळण उडते. अशा त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे घुबडाचे नाव काढले तरी लोक घाबरतात. अनेक अंधश्रद्धांची निर्मिती त्यामुळेच झाली आहे. पर्यावरणाचे आरोग्य आणि जैवविविधतेचे उत्कृष्ट जैवसूचक असलेल्या घुबडास निराधार मिथकात/अंधश्रद्धेत अडकवून अनादी काळापासून त्याची प्रतिष्ठा मलिन केली गेली आहे. आता त्याच्याविषयीच्या काही अंधश्रद्धा-घरावर बसलेले घुबड अशुभ असते. यामुळे घरातील कुटुंबावर संकट येते, प्रसंगी कोणाचा तरी मृत्यू होतो. वास्तविक, स्मशानातील मोठी झाडे व त्यांच्या ढोली यामध्ये सामान्यपणे घुबडे राहतात. अंत्यविधीच्या वेळी स्मशानात गेलेल्या लोकांना ती दिसू लागल्याने मृत्यू व घुबड असा गैरसंबंध जोडला गेला असावा. भारतात घुबडाकडे दुहेरी भूमिकेतून पाहिले जाते, ते अंधश्रद्धा व हिंदू धार्मिक श्रद्धांचा खोलवर रुजलेल्या ठशामुळे. म्हणजे घुबडास एका बाजूला त्याच्या रूप, आवाज इत्यादीमुळे अशुभ मानतात, तर दुसऱ्या बाजूला त्याचे दर्शन शुभ असल्याचा निर्वाळा धर्मशास्त्री देतात.

धर्मग्रंथानुसार, घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. एवढे बळकट अन् महत्त्वाचे सांस्कृतिक महत्त्व असले, तरी दिवाळीत धनलक्ष्मी पूजनाच्या वेळी घुबडांची प्रचंड प्रमाणात हत्या होते, कारण लक्ष्मीचे वाहन जर नसेल परत जायला, तर लक्ष्मी आपल्या घरातच कायम राहील. अशा अंधश्रद्धांमुळे घुबडांची संख्या वेगाने कमी होत आहे. दिवाळीच्या वेळेस एक घुबड हजारपासून लाखापर्यंत विकले जाते.

काळ्या जादूमध्येही घुबडांच्या शरीरातील विविध अवयवांचा (डोळे, पंख, कवटी, यकृत, हृदय, रक्त, चोच, मांस, हाडे, अंडी) इत्यादींचा औषध म्हणून वापर केला जातो. तसेच पिसे आणि नखे तावीज म्हणून वापरतात, पण या सर्व गैरसमजुती आहेत. कारण त्या सिद्ध झालेल्या नाहीत.

चांगली दृष्टी - आणखी एक अंधश्रद्धा म्हणजे घुबडाचे डोळे खाल्ल्याने (भारतात), तर त्याचे अंडे खाल्ल्याने (इंग्लंडमध्ये) असे मानतात की, आपली दृष्टी तीक्ष्ण होते.

घुबड - म्हणजे भूत किंवा पिशाच असावे अशी एक गैरसमजूत सर्वत्र आढळते. याचा उगम त्याचे माणसाप्रमाणे पुढे असणारे डोळे पाहून व सायंप्रकाश किंवा चंद्रप्रकाशात चेहरा इकडेतिकडे हलताना पाहून आणि भर्रकन उडून जात असल्याने पूर्वजांना ते भूत वाटले असणार आहे. घुबडाच्या बाबतीत शकून शास्त्रातील तऱ्हेवाईकपणा असा की प्रवासाला जाताना जर ते दिसलं तर शुभ व धनलाभही होतो, पण तेच जर आपल्या घरावर किंवा घरात आले तर मात्र हानिकारक असते हे वर पाहिलेच आहे. आपण घुबडाला दगड मारू नये. कारण, ते मारलेला दगड घेऊन नदीवर जाते अन् त्यास घासू लागते. जसजसे दगडाची झीज होईल तसतशी दगड मारणाऱ्याची प्रकृती क्षीण होत जाते व तो मरण पावतो ही दंतकथा तर लहानपणी प्रत्येकाने ऐकली असेल. अर्थात, ही अंधश्रद्धा जरी असली, तरी घुबडाला अभय देणारी आहे. म्हणून ती पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली आहे. उंदीर मारून तो खूप मोठ्या प्रमाणावर धान्य नासाडी टाळतो व किडे खाऊन कीड नियंत्रणही करीत असतो.

(क्रमश:)

प्रसिद्ध पक्षी अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in