
- भ्रम-विभ्रम
- प्रा. डॉ. निनाद शहा
अंधश्रद्धा आणि पक्ष्यांशी संबंधित मिथकांवर प्रकाश टाकणारा हा लेख विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन उभारण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः घुबडासंबंधी असलेल्या अंधश्रद्धांमुळे त्याची होणारी शिकार, धार्मिक गैरसमज याचे वास्तव या लेखात स्पष्ट केले आहे.
माणसाने अंधश्रद्धांत अनेक प्राण्यांना अडकविले आहे आणि यात सर्वांत सामान्य प्राणी म्हणजे पक्षी होय. जगातील अनेक संस्कृतींमध्ये पक्षी केंद्रित अंधश्रद्धा आढळतात. आजही, प्रगत वैज्ञानिक युगातही, त्या बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहेत. घुबड, पिंगळा, टिटवी, निळकंठ, धनेश, कावळा, चकोर, भारद्वाज, सुतार इत्यादी अनेक पक्ष्यांविषयी विविध अंधश्रद्धा आढळतात.
पिंगळा : ही घुबडाची छोटीशी प्रजाती. इतर घुबडांप्रमाणे अनेक गैरसमज, अंधश्रद्धा त्याच्याशी जोडल्या आहेत. पिंगळा संधिकाळात पहाटे (पिंगळावेळ) आपल्या खाद्याच्या शोधात असताना आवाज करीत काही इशारे करीत असतो. भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला ही इशाऱ्याची भाषा समजते व त्या आधारे तो शकुन-अपशकुन, असे लोकांचे भविष्य सांगतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यात तथ्य नाही, ते केवळ उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. पिंगळा ज्योतिषी ही भटकी जमात असून, जातपंचायतीचे वर्चस्व आता काळाच्या ओघात कमी कमी होत चालले आहे.
धनेश : याच्याकडे पाहिले की, आपणास प्रसन्न वाटते, धनलाभ होतो, अशी भावना असलेला हा पक्षी शुभ मानला जातो. तो बीज प्रसार करणारा जंगलाचा शेतकरी मानला जातो. परंतु काही मारक अंधश्रद्धा व काही पर्यावरणीय समस्या यामुळे पक्षी नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. संधिवात रोगावर धनेशचे तेल रामबाण औषध असल्याच्या गैरसमजातून त्याची हत्या होत असे. धनेश आपल्या घरट्यात धन लपवून ठेवतो अशा समजुतीने त्याची घरटी/ ढोली फोडतात. तसेच त्याचे पीस व डोके घरात ठेवले, तर घरात लक्ष्मी येते, अशी लोकसमजूत आहे. याचे मांस खाल्ले, तर प्रसूती होताना त्रास होत नाही ती सुलभ होते, अशी ईशान्य भारतातील आदिवासी महिलांची समजूत आहे. त्यामुळेही त्याच हत्या होत असे.
भारद्वाज : हा पक्षी भारतीय संस्कृतीत शुभ मानला जातो, कारण त्याच्या दर्शनाने भाग्य उजळते. याची पार्श्वभूमी- श्रीकृष्णाच्या भेटीस सुदामा चालला त्या वेळेला त्याला भारद्वाजाचे दर्शन झाले आणि त्यामुळे त्याचे किती भाग्य उजळले हे आपणास माहीतच आहे.
भारद्वाजाच्या गवतापासून बनलेल्या घरट्याबाबतीत एक अंधश्रद्धा अशी की, याच्या घरट्याच्या गवती काड्यात एक विशिष्ट गवत काडी असते, ती मिळवण्यासाठी त्याचे घरटे पाण्यात टाकतात. मग पाण्यात ती विशेष काडी सुट्टी होऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहते. या विशेष काडीच्या स्पर्शाने कोणताही कठीण धातू नष्ट होऊ शकतो आणि लोखंडी वस्तूला स्पर्श केला तर त्याचे सोने बनते, अशी समजूत त्या वेळेला होती. भारद्वाजाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग, फुफ्फुसाचे रोग बरे होतात, अशी अंधश्रद्धा प्रचलित होती. केरळ भागामध्ये लोककथांतून असा विश्वास आहे की, सर्व प्रकारचे रोग बरे करू शकणाऱ्या मुळांचे ज्ञान भारद्वाजाला असते. भारद्वाजाच्या घनगंभीर ‘कुप कुप’ अशा आवाजामुळे त्याचे आत्मा व शकुनाशी नाते जोडले जाते.
हळद्या : या पक्ष्याचे मांस खाल्ल्याने कावीळ होत नाही, अशी तद्दन खोटी समजूत काही ठिकाणी आढळते.
माळढोक : अंधश्रद्धेमुळे याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली गेली. माळढोकचे मांस खाल्ले, तर शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते, तर त्याचे अंडे उकडून खाल्ले, तर बुद्धिमत्ता वाढते. या अंधश्रद्धेमुळे हा देखणा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सुतार पक्षी : जगातील अनेक संस्कृतींमध्ये अशी अंधश्रद्धा शतकानुशतके बाळगली आहे की, सुतार पक्ष्याने जर घरावर टकटक केली, तर मृत्यूची वार्ता येऊ घातली आहे.
टिटवी : टिटवी जमिनीवरच उघड्यावर घरटे करते. त्यात संरक्षणाविना अंडी घालते. या अंडी/पिल्ले यांच्या संरक्षणासाठी शत्रू (कोल्हा, कुत्रा इ.) आला, तर टिटवी जीवाच्या आकांताने आवाज करीत शत्रूला भुलवीत दूर नेते. तो दूरवर जाईपर्यंत हे ओरडणे चालू असते. म्हणजे माणसाचा मृत्यू व्हावा म्हणून टिटवी ओरडत नाही.
दुसऱ्या एका अंधश्रद्धेत टिटवी परिसाने (एक काल्पनिक दगड) अंडी फोडून पिलांना बाहेर काढते, पण यात काही तथ्य नाही. कारण पिल्लांच्या चोचीवर उपजतच एक दात असतो. त्याने ते अंड्याचे कव्हर फोडून बाहेर येतात. टिटवी झाडावर राहू लागली की, भूकंप येणार, अशी निखालस खोटी समजूत काही ठिकाणी आढळते. पण तिच्या पायाला तिन्ही बोटे पुढच्या बाजूलाच असल्याने तिला कधीच झाडावर, तारेवर बसता येत नाही. याशिवाय समुद्र प्राशन, आकाश पडू नये म्हणून पाठीवर झोपून ते तोलणे, अशा अनेक टिटवीच्या संदर्भात कल्पित कथा प्रचलित आहेत.
चकोर : चकोर पक्षी केवळ चंद्रकिरणे प्राशन करून जगतो, अशी कवी कल्पना किंवा समजूत. तो चंद्राकडे एकटक पाहतो व चंद्राच्या अग्निस्फुलिंगांना चंद्राचे तुकडे समजून खातो. खरे तर वैज्ञानिक सत्य असे की, चकोर हा कीटकभक्षी पक्षी आहे. इतर कीटकांप्रमाणेच काजव्यासारखे प्रकाश निर्मिती करणारे कीटकही तो खात असतो. त्यामुळे काजव्याचे चमकणे निखारे समजले गेले आहे. वास्तविक निखारे खाल्ले तर तोंड नक्कीच भाजणार. तेव्हा या समजुतीत काही अर्थ नाही. आणखी एका अंधश्रद्धेत चकोरास विषदर्शनमृत्यूक म्हणतात. कारण त्याच्यासमोर विषमिश्रित अन्न ठेवल्यास त्याचे डोळे आपोआपच लालबुंद होऊन त्याचा मृत्यू होतो, अशी आंधळी समजूत होती. म्हणून राजेलोक विषबाधा टाळण्यासाठी चकोर पक्षी पाळत असत.
चातक : हा पक्षी फक्त पावसाचे थेंब चोचीत घेऊन पाणी पितो. इतर म्हणजे वाहते किंवा साठलेले पाणी तो पीत नाही. म्हणजेच तो पावसाचीच अधिरतेने वाट पाहतो. पण हे खरे नाही, ती एक कल्पना असावी. वास्तविक चातक काय, पण कोणताही पक्षी-प्राणी असे पाणी न पिता जिवंत राहू शकत नाही.
कावळा : कावळा शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या अंधश्रद्धेत आढळतो. कावळा घरावर बसून ओरडत असेल, तर पाहुणे येणार असा शकुन; पण अनेक कावळे कर्कश आवाजात कोकलत असतील तर घरावर संकट येण्याची सूचना अशी अंधश्रद्धा. सकाळीच कावळा दिसणे अशुभ, कारण तो मृत्यूची सूचना देतो, पण कावळा खाद्य शोधण्यासाठी जमिनीवर चोच मारताना दिसला, तर शुभ कारण, तुम्हाला धनलाभ होणार अशी समजूत.
कावळा यम देवाचा संदेशवाहक असल्याने कावळा जोपर्यंत पिंडाला शिवत नाही, तोपर्यंत आत्म्याला मोक्ष मिळत नाही अशा चमत्कारिक समजुतीवर आधारित अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेवर बऱ्याच ठिकाणी लिहिले गेले आहे. त्यामुळे इथे त्याचा उहापोह करीत नाही.
(समाप्त) प्रसिद्ध पक्षी अभ्यासक