पशुपालनातील अंधश्रद्धा व परिणाम - भाग १

सुरुवातीला पशुवैद्य व दवाखान्यांची कमतरता आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे पशुपालक अंधश्रद्धांवर आधारित गावठी उपचारांवर अवलंबून राहायचे. कालांतराने शास्त्रीय ज्ञान, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया यामुळे जनावरांचे जीव वाचवता आले. आज अनेक तरुण पशुपालन व्यवसायात येत आहेत. अंधश्रद्धांमुळे नुकसान होत असल्याचे पशुवैद्यांच्या अनुभवातून स्पष्ट होते.
पशुपालनातील अंधश्रद्धा व परिणाम - भाग १
Published on

भ्रम विभ्रम

डॉ. व्यंकटराव घोरपडे

सुरुवातीला पशुवैद्य व दवाखान्यांची कमतरता आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे पशुपालक अंधश्रद्धांवर आधारित गावठी उपचारांवर अवलंबून राहायचे. कालांतराने शास्त्रीय ज्ञान, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया यामुळे जनावरांचे जीव वाचवता आले. आज अनेक तरुण पशुपालन व्यवसायात येत आहेत. अंधश्रद्धांमुळे नुकसान होत असल्याचे पशुवैद्यांच्या अनुभवातून स्पष्ट होते.

सुरुवातीच्या काळात पशुवैद्यांची, पशुवैद्यकीय दवाखान्यांची अपुरी संख्या होती; त्यामुळे विविध गावठी उपचार करणाऱ्या लोकांवर पशुपालकांना अवलंबून राहावे लागत असे. शिक्षणाचा अपुरा प्रसार असल्यामुळे अशा गावठी उपचारांवर, परंपरागत जुन्या चाली, रूढी, परंपरांवर विश्वास ठेवून पशुपालकांना पुढे जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय व पशुपालन हे तसा जोडधंदा होता. कमी उत्पादनामुळे पशुधनाकडे तितकेसे लक्ष दिले जात नसे. मात्र होणारे नुकसान हे होतच असे. या सर्व अंधश्रद्धा पुढे विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या देखील पाहायला मिळाल्या. त्याला खतपाणी घालणारे, वाढवणारे अनेक घटक व व्यक्तीदेखील पाहायला मिळाल्या. पशुपालन, पशुउपचार आणि मानसिक गुलामगिरीच्या प्रत्येक पातळीवर अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळाल्या.

‘कृत्रिम रेतन न करता नैसर्गिक पद्धतीनेच गायी-म्हशींमध्ये गर्भधारणा व्हावी’ किंवा ‘कोंबड्यांना पिंजऱ्यात ठेवू नये’, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो वगैरे…वगैरे… या बाबींचा प्रचार-प्रसार करताना देशातील एका मोठ्या समुदायावर, ज्याची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे, अन्याय होऊ शकतो किंवा त्यांच्या उत्पन्नाचे साधन धोक्यात येऊ शकते, याबाबत कुठेही विचार होताना दिसत नाही, हे फार मोठे दुर्दैव आहे. पशुपालनाचा इतिहास अत्यंत पुरातन आहे. रानटी अवस्थेतील प्राणी माणसाळविण्याचा प्रयत्न मध्य अश्मयुगात झाला. पण बरेचसे प्राणी नवपाषाण युगामध्ये म्हणजे ख्रिस्तपूर्व नऊ हजार ते आठ हजार वर्षांपूर्वी माणसाळविले गेले. खरंतर प्राणी मारून खाता-खाता हळूहळू पाळायला सुरुवात केली आणि आजमितीस अनेक कुटुंबांचा पशुपालन हा व्यवसाय आधारस्तंभ बनला. सर्वात प्रथम कुत्रा, नंतर मेंढी, गाय, घोडा, डुक्कर या क्रमाने प्राणी माणसाळविले गेले. सुरुवातीच्या काळात भटके आणि टोळ्या करून राहणारा मनुष्यप्राणी शेती करता करता पूर्ण स्थैर्य प्राप्त करू लागला आणि मग हरितक्रांती, श्वेतक्रांती, नीलक्रांतीच्या माध्यमातून प्रचंड प्रगती साधली.

आपल्या देशात आजही पशुपालन हा जोड व्यवसाय म्हणून केला जातो. आता हळूहळू अनेक तरुण पशुपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून करत आहेत. येणाऱ्या काळात पशुपालन हा अनेकांचा मुख्य व्यवसाय देखील होईल, यात शंका नाही. आज राज्यात जवळजवळ विसाव्या पशुगणनेनुसार एकूण ३३ दशलक्ष पशुधनांपैकी राज्यातील एकूण २ कोटी ६६ लाख कुटुंबांपैकी फक्त ४६ लाख कुटुंबांकडे पशुधन आहे. सुरुवातीच्या काळापासून आजअखेर विविध स्थित्यंतरे घडत-घडत इथपर्यंत पोहचलो आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात असलेल्या प्रचंड लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात सकस आहार म्हणून दूध पुरवण्यासाठी संकरित गोपैदाशीचे धोरण स्वीकारले. परिणामी आज जगात आपण दुग्ध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. त्याचे सर्व श्रेय खरे तर भूमिहीन, अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ यांनाच द्यावे लागेल. या सर्वांनी घेतलेली प्रचंड मेहनत व योगदान यामुळेच हे शक्य झाले आहे.

मी स्वतः १९८२ मध्ये मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडलो. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात ३७ वर्षे सेवा करून सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) म्हणून जुलै २०१८ मध्ये सेवानिवृत्त झालो. शेवटची चार वर्षे सोडली तर जवळजवळ ३३ वर्षे पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून काम केले. अनेक पशुपालकांशी संबंध आला. खरंतर बरे-वाईट म्हणणार नाही, बरे आणि चांगलेच अनुभव आले. अनेक ठिकाणी सहा-सात वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हजारो कुटुंबांची प्रगती मला जवळून पाहता आली. त्यामध्ये ‘पशुसंवर्धना’चे योगदान हे मोठे असल्याने फार मोठे समाधान मला मिळत गेले. सेवाकालात पशुसंवर्धनातील विविध अंधश्रद्धा माझ्या कानावर येत होत्या. काही पाहता आल्या, काहींच्या खुमासदार चर्चांमध्ये दवाखान्यात निवांत वेळी सहभागी होता आले. त्याचवेळी त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्या थोपवण्याचा प्रयत्नदेखील केला आणि त्यात बऱ्याच अंशी यशदेखील मिळाले. जनावर ‘वैरण खात नाही’ ही समस्या घेऊन पुष्कळ पशुपालक दवाखान्यात येत असतात. कोणत्याही आजाराचे ते प्रथम लक्षण असते. आजाराचे नेमके निदान न करता अनेक उपचार गावातील तथाकथित जाणकार करत असत व सुचवत असत. पैकी एक म्हणजे जिभेवर काटे आले असता तिथे चपलेने, शेणकुटांनी अथवा लोणच्याचा खार घासला तर वैरण खाते. मुळातच ते काटे असणे हे नैसर्गिक असते. मात्र ज्यावेळी वैरण खात नाही, अशावेळी पशुपालक तोंडात हात घालून पाहतो. त्याचवेळी त्याला ते जाणवते. मग अशावेळी तो वरील उपचार करतो. त्या चपलेमध्ये असलेल्या खिळ्या-मोळ्यांमुळे किंवा शेणकुटामध्ये काटा, दसाडी असेल तर जखम होण्याची शक्यता अधिक. मग ती जखम झाली की जनावर आणखी काही दिवस वैरण खाणे बंद करते. योग्य उपचारांनंतरही अनेक दिवस त्याच्या खाण्या-पिण्यावर बंधने येऊन उत्पादन घटू शकते. त्यामुळे नजीकच्या पशुवैद्याचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. वारंवार पोट फुगणे, वैरण कमी खाणे, घट्ट शेण टाकणे, तब्येत न सुधारणे अशा लक्षणांची जनावरे दवाखान्यात येत असतात. पशुवैद्य अशा जनावरांच्या पोटाच्या हालचाली स्टेथोस्कोपने तपासून अखाद्य वस्तू; जसे - तार, खिळा, मोळा, प्लास्टिक खाल्ल्याचे निदान करतो. एकदा निदान केले आणि शस्त्रक्रियेचा मार्ग सुचवला की मग परत घरी, शेजारीपाजारी चर्चा होते. अनेक उपायांचा भडिमार केला जातो. पैकी एक- लोहचुंबकाचे पाणी पाजा, प्लास्टिक काढून टाकण्यासाठी वेगवेगळे तेल पाजा… एक ना अनेक. या वस्तू शस्त्रक्रिया करून बाहेर काढणे हाच एकमेव उपाय आहे. एका ठिकाणी एक महाभाग गुदद्वारात हात टाकून संबंधित वस्तू काढल्याचे भासवून मोठी ‘बिदागी’ घेत असे. मात्र काही चाणाक्ष पशुपालकांमुळे त्याची चलाखी उघडकीस आली. हे महाशय हातातच वस्तू लपवून, हात टाकून परत बाहेर काढून पूर्वीपासून लपवलेली वस्तू दाखवून लोकांना फसवत असत. या ठिकाणी ‘रुमीनाटॉमी’ या एकमेव शस्त्रक्रियेमुळे जनावराचा जीव वाचू शकतो. अलीकडे ही बाब आता अनेक पशुपालकांच्या पचनी पडली आहे. (क्रमश:)

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली

logo
marathi.freepressjournal.in