पशुपालनातील अंधश्रद्धा व परिणाम

पारंपरिक अंधश्रद्धांमुळे पशुपालक अनेक वेळा अपायकारक घरगुती उपचार करतात, ज्यामुळे जनावरांचे मोठे नुकसान होते. आज पशुवैद्यांची वाढती उपलब्धता, प्रबोधन आणि प्रशिक्षणामुळे अंधश्रद्धांचे प्रमाण कमी झाले आहे. शास्त्रशुद्ध उपचार आवश्यक असून, वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास जनावरांचे प्राण वाचू शकतात. शास्त्रीय दृष्टिकोन आणि जागरूकता वाढल्यामुळे पशुपालनातील चुकीच्या प्रथांवर नियंत्रण शक्य आहे.
पशुपालनातील अंधश्रद्धा व परिणाम
Published on

भ्रम विभ्रम

डॉ. व्यंकटराव घोरपडे

पारंपरिक अंधश्रद्धांमुळे पशुपालक अनेक वेळा अपायकारक घरगुती उपचार करतात, ज्यामुळे जनावरांचे मोठे नुकसान होते. आज पशुवैद्यांची वाढती उपलब्धता, प्रबोधन आणि प्रशिक्षणामुळे अंधश्रद्धांचे प्रमाण कमी झाले आहे. शास्त्रशुद्ध उपचार आवश्यक असून, वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास जनावरांचे प्राण वाचू शकतात. शास्त्रीय दृष्टिकोन आणि जागरूकता वाढल्यामुळे पशुपालनातील चुकीच्या प्रथांवर नियंत्रण शक्य आहे.

सुरुवातीच्या काळात पशुवैद्यांची, पशुवैद्यकीय दवाखान्यांची अपुरी संख्या होती; त्यामुळे विविध गावठी उपचार करणाऱ्या लोकांवर पशुपालकांना अवलंबून रहावे लागत असे. शिक्षणाचा अपुरा प्रसार असल्यामुळे अशा गावठी उपचारांवर, परंपरागत जुन्या चाली, रूढी, परंपरांवर विश्वास ठेवून पशुपालकांना पुढे जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय व पशुपालन हे तसा जोडधंदा होता. कमी उत्पादनामुळे पशुधनाकडे तितकेसे लक्ष दिले जात नसे. मात्र होणारे नुकसान हे होतच असे. या सर्व अंधश्रद्धा पुढे विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या देखील पाहायला मिळाल्या. त्याला खतपाणी घालणारे, वाढवणारे अनेक घटक व व्यक्तीदेखील पाहायला मिळाल्या. पशुपालन, पशुउपचार आणि मानसिक गुलामगिरीच्या प्रत्येक पातळीवर अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळाल्या.

‘खिलार’सारख्या जनावरांत पुष्कळ वेळा डोळ्यांचा कर्करोग होतो, मांस वाढते. सुरुवातीला निदान झाल्यास, तत्काळ उपचार म्हणून हरभऱ्याएवढ्या आकाराची गाठ काढून टाकली, तर डोळा वाचतो. पुष्कळ वेळा गावठी उपाय करत बसल्यामुळे, तिची वाढ होते आणि पूर्ण डोळा खराब होतो. अशावेळी डोळाच काढावा लागतो आणि मग जनावर वाचवावे लागते; मात्र अनेक मंडळी तंबाखू खाऊन थुंकणे, मिठाचे पाणी मारणे, चहाच्या बशीच्या तुकड्यांची बारीक पावडर करून ती कुंकवासह डोळ्यात भरणे, हिंगणीच्या झाडाचा पाला चावून डोळ्यात थुंकणे असे विविध अघोरी उपाय करतात. त्याचा विपरीत परिणाम होऊन अंधत्व येते, डोळे खराब होऊन जातात. अनेक वेळा डोळ्यांशेजारी डागणे, रुईचा चीक घालणे, असे प्रकार देखील केले जातात. हे सर्व करता कामा नये.

अनेक वेळा जड पाणी, ‘ऑक्झलेट’ जास्त असणाऱ्या वनस्पती, मॅग्नेशियम जास्त असणारे खाद्य, जास्तीची पेंड खाऊ घालणे, कमी प्रमाणात पाणी पाजणे यामुळे जनावरांमध्ये मुतखडा होतो. लघवीचे प्रमाण कमी होते. थेंब-थेंब लघवी होते. लघवी तुंबल्यामुळे मूत्राशय भरून जाते. जनावर उठबस करते. अशावेळी टोबा मारणे, करट-फोड फोडणे अशा उपायांनी मूत्राशय फुटून संपूर्ण लघवी शरीरात पसरते. जनावर मृत्युमुखी पडते. त्यामुळे गावठी उपाय न करता निश्चितपणे शस्त्रक्रिया करवून घ्यावी व होणारे नुकसान टाळावे. जनावरांना सर्व मोसमात भरपूर पाणी पाजणे, थोडंसं मीठ पिण्याच्या पाण्यात टाकून मुतखडा होणे आपण थांबवू शकतो. त्यामुळे असे उपाय केल्यास मुतखडा होणार नाही, शस्त्रक्रियेची गरज देखील भासणार नाही.

‘वर्षाला एक वेत’ हे यशस्वी दुग्ध व्यवसायाचे लक्षण आहे; मात्र अनेकविध कारणांमुळे वर्षाला एक वेत मिळेलच असे नाही. कृत्रिम रेतन करून देखील जनावर दोन-चार वेळा उलटते; मात्र काही महाभाग अशा चार-पाच वेळा उलटलेल्या जनावरावर नेमका उपाय करून घेण्याऐवजी अगदी गर्भाशयाची ‘अ ब क ड’ माहीत नसलेल्या वैदूंकडून गर्भाशयात हात घालून जखमा करणे, ओरबडणे असे प्रकार करतात. त्यामुळे जनावरास कायमचे वंध्यत्व येऊ शकते आणि मग जनावर मातीमोल किमतीत विकावे लागते. अनेक वेळा माजावर आलेल्या जनावरास चारा-पाणी न देता, कृत्रिम रेतनानंतर त्याला बसू न देता टांगून ठेवले जाते. त्यामुळे गर्भधारणा होण्याचे प्रमाण खूप कमी होते. तसेच कृत्रिम रेतनानंतर दोन ते तीन महिन्यांनी गर्भधारणा तपासणी केल्यास पशुपालकांना पुढील नियोजन करता येते; मात्र ते तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून वेळेत तपासून न घेता डोक्यावरचे केस गेलेत, लघवीला फेस येतो किंवा अतिआत्मविश्वासामुळे आपले जनावर गाभण आहे, अशी खात्री बाळगली जाते. मात्र प्रत्यक्षात जनावर गाभण नसल्याने एक पूर्ण वेतसुद्धा बुडून गेलेले पाहिले आहे. त्यामुळे असे गाभण गेलेले जनावर गाभण असल्याची खात्री तज्ज्ञ पशुवैद्याकडून करून घ्यावी व पुढील नियोजन करावे. जास्तीचा खुराक देण्याबाबत योग्य नियोजन केल्यास वेत वाचून जास्तीचे दूध उत्पादन देखील मिळू शकते.

जनावर व्याल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. साधारणपणे जनावरे ही रात्री किंवा पहाटे वितात. अशावेळी बारीक लक्ष ठेवून त्यांना पूर्ण प्रायव्हसी, एकांतपणा देऊन त्यांचे बाळंतपण उरकून घ्यावे, गरज पडली तरच थोडी मदत करावी व वासरू बाहेर पडू द्यायला मदत करावी. जर जनावर अडलं तर तज्ज्ञ पशुवैद्याची मदत घ्यावी. अडलेली गाय, म्हैस, शेळी सोडवणारी गावात अनेक मंडळी असतात. मात्र शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांकडून जनावर जर सोडवले गेले, तर अपघाताने जनावर, वासरू किंवा दोन्हीही दगावू शकतात. वेळ पडल्यास सिजेरियन शस्त्रक्रिया करावी लागली, तर त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्याची मदत नेहमीच फायदेशीर ठरते. अनेक वेळा जनावर व्याल्यानंतर वार अडकते. अनेक कारणांमुळे ते घडते. तेव्हा अनेक मंडळी ते पडण्यासाठी घरातील जुनी चप्पल, केरसुणी त्या वारीस बांधतात. त्याच्या ओझ्यामुळे वार पडायचे सोडून अंग बाहेर पडण्याची शक्यता वाढते आणि जनावराच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा वेळी तज्ज्ञ पशुवैद्याच्या सल्ल्याने उपचार करावा. इतर लोकांकडून वार काढणे, अंग बसवणे असे प्रकार केव्हाही करू नयेत. बाहेर पडलेले अंग, ‘मायांग’ बसवताना ते जर व्यवस्थित बसवले नाही, त्याला जखमा केल्या, ते फाटले गेले तर जीवावर बेतू शकते. त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्याकडून ते ‘मायांग’ योग्य ठिकाणी बसवून घेणे आवश्यक ठरते. त्यानंतर अनेकविध औषधोपचारांची गरज असते. तेव्हा अशावेळी तज्ज्ञ पशुवैद्याचा सल्लाच उपयोगी पडतो, अन्यथा ते जनावर वाचले तरी कायमचे त्याला वंध्यत्व येऊ शकते.

जनावरांना एक ‘तिवा’ नावाचा विषाणूजन्य आजार होतो. त्याला ‘इफीमिरल फीवर’ असे इंग्रजीमध्ये म्हणतात. जनावराची प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर तीन दिवसांत हा आजार बरा होतो. मात्र त्यावरही उपाय करणारे ‘बहाद्दर’ आहेत. एकाच नावाच्या तीन-पाच स्त्रियांना एकत्र बोलवून ‘तिवा उतरवणे’ म्हणून तव्यामध्ये गरम कोळसा घालून तो त्याच्यावरून ओवाळला जातो आणि बरे होण्याची वाट पाहिली जाते. काही वेळा संकरित जनावरांना त्रास होऊ शकतो. गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे योग्य उपचार पशुवैद्यांच्या सल्ल्याने करणे हे केव्हाही चांगले असते. एकंदरीत, विविध बाबी शास्त्रीय कसोटीवर तपासून घ्याव्यात. आजकाल अशा प्रकारच्या घटना, प्रकार कमी प्रमाणात आढळून येतात. एकंदरीतच, जनावरांच्या दवाखान्यांची, पशुवैद्यांची वाढलेली संख्या, सोबत पशुपालकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षणामुळे असे प्रकार अलीकडे कमी झाले आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी आढळतात, हे देखील तितकेच खरे आहे.

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली

logo
marathi.freepressjournal.in