चर्चेत मालीवाल, ‘आप’चे मात्र हाल!

खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या घृणास्पद मारहाणीमुळे ‘आप’मध्ये नवे द्वंद्व सुरू झाले. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर मालीवाल...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय

- प्रमोद मुजुमदार

राजकीय

खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या घृणास्पद मारहाणीमुळे ‘आप’मध्ये नवे द्वंद्व सुरू झाले. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर मालीवाल परदेशी गेल्या. त्या वेळच्या संघर्षात त्या कोठेही नव्हत्या. या प्रकरणी होणारे दावे-प्रतिदावे, वेगवेगळे व्हिडीओ आणि परस्परांविरोधातील तक्रारी संभ्रम वाढवणारे आहे. मारहाण करणारा स्वीय सहाय्यक केजरीवाल यांच्यासोबत दिसल्याने मालीवाल यांचे पित्त खवळले आणि ‘आप’मध्ये नवेच रण पेटले.

ताज्या संघर्षप्रकरणी उपस्थित होणारा आणखी एक मुद्दा म्हणजे आम आदमी पक्षात एका कुटुंबातील एकच व्यक्ती राजकारणात येऊ शकते. असे असेल तर सुनीता केजरीवाल यांना पुढे करण्यात येणे काही सदस्यांच्या मनात शंका निर्माण करणारे ठरत आहे. केजरीवाल यांची जागा घेऊ शकणारे पक्षात दुसरे लोक नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करण्याची बुद्धी स्वाती यांच्याकडे आहे. स्वाती मालीवाल यांच्या ठायी मोठी महत्त्वाकांक्षा आहे. आज पक्षाशी संबंधित जुन्या लोकांमध्ये बिभवकुमार सर्वात प्रभावशाली आहेत. जवळपास सर्वच जुन्या लोकांचा यावर विश्वास आहे; पण स्वाती यांना हे मान्य नाही. अतिमहत्त्वाकांक्षा आणि सहकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेले संशयाचे भूत यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाणीचा शोचनीय प्रकार घडला.

मालीवाल यांनी ‘आप’चे राज्यसभा खासदार म्हणून राजीनामा देण्याच्या पूर्व मसुद्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने बिभव यांनी हा हल्ला केला, असे सांगितले जात आहे. यावर्षी जानेवारीमध्ये मालीवाल यांची ‘आप’च्या राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यांचा कार्यकाळ २०३० मध्ये संपणार आहे. त्यांनी या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक झाली तर ‘आप’ तिकीट देईल, तो जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. कथित दारू घोटाळ्यात केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून ‘आप’मध्ये काही बदल होत आहेत. केजरीवाल निर्विवाद ‘बॉस’ राहिले असले आणि ‘आप’मध्ये त्यांचे मत अंतिम असले तरी काही नवीन सत्ताकेंद्रे उभी राहात आहेत. मालीवाल यांच्याबद्दल त्यांच्या खूप तक्रारी आहेत. मालीवाल यांना या मुद्द्यांवर केजरीवाल यांच्याशी चर्चा करायची होती. म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या. त्यांना राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून दिलेल्या राजीनामापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असता आपल्यालाच का राजीनामा द्यायला सांगितले जात आहे, राज्यसभेत पक्षाचे इतर नऊ सदस्य असतील तर त्यापैकी कुणी का नाही, असा सवाल त्यांनी केल्याचे सांगितले जाते. नजीकच्या काळात त्यांना आणखी काही पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘आप’ने मालीवाल यांना पक्षातून निलंबित केले तरी त्या पक्षाच्या खासदारपदी कायम राहतील; मात्र त्यांना सभागृहात मतदान करताना ‘आप’च्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. अर्थात आम आदमी पक्षाने हकालपट्टी केली तर त्या आपोआप राज्यसभेच्या स्वतंत्र खासदार होतील. पक्षाच्या सूचनेला त्या बांधील राहणार नाहीत. ताज्या नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या, ‘आप’ने प्रसारित केलेल्या व्हिडीओनुसार मालीवाल ड्रॉईंग रूममध्ये आरामात बसल्या असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावताना दिसल्या आहेत.

पोलिसांशी हुज्जत घालून नोकरीवरून काढण्याची धमकीही देताना त्या दिसतात. यानंतर त्या वेटिंग रूममध्ये गेल्या. तेव्हा बिभवकुमार यांना बोलावण्यात आले. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री केजरीवाल उपलब्ध नाहीत, त्यांना भेटता येणार नाही. त्यानंतर मालीवाल यांनी आतल्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बिभवकुमार समोर उभे राहिले तेव्हा त्यांनी जोरजोरात वाद घालण्यास सुरुवात केली. स्वाती यांनी त्यांना ढकलले. बिभवकुमार यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांना बाहेर काढण्यात आले. या प्रसंगी नेमका कोणत्या प्रकारचा संघर्ष झाला, हे समोर आलेले नाही. मालीवाल यांच्या डोक्याला कोणतीही जखम नाही किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली नाही, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. म्हणजेच एकूण प्रकरणातील तथ्य पोलीस तपासानंतरच बाहेर येणार आहे. मात्र तोपर्यंत मालीवाल विरुद्ध पक्ष असा संघर्ष सुरू झाला असून ही हाणामारी भाजपच्या पथ्यावर पडत आहे.

logo
marathi.freepressjournal.in