स्विचॅाफ

माणसं बाहेर काढली पाहिजेत, नायतर माणसं कायमची मुकी होऊन बसायची. मेंदू गंजून जायचा.
स्विचॅाफ
Published on

मोबाइल दिला नाही म्हणून गावाकडची पोरं जीव द्यायला लागलीत. बॅलन्स टाकायला पैसा दिला नाही म्हणून बापाच्या अंगावर जायला लागलीत. घरातनं पळून जायला लागलीत. मोबाइल तो मोबाइल, पण चॅनेलसाठी पण डोकंफोड रोज घरात. बापाला मॅच बघायची. आईला सासू-सुनांची सीरियल. पोराला काय क्राइम पेट्रोल.. मॅचबिच आणि म्हाताऱ्यांना कीर्तन. रोज तमाशा. माणसं माणसातनं उठवली पार. सारी टीव्हीच्या खोक्यात आणि मोबाइलच्या डबड्यात अडकून राहिली. घरातल्या घरात बोलेनाशी झाली. बोलणंच नाही एकमेकांशी. ठसका लागला तरी पाणी देत नाही कुणी आणून. उठून घे म्हणतात. जो-तो आपापल्या चॅनेलात आणि पॅकेजात. डोकं चालायचं बंद झालं अशानं. गावच्या गाव अडकलं मोबाइलच्या जाळ्यात. हे भयंकर आहे. हा रोग नुसता माणसाला नाही, तर घराघराला आणि गावागावाला लागलाय. यातनं माणसं बाहेर काढली पाहिजेत, नायतर माणसं कायमची मुकी होऊन बसायची. मेंदू गंजून जायचा.

या जाळ्यातनं एक गाव मात्र ठरवून बाहेर पडलं. मोहित्यांचे वडगाव. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातलं हे इवलंसं गाव, पण या गावानं जे काही करून दाखवलंय त्यासाठी त्याला सलाम केलाच पाहिजे. गावानं ठरवून एकमुखानं मोबाइल आणि टीव्हीच्या जाळ्यातनं बाहेर पडायचं ठरवलं आणि गाव बाहेर पडलंसुद्धा. ही बातमी नुसतीच चांगली नाही, तर ती अनुकरण करण्यासारखी आहे.

टीव्ही आणि मोबाइलच्या नादानं पोरं काही अभ्यास करेनात आणि माणसं सीरियलातल्या संसारातच अडकल्यात असं गावाला जाणवायला लागलं तेव्हा हे काही खरं नाही गड्या म्हणत गाव विचार करायला लागलं... आणि मग एक दिवस गावानं फतवाच काढला...रोज संध्याकाळी दीड तास मोबाइल आणि टीव्ही बंद म्हणजे बंदच राहील. एकदम स्विचॉफ म्हणजे स्विचॉफच. आता इतक्या वर्षाचं वळण. ध्यानात तरी रहायला नगो का? असं कुणीतरी म्हंटलं की लगेच या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाच बसवून टाकला गावानं. भोंगा वाजला की टीव्ही, मोबाइल बंद. शाब्बास रं पठ्ठे.

मोहित्यांचं वडगाव. चार गावांसारखंच साधं सोपं सरळमार्गी गाव. इनमीन तीन हजार डोकी, पण माणसांनी मेहनतीनं शेतं हिरवीगार केली. कष्टानं सुबत्ता आणली. बागायतीनं पैसा आला. पोरंबाळं शिकायला लागली. झालं ते चांगलंच, पण पैसा येताना काय एकटा येतो का? पैशासोबत जगभरातलं तंत्रमंत्र गावात शिरलं. इंग्रजी स्कूलच्या इमेजपुढं झेडपीच्या मराठी शाळा बंद पडायला लागल्या. तसं गाव जरा जागं झालं. सरपंच विजय मोहिते यांनी १४ ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. पोरांचा अभ्यास कसा काय चाललाय असं विचारायला अवकाश की आयाबाया काखंला पदर खोऊनच उभ्या राहिल्या. कसला अभ्यास करत्यात? दिसरात मोबाइल बघत बसत्यात नुसता. मोबाइल सुटला की टीव्ही. टीव्ही बंद केला की मोबाइल. पार वाटुळं व्हाय लागलंय...पोरांना नावं ठेवून झाल्यावर जेवणाच्या टायमाला तुमी काय करता? असं विचारल्यावर साऱ्याजणी गप बसल्या की, मालिका कुणी बघायच्या मग?

सारी गोची अशी होती. मग विचार सुरू झाला आणि उपाय सापडला. रोज सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत घरातील टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची लगेचच १५ ऑगस्टपासून अंमलबजावणीही करायचं ठरलं. मंदिरावर भोंगाही लागला. या दीड तासात करायचं काय? तर फक्त अभ्यास. या दीड तासात एक पण पोरगं घराबाहेर दिसणार नाही याची जबाबदारी आईवडिलांनाच दिली. गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य सारे लक्ष ठेवायला लागले. यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या वेळेत जर एखादं पोरगं घराबाहेर दिसलंच तर लगेच चला अभ्यासाला बसा, असं सांगितलं जातं. फरक?

या दीड तास स्विचॉफनं गावाची मानसिकताच बदललीय पार. गावचं गावपण चालण्याबोलण्यात असतं. पारावरच्या गावगप्पात असतं. या घरातली आमटीची वाटी त्या घरात जाण्यात असतं. गावचं गावपण देवळातल्या भजनात असतं. भरल्या विहिरीत उडी मारण्यात असतं. लेझीम-विटीदांडू, कबड्डीत असतं. शाळेच्या कौलारू वर्गात असतं. गुरुजींच्या गाण्यात असतं. गावपण म्हशीच्या ताज्या दुधात असतं. चुलीवरच्या गरम भाकरीत असतं. चहात भिजलेल्या चिरमुऱ्यात असतं. गावपण आज्जीच्या गोष्टीत असतं. मैतरणीच्या चेष्टेत असतं. गावपण जीवाला जीव देण्यात असतं. गावपण मैदान मारण्यात असतं. गावपण मोबाइल आणि टीव्हीच्या खोक्यात नसतं. हे एकदा पोरांना कुणीतरी सांगायला पाहिजे. ते मोहित्यांच्या वडगावनं सांगितलं. ही गावाकडची गोष्ट प्रत्येक गावानं सांगायला पाहिजे. तसं झालं तर गाव हरकून टूम होईल.

logo
marathi.freepressjournal.in