सीरिया : आगीतून फुफाट्यात

धगधगत्या पश्चिम आशियातील आणखी एक देश अस्थिर झाला आहे. गृहयुद्धाच्या भडक्यानंतर सीरियाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. एका हुकूमशहाच्या ताब्यातून दुसऱ्या हुकूमशहाच्या ताब्यात जात असलेला हा देश जणू आगीतून फुफाट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही इतर देश आपापले हिशेब जपत या बदलाचे स्वागत करत आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

देश विदेश

भावेश ब्राह्मणकर

धगधगत्या पश्चिम आशियातील आणखी एक देश अस्थिर झाला आहे. गृहयुद्धाच्या भडक्यानंतर सीरियाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. एका हुकूमशहाच्या ताब्यातून दुसऱ्या हुकूमशहाच्या ताब्यात जात असलेला हा देश जणू आगीतून फुफाट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही इतर देश आपापले हिशेब जपत या बदलाचे स्वागत करत आहेत.

पश्चिम आशियातील इस्रायल, इराण, लेबनॉन आदी देशांमध्ये सुरू असलेल्या अस्थैर्यात आता सीरियाची भर पडली आहे. गृहयुद्धामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रस्त असलेल्या सीरियामध्ये अखेर बंडखोरांनी विजय प्राप्त केला आहे. अध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. हयात तहरिर अल-शाम या बंडखोर गटाने आपला झेंडा फडकावला आहे. या गृहयुद्धात असद कुटुंबाची गेल्या पाच दशकांहून अधिक काळाची सत्ता खालसा झाली आहे. हे काही अचानक घडलेले नाही. असद यांचे कुकर्म त्यास अधिक कारणीभूत आहे.

बशर यांचे वडील हफीज अल असद यांनी तब्बल तीन दशके सीरियाचे नेतृत्व केले. गृहयुद्ध आणि अस्थिरतेच्या गर्तेत असलेल्या सीरियाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. २००० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी आणि सीरियाचा अध्यक्ष निश्चित झाला. बशर हे नेत्रशल्यचिकित्सक म्हणून लंडनमध्ये सेवा बजावत होते. त्यांचा मोठा भाऊ हा रस्ते अपघातात ठार झाला. त्यामुळे बशर यांच्याकडे सीरियाची सूत्रे आली. उच्च विद्याविभूषित असल्याने त्यांच्याकडून सीरियनांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. बशर यांची पत्नी सुद्धा उच्चशिक्षित असल्याने ती जमेची बाजू ठरेल, असे जनतेला वाटणे स्वाभाविक होते. बशर यांना नेतृत्व करता यावे यासाठी चक्क घटनेत बदल करण्यात आला. कारण, त्यांचे वय त्यावेळी अवघे ३४ होते. सत्तारूढ होताच बशर यांनी काही प्रमाणात कठोर निर्णय घेऊन सीरियाला योग्य रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले. मात्र, सिंहासनावर बसल्याने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. त्यांच्यात अहंकाराबरोबरच अनेक दुर्गुणांनी प्रवेश केला. आपली खुर्ची अधिक बळकट रहावी यासाठी त्यांनी विरोधकांवर निशाणा धरला.

बशर यांच्या अडीच दशकांच्या सत्ता कार्यकाळात गेली दीड दशके ही सीरियासाठी अत्यंत वाईट ठरली. विरोधकांना अक्षरशः चिरडून टाकण्याचे आणि रक्तपात घडविण्याचे दुष्कृत्य बशर यांनी अतिशय निष्ठूरपणे केले. त्यामुळे साहजिकच त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली. बंडखोर गटांनीही आपले हातपाय पसरले. या साऱ्याला अटकाव करण्यासाठी बशर यांनी रशिया आणि इराण यांची साथ मिळविली. या दोन्ही देशांच्या लष्करी आणि आर्थिक बळावर बशर यांनी अक्षरशः माज केला. यामुळे सीरियन प्रचंड वैतागले. हजारो निष्पापांचा बळी जाऊ लागला, तर आपले भविष्य अंध:कारमय असल्याचे वाटू लागल्याने लाखो नागरिकांनी अन्य देशांची वाट धरली. जे सीरियात राहिले त्यांचा जणू छळच सुरू होता. ना रोजगार, ना सुख. महागाईचा आगडोंब उसळून जगणेही मुश्कील होऊ लागले. त्यातच आयसिससह अन्य दहशतवादी संघटनांनी बंडखोर गटांना बळ देण्यास प्रारंभ केला.

सीरियामध्ये आपले विश्व निर्माण केलेल्या ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (आयसिस) या दहशतवादी संघटनेने सीरियात पाण्याचा प्रश्न तीव्र केला. पाण्याच्या साठ्यांवर आयसिसने ताबा मिळवला. ते इतके आक्रमक बनले की पाणी घेण्यासाठी कुणी आले तर त्यांच्यावर थेट गोळी झाडणे, मुंडके छाटणे किंवा आयसिसमध्ये सहभागी करून घेणे, असा सिलसिला सुरू झाला. पाण्याला शस्त्र बनवून सीरियन नागरिकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आयसिसने जगभरात एक नवा काळा अध्याय लिहिला. पर्यावरणीय घटकांच्या माध्यमातून अमानवी डावपेच यशस्वी करण्याचा कुटील डाव रचला गेला. पाणी मिळू नये म्हणून इंधन आणि तेल यांच्या पुरवठ्यावरही आयसिसने परिणाम केला. त्यामुळे भूजल उपसणेही शक्य झाले नाही. परिणामी, देश सोडून जाण्यापलीकडे सीरियनांना पर्याय उरला नाही. २०१४ मध्ये मोसूल या धरणावर आयसिसने कब्जा केला. पाणी सोडणे आणि न देणे यावर नियंत्रण आल्याने आयसिसने जगभरात दबदबा निर्माण केला. यातूनच अमेरिकेला थेट आव्हान देण्यात आले. बराक ओबामांच्या नेतृत्वात अमेरिकन सैन्याने या धरणावरील आयसिसचा कब्जा दूर केला. पण, याने संकट निवळले असे मुळीच नाही. दहशत निर्माण करायची तर पाण्याच्या माध्यमातून ते शक्य आहे, असा संदेश दिला गेला. शिवाय पाण्याचा प्रश्न हा केवळ सामाजिक सुरक्षेचा नाही तर तो राष्ट्रीय सुरक्षेचाही बनला. ही परिस्थिती बशर यांना हाताळता आली नाही. आपल्याला विरोधकच नको म्हणून हुकूमशाहीच्या माध्यमातून बशर यांनी सीरियनांचा अनन्वित छळ केला. या साऱ्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले.

बंडखोर गट आक्रमक झाले. सैन्यानेही बशर यांची साथ सोडली. त्यातच रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धामुळे पुरता जायबंदी झाला. अडीच वर्षांपासून तो युक्रेनच्या मागे लागला आहे, तर इराण इस्रायलच्या माऱ्यापुढे हतबल झाला. परिणामी बशर यांचा पाठिंबाच गायब झाला. बशर यांना परागंदा व्हावे लागले. त्यांनी रशियामध्ये आश्रय मिळविला. सीरियन जनतेने रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला.

मोहम्मद अल जोलानी यांच्या नेतृत्वातील हयात तहरिर अल शाम या बंडखोर संघटनेने सीरियामध्ये वर्चस्व मिळविले आहे. अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या या संघटनेमुळे सीरियाची वाटचाल आता अफगाणिस्तानसारखी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानात आपला कारभार सुरू केल्यापासून मानवाधिकारांचे प्रचंड उल्लंघन केले जात आहे. खासकरून महिलांना अनेक जाचाला तोंड द्यावे लागत आहे. आता सीरियातही हे दुष्टचक्र सुरू होणार असल्याच्या वदंता आहेत. तसेच, दहशतवादी संघटनाच देश चालवायला लागल्या तर नजीकच्या काळात काय घडेल, याची कल्पनाही अनेकांना करवत नाही. कारण, देशाची साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा, लष्कर, भूभाग असे सारेच अधिकृतपणे त्यांना वापरता येणार आहे. पश्चिम आशियातील संकटग्रस्त देशांमध्ये अशा प्रकारचा अंकुर रुजणे ही धोक्याची घंटा तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. बंडखोर गटांना देश योग्य पद्धतीने चालविता येईल का? सीरियनांचे प्रश्न ते सोडवू शकतील का? महागाई, बेरोजगारीसह असंख्य प्रश्न निकाली काढण्यात बंडखोर यशस्वी होतील का? अशी प्रश्नांची मालिका निर्माण झाली आहे.

बांगलादेशातही नागरी उठाव झाला. निवडणुका घेऊन देशाला स्थिरतेकडे नेण्याची जबाबदारी हंगामी सरकारची आहे. मात्र, बांगलादेशचे संस्थापक रेहमान यांचे चित्र नोटेवरून घालविण्यासाठी नव्या नोटा छापण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. यातून देशाचे सारे प्रश्न सुटणार आहेत का? हाच प्रकार सीरियातही घडणार आहे का? बंडखोर गटाची वाटचाल, त्यांची ध्येयधोरणे आणि भूमिका हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी सीरियन हे आगीतून फुफाट्यात जात असल्याचेच चित्र आहे.

bhavbrahma@gmail.com

लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in