बाळासाहेबांच नाव घेत शिवसेनेवर घाला...!

मुंबई ‘केंद्रशासित’ करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला, त्या प्रत्येक वेळी शिवसेनेनं उग्र आंदोलन करून केंद्राचा डाव हाणून पाडलाय
बाळासाहेबांच नाव घेत शिवसेनेवर घाला...!

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी! ती आपल्याच हातात हवीय, यासाठी प्रधानमंत्री, गृहमंत्री, सर्वच भाजपनेत्यांनी चंग बांधलाय. मुंबई हे ‘कॉस्मोपॉलिटन’ शहर आहे. भविष्यात काहीही विपरीत घडू शकतं हा धोका ओळखूनच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ‘शिवसेना’ची स्थापना केली. तेव्हापासून मुंबईतल्या मराठी माणसांचा आवाज बनून शिवसेना काम करतेय. राजकीय पटलावर शिवसेनेनं अनेकदा वेगवेगळी भूमिका घेतली आणि हिंदुत्ववादी विचाराला पाठबळ दिलं असलं तरी, मुंबईत आजही मराठी माणसांसाठी फक्त शिवसेनाच रस्त्यावर उतरते. हे दिसून आलंय.

मुंबई ‘केंद्रशासित’ करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला, त्या प्रत्येक वेळी शिवसेनेनं उग्र आंदोलन करून केंद्राचा डाव हाणून पाडलाय. भाजपला मुंबईवर ताबा घेण्यात सर्वात मोठा अडथळा ‘शिवसेना’ आहे; म्हणून शिवसेनेलाच संपवण्याचा, तिला गाडून टाकायचा धूर्त राजकीय डाव खेळला गेलाय. १९६० साली मुंबई आपल्याला मिळाली नाही, याची खंत आणि सल गुजरातधार्जिण्या नेत्यांना मुंबई मराठी माणसांनी मिळवली हे शल्य आहेच. ‘भाजप बंद दाराआड काही करत नाही, जे करते ते खुलेआम, डंका वाजवून करते...’ असं म्हणत शिवसेनेवर तोफ डागणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांसोबत फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतो, असा सवाल करत शिवसेनेनं पुढची रणनीती स्पष्ट केलीय. २०१९ ला महाराष्ट्रातून भाजपची सत्ता उलथवून टाकल्यामुळं शिवसेनेचा बाण थेट काळजात घुसल्यानं शिवसेनेचं अस्तित्वच संपवायचंच, असा निर्धार शहांनी मुंबईमध्ये व्यक्त केलाय.

ज्या शिवसेनेचं बोट धरून भाजपनं वाटचाल केली. आपलं ‘कमळ’ घराघरात पोहोचवलं. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेनं लाख लाख मतं मिळतात!’ असं प्रमोद महाजन म्हणत. म्हणून वाजपेयी-अडवाणी यांच्यासोबत शिवसेनाप्रमुखांचा फोटो भाजपच्या प्रचारात असायचा. त्यावेळी भाजपची सर्व मदार शिवसेनेवर होती. आज पुन्हा एकदा मोदींऐवजी फडणवीस आणि इतर नेते शिवसेनाप्रमुखांच्या नावानं मतांचा जोगवा मागताहेत. तर दुसरीकडं ज्यांनी सत्तेचा मार्ग दाखवला त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुंबईतून गाडण्याची भाषा केली जातेय. ‘शिवसेनेचं अस्तित्वच शिल्लक ठेवायचं नाही!’ असा हल्लाबोल शहा यांनी केला. तर फडणवीसांनी ‘शिवसेना संपविण्यासाठी आपल्या जीवनातली ही शेवटची निवडणूक आहे, अशा जिद्दीनं निवडणुकीत उतरून मुंबई शिवसेनेकडून खेचून घ्या...!’ असं म्हटलंय! त्यावर ‘शिवसेनेचं अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली, त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्रानं स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्ध घातलीत, असं महाराष्ट्राचा इतिहास सांगतो!’ असा पलटवार शिवसेनेनं केलाय. यापूर्वी कम्युनिस्ट पक्षानं, काँग्रेसनं, रजनी पटेल, मुरली देवरा, पृथ्वीराज चव्हाण, सुरेश कलमाडी यासारख्या नेत्यांनी शिवसेना संपवण्याच्या वलग्ना केल्या होत्या. आता शहा-फडणवीस करताहेत. आज कम्युनिस्ट, काँग्रेसची काय अवस्था आहे. हे आपण पाहतो. आजवर अनेकांनी ‘शिवसेना संपेल, ती आम्ही संपवणार’ असं भविष्य वर्तवलं होतं; पण शिवसेना संपली नाही तर उलट ती प्रत्येक वेळी अधिक जोमानं उसळून उभी ठाकलीय, हा इतिहास आहे. हे भाजपनं लक्षात घ्यायला हवंय! शिवसेनेला डिवचल्यावर नेत्यांपेक्षा रस्त्यावरचा सामान्य शिवसैनिक हा अधिक त्वेषानं उठून कामाला लागतो आणि समोरच्याची दणाणून सोडतो. त्यामुळं अमित शहा यांच्या, ‘शिवसेना संपवून गाडून टाका…!’ या वक्तव्यावर शिवसेनेच्या शाखाशाखात, चौकाचौकांत प्रतिक्रिया उमटत असून, काहीही झालं तरी आम्ही काय आहोत हे दाखवण्याची वेळ आल्याची भावना तळागाळातल्या कार्यकर्त्यांत निर्माण झालीय! मुंबईच्या दंगलीत हिंदूंच्या अंगावर आलेल्यांना थोपवून त्यांचा नि:पात शिवसेनेनं केल्याचं केवळ मराठी माणसांनीच नाही तर इथल्या परप्रांतीयांनीही अनुभवलंय. त्या संकटाच्या काळात हिंदूंच्या संरक्षणासाठी ना संघ स्वयंसेवक धावून आले ना भाजपचे कार्यकर्ते! त्यामुळं मुंबईकरांना शिवसेना ही आश्वासक वाटते ती सारी मंडळी आजही शिवसेनेच्या पाठीशी उभी राहतील. त्यांना आपल्या प्रांतात, शहरात अमुक एकपक्ष हवा असला तरी मुंबईत त्यांना शिवसेनाच हवी असते! भाजप नेत्यांनी आणि फुटिरांनी कितीही प्रयत्न केले तरी लोक शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभं राहतील, असं आजचं चित्र आहे.

केंद्र सरकारनं मुंबईतली अनेक महत्त्वाची कार्यालये गुजरातला वा दिल्लीला हलवलीत. पण तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याला कसलाही आक्षेप घेतला नाही की, विरोधही केला नाही. किंबहुना, फडणवीसांच्या पाठिंब्यानंच मुंबई आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचं कारस्थान केंद्रानं पार पाडलंय. मुंबईत, भाजपला एकहाती सत्ता का हवीय याची ही कारणं आहेत. यासाठीच त्यांचा जीव तडफडतोय. आपल्या मार्गातला मोठा अडथळा ‘शिवसेना’च आहे, हे त्यांनी जाणल्यानं फुटीर शिवसैनिकांच्या खांद्यावरून शिवसेनेवर शरसंधान भाजपनं आरंभलंय. मुंबईची सत्ता खेचून घेणं हा मनसुबा अमित शहांनी उघडपणे व्यक्त केलाय. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता असूनही भाजपनं मुंबईत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला होता हा इतिहास आहे. शिवसेनेचे तुकडे केल्याशिवाय ती शक्ती कमकुवत होणार नाही, आपला हेतू साध्य होणार नाही, ही खूणगाठ बांधून मोदी-शहा कामाला लागले अन‌् एकनाथ शिंदेंना हाताशी धरत शिवसेनेत फूट पाडलीय. आमदार, खासदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून अनेक आमिष दाखवत राजकीय खेळी करत शिवसेनेच्या आमदारांना फोडण्यात यशही मिळवलं.

शिवसेना दुबळी करायची, तिची विरोधाची शक्ती संपवायची, मुंबई बळकवायची, शिवसेना आणि मराठी माणूस यांचं मुंबईतलं वर्चस्व आणि अस्तित्व संपवायचं, हा त्यांचा कुटील डाव आहे. मुंबई आपल्या हातात नसल्याची, आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योग असलेल्या शहरावरचा कब्जा नसल्याची, आर्थिक राजधानीतल्या महापालिकेचा ताबा नसल्याची खंत मोदी-शहा यांना आहेच, त्यासाठी मराठी माणसांचा गळा धरला जातोय. साथीला फितूर ४० खंडोजी खोपडेचे वारस सज्ज झालेत. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. शिवसेनेची शकलं झाल्यानं मराठी माणसाची शक्ती क्षीण झालीय, कमकुवत झालीय, हे लक्षात आल्यानं शिवसेनेच्या वर्मी घाव घालण्याचा मनसुबा जाहीर झालाय. फुटिरांच्या साथीनं शिवसेना संपविण्याचा चंग बांधलाय. मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंना आपली प्रॉपर्टी वाचवायचीय की शिवसेना? एकीकडं मराठी माणसांच्या हातात असलेली मुंबई शिवसेनेकडून हिसकावून घेऊन ती कायम मराठी माणसाचा दुस्वास करणाऱ्यांकडं सोपवायची आणि म्हणायचं आम्ही शिवसेना वाचवतोय!... शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हिरावून घेऊन भाजपच्या चरणांशी नेवून ठेवायचं आणि म्हणताय आम्ही शिवसेना वाचवतोय...! भाजपची नेतेमंडळी, खुद्द पक्षाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, फुटकळ लोकही खुलेआम शिवसेनेला संपवण्याच्या धमक्या करतायत आणि शिंदे म्हणतायत, आम्ही शिवसेना वाचवतोय...! शिवसेना संपवून मराठी माणसांची शिवशाही संपुष्टात आणून भाजपची हुकूमशाही अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचं, धडपडायचं आणि म्हणे आम्ही शिवसेना वाचवतोय...! मराठी माणसाला पाण्यात पाहणाऱ्या गुजराथ्यांच्या मनातला सल दूर करण्यासाठी १०५ मराठी माणसांचा बळी घेणाऱ्या मोरारजी देसायांच्या वारसांच्या हाती मुंबई सोपविण्याचं पाप करू पाहणाऱ्या तुमच्यासारख्या फुटीर नतद्रष्टांना आज हिंदूहृदयसम्राट, शिवसेनेचे जन्मदाते बाळासाहेबांचं नाव घ्यायची लायकी राहिलेली नाही. शिवसेनेचा परिसस्पर्श झाल्यानं तुमचं आयुष्य झळाळून निघालंय, तुम्ही घडलात, नावलौकिक झाला, गर्भश्रीमंतही बनलात. आता त्याच शिवसेनेच्या नरडीचा घोट घ्यायचा प्रयत्न करताहात; पण लक्षात ठेवा निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक आणि मराठी माणसं आपली कवचकुंडलं असलेल्या शिवसेनेला संपवण्याचा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न चालवलाय आणि महाराष्ट्राला सांगताय की, आम्ही शिवसेना वाचवतोय...! तुम्हाला शिवसेना वाचवायची असती तर शिवसेनेशी गद्दारी केलीच नसती, ज्या माणसानं स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर ठेवला, त्याच माणसाला दगा देऊन त्याला संपवण्याची भाषा करताय, हे महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. हा महाराष्ट्रच तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in