
- शिक्षणनामा
- रमेश बिजेकर
तक्षशिला हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे शिक्षण केंद्र होते. गांधार देशाची राजधानी असलेल्या या ठिकाणाचे आजचे स्थान पाकिस्तानात आहे. इथे स्थापलेले तक्षशिला विद्यापीठ ज्ञान, विचार आणि अभ्यासाच्या अद्वितीय परंपरेचे प्रतीक मानले जाते. बुद्ध धम्म, प्राकृत भाषा आणि समाजात समतेची भावना यांचे शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठात वर्ण, जात वा धर्म यावर आधारित अडथळे नव्हते. तक्षशिला विद्यापीठाच्या कार्यपद्धतीतून प्राचीन भारतातील लोकशाही विचार, मुक्त शिक्षण प्रणाली व सामाजिक समतेचा आदर्श स्पष्टपणे दिसून येतो.
गांधार देशाची राजधानी तक्षशिला होती, त्यावरून विद्यापीठाचे नाव तक्षशिला पडले. सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे. रावळपिंडीतील (पेशावर) सराईकल रेल्वे स्टेशनजवळ हे ठिकाण आहे. पुरातत्त्व विभागाने प्राचीन वारसा म्हणून जतन करून ठेवला आहे. सिंधु नदीच्या खोऱ्यात Takshashilaसिंधु संस्कृती जन्मली व विकसित झाली. त्या भौगोलिक प्रदेशाचे भौगोलिक सहसंबंध तक्षशिला विद्यापीठाशी जोडलेले दिसतात. नदीचा सतत वाहणारा व सुपीक करणारा नैसर्गिक गुण समाजाच्या विविध अंगाला लावून आपण बघू शकतो. हे तत्त्व ज्ञानार्जनाचा मूलाधार असतो. तक्षशिला विद्यापीठ या तत्त्वावर उभे होते.
बुद्ध धम्माचा प्रसार प्राकृत भाषेत करण्याचा व संस्कृतमध्ये न करण्याचा नियम भिक्षु संघासाठी बुद्धाने केला होता. ज्ञान प्रवाहित व खुले असण्यासाठी लोकभाषेत ज्ञानार्जन होणे महत्त्वाचे असते. या सूत्राचा वापर तक्षशिला विद्यापीठात होत होता. तक्षशिलेत प्राकृत भाषेत शिक्षण दिल्या जात होते. प्राकृतचा अर्थ घरात बोलणारी भाषा असा होतो. दुसरा अर्थ प्रकृती वा अंबा असाही होतो. म्हणजे प्राकृत भाषा स्त्रीसत्ताक कृषिप्रधान व्यवस्थेची भाषा होती. ही भाषा संस्कृत पूर्व भाषा होती, असे इतिहासकार सांगतात. प्राकृत भाषेच्या पुरस्कारातून लोकभाषा व स्त्रीसत्ताक व्यवस्थेशी (सांख्य तत्त्वज्ञान) बांधिलकी तक्षशिलेची दिसून येते. वर्ण, धर्म, प्रांत, भाषा इत्यादी अट तक्षशिला विद्यापीठात प्रवेशासाठी लागत नव्हती; मात्र प्रवेशासाठी वयाची १५ वर्षे पूर्ण करण्याची व पालकाची संमती बंधनकारक होती. उच्च शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या अटीचा उल्लेख कुठे सापडत नाही. बौद्ध शिक्षणात प्राथमिक शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था होती का? बौद्ध शिक्षण व्यवस्थेला समांतर गुरुकुल व जैन शिक्षण पद्धती कार्यरत होती. या दोन्ही व्यवस्थेत प्राथमिक शिक्षणाची सोय होती, उच्च शिक्षणाची नव्हती. गुरुकुल वा जैन पद्धतीत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तक्षशिलेत उच्च शिक्षणासाठी येत होती का? या प्रश्नांची उत्तरे आमच्या अभ्यासात आम्हाला सापडली नाहीत. प्रवेशित विद्यार्थ्यांना अंतेवासी म्हणत. ‘एज्युकेशन इन एन्शन इंडिया’ या पुस्तकात हाटमट शार्फ यांनी एक विशिष्ट नोंद घेतलेली आहे, जी शिक्षण विनामूल्य नसल्याचे निदर्शक आहे. त्यांच्या मते, अंतेवासी दोन प्रकारचे होते. १) धम्मातेवासिक व २) आचारियभागदायक. शिक्षण शुल्कापोटी वा आचारिय भाग म्हणून विद्यार्थी शुल्क अदा करी त्यांना आचारियभागधारक म्हणत असत. जे विद्यार्थी रोख शुल्क भरू शकत नसत त्यांना दिवसा गुरूची सेवा वा इतर कामे करावी लागत व रात्री अध्ययन करत. शिक्षण, आहार, निवास व आरोग्य अशी एकात्म सुविधा तक्षशिला विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिली जात होती. विद्यापीठात निष्णात आचार्य होते. ते त्यांच्या विषयात पारंगत होते. विज्ञान, गणित, औषधशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान, धर्म, कायदा, संगीत, व्यायाम हे विषय तक्षशिला विद्यापीठात शिकवले जात होते. भारतीय समाज विकासाच्या प्रदीर्घ टप्प्यात तक्षशिला विद्यापीठातील ज्ञान परंपरेचे मोठे योगदान राहिले आहे. तक्षशिला विद्यापीठानंतर वेदांतिक व जैन परंपरेची विद्यापीठे अस्तित्वात आली व बौद्ध परंपरेतील नालंदा व इतर विद्यापीठे अस्तित्वात आली.
तक्षशिला विद्यापीठ स्थापनेच्या कालखंडात वेगवेगळे दावे केलेले आहेत. जातक कथेच्या आधारावर तक्षशिलेची स्थापना इसवी पूर्व ५०० ते ४०० असावी, असे अभ्यासक सांगतात आणि नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सन ४१७ मध्ये झाल्याचे पुरावे मिळतात. तक्षशिला व नालंदांच्या कालखंडात साधारणत: ८०० ते ९०० वर्षांचे अंतर होते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तक्षशिला विद्यापीठाचा काळ हा वर्ण व्यवस्थेचा काळ होता, तर नालंदा विद्यापीठाचा काळ जाती व्यवस्थेचा होता. बुद्धाने वर्ण व्यवस्थेचा अंत करून उगवत्या जाती व्यवस्थेचा प्रतिवाद केला. वर्ण व्यवस्थेच्या तुलनेत जाती व्यवस्था अधिक उत्पादक असली, तरी दोन्ही व्यवस्था शोषणाधिष्ठित होत्या. व्यवस्था बदलासह उत्पादनाचे साधन व संबंध बदलतात. त्याचे परिणाम समाजाच्या सर्वच क्षेत्रावर होतात. शिक्षणावरही याचे परिणाम झाले. पूर्व-मीमांसा, न्याय, वैशेषिक ही ब्राह्मणी तत्त्वज्ञाने जाती व्यवस्थेची समर्थक ज्ञानपरंपरा होती. या तत्त्वज्ञानाचा प्रभाव गुरुकुल शिक्षण पद्धतीवर होता. (या ज्ञानपरंपरेचा पुरस्कार ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणात केला आहे.) जाती व्यवस्थाविरोधी बौद्ध, सौत्रांतिक ज्ञानपरंपरेचा पुरस्कार नालंदा विद्यापीठ करत होते.
ब्राह्मणी व बौद्ध ज्ञानपरंपरेतील शिक्षण केंद्रे समजून घेण्यासाठी जाती व्यवस्थेची निर्मिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. जाती व्यवस्थेचा उदय व वर्ण व्यवस्थेशी तिचे सहसंबंध शरद पाटील पुढीलप्रमाणे उलगडतात, ‘वर्ण गणप्रथाक समाजाची संस्था असून, तिचा उगम स्त्रीसत्तेत झाला व संघगणात तिचा अंतिम विकास झाला, तर दासप्रथाक गणसमाजाच्या या सर्वोच्च अवस्थेच्या विघटनाबरोबर जाती या संस्थेचा प्रथम उदय झाला. जाती ही संस्था भारतीय सामंतप्रथाक समाजाचे अपत्य आहे.’ वर्ण व्यवस्थेच्या सर्वोच्च विकासानंतर ती नष्ट होऊन क्रमाक्रमाने जाती व्यवस्थेचा उदय-विकास झाला. उत्पादनाचे संबंध बदलले. वर्ण व्यवस्थेच्या तुलनेत जाती उत्पादन पद्धती अधिक उत्पादक असल्यामुळे ती सुरुवातीला वर्धिष्णु राहिली व जाती उत्पादन संबंध अस्तित्वात आले. पुढे ती कर्मठ होऊन टोकाची शोषण व्यवस्था बनली. समाजाचा मूलभूत पाया उत्पादन, वितरणाचा असतो. सामंती (जाती) समाजाचा पाया जाती संबंधावर उभा झाल्यामुळे भौतिक उत्पादनाचा वाटा जाती संबंधावर उभा झाला. उतरंडीच्या या समाज रचनेत सर्वात वरच्या जातीला सर्वाधिक व खालच्या जातींना क्रमश: कमी-कमी होऊन तळाच्या जातींना सर्वाधिक कमी वाटा मिळण्याची रचना उभी झाली.
जातीगत उत्पादन संबंध व विषम भौतिक वाटा ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सांस्कृतिक पर्याय उभे करण्यात आले. शूद्रांना अभिसिंचनाचा अधिकार नाकारून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांना उपनयनाचा संस्कार शिल्लक ठेवला. या संस्कारातून उच्चत्व व हीनत्वाची सामाजिक रचना उदयाला आली. द्विज जातींना उच्चत्व व शूद्रांना हीनत्व प्राप्त झाले. या सामाजिक रचनेची सांस्कृतिक घडण करण्याची भूमिका श्रौतस्मार्त (हिंदू धर्माची पूर्वपिठिका) धर्माने बजावली. भौतिक व सांस्कृतिक रचनेने जाती व्यवस्था पुढील सहा लक्षणांनी युक्त झाली. १) जात जन्मसिद्ध झाली. २) व्यवसाय जन्मसिद्ध झाला. ३) राेटी व्यवहार जातीतच ४) बेटी व्यवहार जातीतच ५) जातीनिहाय व बहिष्कृत वस्त्या ६) जातीचे नियमन व दंडन जातपंचायतीमार्फत. ही सहा लक्षणे कर्मठ जाती व्यवस्थेची निदर्शक आहेत. पुढे ती सती प्रथेपर्यंत अमानवीय झाली.
नालंदा विद्यापीठाचा स्थापनेचा काळ जाती व्यवस्थेचा वर्धिष्णू काळ होता. या काळात पूर्व मीमांसा, न्याय, वैशेषिक ही ज्ञान परंपरा पुरुषसत्ताक जाती व्यवस्थेची समर्थक, तर सांख्य, जैन व बौद्ध, सौतांत्रिक ज्ञान परंपरा पुरुषसत्ताक जाती व्यवस्थेची विरोधक ज्ञान परंपरा होती. या परस्परविरोधी ज्ञान परंपराच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ब्राह्मणी-अब्राह्मणी शिक्षण केंद्राकडे बघावे लागेल. नालंदा विद्यापीठ ब्राह्मणी की, अब्राह्मणी हे आपण पुढे पाहूया. (क्रमश:)
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र,
Ramesh.bijekar@gmail.com