नव्या नेतृत्त्वाची कसोटी

निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली! गेहलोत यांच्या समर्थकांनी जो ‘पवित्रा’ घेतला होता त्याची आपणास कल्पना नव्हती
नव्या नेतृत्त्वाची कसोटी

होणार, होणार म्हणून गाजत असलेली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या १७ ऑक्टोबर रोजी झाली. अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेे हे प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांचा त्यांनी दारुण पराभव केला. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी- नेहरू घराण्यातील कोणीही उभे राहणार नाही, असे पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घोषित केले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत, दिग्विजयसिंह, मुकुल वासनिक आदींच्या नावांची चर्चा होत होती. अशोक गेहलोत यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले होते. पण राजस्थानचा नवा मुख्यमंत्री निवडला जात असताना गेहलोत समर्थकांनी जी ‘खेळी’ खेळली त्यामुळे या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली! गेहलोत यांच्या समर्थकांनी जो ‘पवित्रा’ घेतला होता त्याची आपणास कल्पना नव्हती, असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी कितीही म्हटले तरी त्यामागील ‘बोलविता धनी’ गेहलोतच होते हे काही सांगायला नको! नंतर झाल्या प्रकाराबद्दल गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची माफी मागितली आणि आपण अध्यक्षपदाच्या रिंगणात नसल्याचे घोषित केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे आले. शशी थरूर हे काँग्रेसमधील ‘जी- २३’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या बंडखोर गटाचे सदस्य. पण या ‘जी -२३’ गटातील अनेकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. गेल्या २४ वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याच्या गळ्यात पडली आहे. गेल्या १३७ वर्षांचा विचार करता काँग्रेस अध्यक्षपदासाठी सहावेळा निवडणूक झाली होती. त्यातील पाच निवडणुकांमध्ये गांधी - नेहरू घराण्याबाहेरची व्यक्ती अध्यक्षपदी निवडली गेली होती. या आधी २००० साली अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात निवडणूक झाली होती. त्यामध्ये सोनिया गांधी प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या. जितेंद्र प्रसाद हे तीन अंकी संख्याही गाठू शकले नव्हते. आतापर्यंत डी. संजीवय्या, बाबू जगजीवराम या दलित नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. ते पद भूषविणारे मल्लिकार्जुन खर्गे े हे तिसरे दलित नेते ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांपैकी ३९ वर्षे गांधी - नेहरू घराण्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद होते. त्यातील २३ वर्षे अध्यक्षपदी सोनिया गांधी या होत्या. काँग्रेसचे नेतृत्व प्रामुख्याने गांधी नेहरू घराण्याकडे राहिल्याने विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप सातत्याने केला जात होता. या निवडणुकीमध्ये गांधी - नेहरू घराण्यातील कोणीही उभे न राहिल्याने आणि अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखा अनुभवी नेता निवडून आल्याने विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्यासाठी आता अन्य निमित्त शोधावे लागेल! काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी निकालानंतर खर्गे े यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनीही खरगे यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या ‘भारत जोडो’ यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना, भविष्यात आपली भूमिका काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अध्यक्षपद हे पक्षातील सर्वोच्च पद आहे. माझी भूमिका काय असेल, माझ्यावर काय जबाबदारी असेल याचा निर्णय पक्षाध्यक्षच घेतील, असे स्पष्ट करून पक्षाची सूत्रे यानंतरही ‘फर्स्ट फॅमिली’कडेच राहतील, हा समज राहुल गांधी यांनी खोडून काढला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपद देऊन जो माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन, असे खर्गे े यांनी आपल्या विजयानंतर बोलताना सांगितले. यावेळी खर्गे यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विशेष आभार मानले. सोनिया गांधी यांनी वैयक्तिक त्याग करून गेल्या २३ वर्षांत रक्त आणि घाम गाळून पक्षाला मोठे केले, याचा आवर्जून उल्लेख खर्गे यांनी केला. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने केंद्रात दोन वेळा सरकार स्थापन केले; तसेच अन्य राज्यांमध्येही सरकारे स्थापन केली, हे खर्गे े यांनी निदर्शनास आणून दिले. कर्नाटकमध्ये पक्षाच्या जबाबदाऱ्या सांभाळत खर्गे े यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषविले होते. राजकारणाचा ५६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले खर्गे त्यांच्यावर जी जबादारी सोपविण्यात आली आहे ती यशस्वीपणे पार पडतील आणि काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देतील, अशी अपेक्षा!

logo
marathi.freepressjournal.in