ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई

तब्बल २० वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. ही युती राज्याच्या हितासाठी ठरेल की केवळ राजकीय अस्तित्वाची लढाई ठरेल, याचा निर्णय निकालानंतरच होईल.
 ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई
ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाईPhoto : X (@OfficeofUT)
Published on

महाराष्ट्रनामा

गिरीश चित्रे

तब्बल २० वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. ही युती राज्याच्या हितासाठी ठरेल की केवळ राजकीय अस्तित्वाची लढाई ठरेल, याचा निर्णय निकालानंतरच होईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन् उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोमिलन झाले अन् युतीची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी केली. मुंबईकरांसह राज्यातील बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या मनात होते ते स्वप्न अखेर २० वर्षांनंतर पूर्ण झाले. दोन कुटुंबे एकत्र येतात ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्रातील राजकारणात मनसे व शिवसेना दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचे २० खासदार निवडून आले, तर विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंना जनतेने काहीशी पसंती दिली. मात्र मनसेला शून्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही.

आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. या निवडणुकीसाठी मराठी माणूस, मुंबई यासाठी मनसे व शिवसेनेची युती झाली, असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी मराठी माणूस टिकणे यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढविण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ठाकरे सेना आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. मुंबई महानगरपालिकेत भगवा फडकवणे आणि राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणे हे मनसे व शिवसेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे.

सन २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत कोण विजयी होईल हे १६ जानेवारीला निकालानंतर स्पष्ट होईलच. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश प्राप्त करणे मनसे व शिवसेनेसाठी ‘करो या मरो’सारखी लढाई असणार आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे सन २०२९पर्यंत राज्यात व केंद्रात भाजपचे वर्चस्व कायम आहे, तर २०२९पर्यंत विरोधकांना आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानावी लागणार आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्याची ही ठाकरे बंधुंसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे हे महाराष्ट्र हितापेक्षा मनसे-शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या अधिक फायद्याचे ठरणार आहे.

शिवसेनेत असताना तीव्र अंतर्गत मतभेद उफाळून आल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांची बोलण्याची शैली बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे असल्याने त्यांच्या सभेला तुफान गर्दी होते. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने पहिली मुंबई महापालिका निवडणूक लढवली आणि २८ नगरसेवक निवडून आले, तर विधानसभा निवडणुकीत १३ आमदार विजयी झाले. मात्र त्यानंतर हा विजयाचा धडाका त्यांना कायम राखता आला नाही. मनसेला उतरती कळा लागली आणि आजच्या घडीला ना एक आमदार ना एक नगरसेवक, अशी राजकीय स्थिती मनसेची झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत असली तरी ती मतांमध्ये रूपांतर होत नसल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली असून अनेक माजी नगरसेवकांनी जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीची लढाई आहे.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनीही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता काबीज करण्याकडे आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) सहभागी होत असल्याने एकनाथ शिंदे यांनीही अधिकाधिक नगरसेवक निवडून आणत मुंबई महापालिकेवर आपला दबदबा प्रस्थापित करण्याच्या रणनीतीवर अधिक भर दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तितकासा जोर मुंबईत नसल्याने राष्ट्रवादीने ग्रामीण भागात मोर्चा वळवला आहे. मात्र शिवसेनेचा जन्म मुंबईतला, मराठी माणूस, मराठीसाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक इकडेतिकडे हललेला नाही. याउलट मनसेकडे आजघडीला ना आमदार-ना नगरसेवक अशी बिकट परिस्थिती उद‌्भवली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज यांना मुंबईत राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. याआधी भाजपसोबत मनसे गेली. तथापि, त्यांना जनतेने नाकारले. त्यातून धडा घेत मनसेने आता ठाकरे यांच्या शिवसेनेशी सूत जुळविले आहे. मुंबईच्या राजकीयपटलावरील ‘राज’ कायम राहील का, हे १६ जानेवारीला निकालानंतर स्पष्ट होईलच.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषण करण्याची ठाकरे शैली, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो अशी साद बाळासाहेब आपल्या शिवसैनिकांना घालत असत. त्यांचा खर्जातील आवाज ऐकताच जोरदार टाळ्यांचा गजर, घोषणाबाजी केली जात असे. अगदी त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची शैली असून त्यांच्या भाषणाला सुरुवात होताच तोच टाळ्यांचा गजर, तीच घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या इंजिनाची दिशाच बदलली नाही, तर आपली राजकीय भूमिकाही बदलली आहे. आता आपल्या भाषणांमधून करिष्मा दाखविण्याची नामी संधी त्यांना चालून आली आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारात ते आपला करिष्मा कसा दाखवितात यावरच त्यांचे आणि त्यांच्या राजकीय आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

gchitre4@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in