
महाराष्ट्रनामा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनोमिलन होणार ही चर्चा न राहता, आता युती होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना दिलजमाईचे संकेत गुरुवारी वर्धापन दिनी दिले. “महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे मत मनसे व शिवसेनेच्या चाहत्यांनी व्यक्त केले आहे. परंतु महाराष्ट्राच्या हितापेक्षाही ठाकरे बंधूंसाठी राजकीय अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे.
सन २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढील चार ते पाच महिन्यांत या निवडणुका पार पडतील. निवडणुकीत कोण विजयी होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईलच; मात्र त्यानंतर पुढील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२९ मध्ये होतील. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे २०२९ पर्यंत भाजपचे वर्चस्व टिकण्याची शक्यता आहे. विरोधक आरोप-प्रत्यारोप करण्यातच गुंतलेले राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याची ही एकमेव संधी आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या हितापेक्षा मनसे-शिवसेनेसाठी अधिक फायदेशीर आहे.
अंतर्गत वादातून राज ठाकरे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांची भाषणशैली बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी असल्यामुळे त्यांच्या सभांना आजही तुफान गर्दी होते. शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर मनसेने मुंबई महापालिका निवडणुकीत २८ नगरसेवक निवडून आणले. विधानसभा निवडणुकीत १३ आमदार विजयी झाले. मात्र त्यानंतर मनसेचा प्रभाव कमी झाला आणि आज ना एकही आमदार, ना एकही नगरसेवक अशी स्थिती आहे. सभांना गर्दी असूनही मतांमध्ये रूपांतर होत नसल्याने राज ठाकरे नक्कीच चिंतेत असतील. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली असली, तरी त्यांच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. मात्र विधानसभेतील पराभवानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी 'करो किंवा मरो' अशी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंचे एकत्र येणे अपरिहार्य वाटते.
मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी रणनीती आखली आहे. भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजप एकहाती सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखत आहे. शिवसेनेतील माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत असल्यामुळे शिंदे गटाचे महापालिकेतील वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जोर मुंबईत फारसा नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
शिवसेनेचा जन्म मुंबईचा. त्यामुळे शिवसैनिकांचा आजही मुंबईवर ठसा आहे. राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून चांगली सुरुवात केली, पण २०१४ नंतर त्यांची पीछेहाट झाली. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेत राजकीय पुनरागमनासाठी त्यांना योग्य चाल खेळावी लागणार आहे. भाजपसोबत केलेली युती व महायुतीला दिलेला पाठिंबा जनतेने नाकारला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली, तर मनसेला ‘राज’ परत मिळवता येईल. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी बंड केले आणि ४० आमदार, १३ खासदार व महापालिकेतील नगरसेवक त्यांच्या गटात सामील झाले. तरीही मुंबईत शिंदेंचे विशेष वर्चस्व नाही. मात्र, ते पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाचे मुंबईत बळ असल्यामुळे शिंदे गटाला किती यश येईल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ही लढाई शिवसेना विरुद्ध भाजप अशीच असेल. २५ वर्षे सत्ता भोगलेली शिवसेना पुन्हा महापालिकेत झेंडा फडकवेल का, हे पहावे लागेल. ही लढाई दोन्ही पक्षांसाठीच्या अस्तित्वाची आहे. आगामी निवडणुकीत ठाकरे सेना आणि मनसे एकत्र आली, तर चमत्कार घडू शकतो, याबाबत शंका नाही.
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणशैलीत साम्य असल्याने दोघांच्या सभांना गर्दी होते. पण मनसेची लोकप्रियता मतांमध्ये उतरली नाही. त्यामुळे आता मनसेसाठी एकमेव संधी म्हणजे मुंबई महापालिका. पण राजकारणात सर्व माफ असते. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले, तर ते दोघांसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
gchitre4@gmail.com