

मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार ही आडनावे पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना, ही केवळ भावनिक बेरीज ठरणार की प्रत्यक्ष राजकीय फायदा देणारी जमाखर्ची ठरेल, हा खरा प्रश्न आहे.
ज्यांची बजाबाकी हीच इतरांच्या जमेची बाजू ठरत चालली होती तिथे आता अधिकचे किती याचा जमाखर्च सुरू होणार आहे. महाराष्ट्रात गेली काही दशके मतांचे राजकारण ठाकरे, पवार यांच्या भोवती फिरत होते. त्यांच्या नावाभोवती असणारी मतपेढी कमी करायची असेल तर त्यांचे पक्ष फुटणे आवश्यक होते. हे गेल्या २-३ वर्षांत झाले. सारे काही नियोजनबद्धरित्या सुरू आहे असे त्यांच्या विरोधकांना वाटत असतानाच राजकीय सारीपाटावर नव्याने मांडणी होत आहे.
मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघेल असे दिसते. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येत असतानाच पुण्यात पवार काका-पुतणे यांचे समर्थक एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत. हे का व्हावे, याची इतकी गरज आज का भासावी, हेच लोकसभा किंवा विधानसभेच्या वेळी का झाले नाही, असे प्रश्न पडू शकतात. पण लोकसभा वा विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका होत्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांचा कमालीचा दबाव तर असतोच शिवाय ज्यांच्या भरवशावर आपण राज्य आणि देशाच्या राजकारणात वावरतो त्यांना नाराज करून चालणार नाही, हे ओळखण्यास ठाकरे व पवार नवखे नाहीत.
राज ठाकरे यांनी आपली राजकीय पैस विस्तारण्यासाठी २००६ मध्ये मार्ग वेगळा केला होता. तर अजित पवार आपले काका शरद पवार यांच्यापासून जुलै २०२३ मध्ये दुरावले. ते आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मूळ प्रवाहासोबत राहू पाहत आहेत. आपले एकत्र येणे ही आपली व आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांची राजकीय सोय नसून लोकांसाठी आम्ही काही करू इच्छितो हा विश्वास निर्माण करण्यात दोन्ही नेते यशस्वी ठरले तरच त्याचा फायदा होईल.
उद्धव व राज हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे काय होणार हा प्रश्न जसा त्यांच्या विरोधकांना पडला असेल तसाच तो सामान्य जनतेलाही पडलेला आहे हे शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी लक्षात ठेवलेले बरे. आपले एकत्र येणे हेच मुळी लोकांसाठी सुखावह आहे असे त्यांचे कार्यकर्ते, नेते एकवेळ म्हणतील. पण ते लोकांना वाटते का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. इतरांच्या घरी झगमगाट पाहून आपली विवंचना विसरण्याचे दिवस आता गेले आहेत. गावे असोत व शहरे, नागरिकांच्या प्रश्नांचे स्वरूप वरचेवर बदलते आहे. शहरांच्या समस्यांचा डोंगर पाहिला तर हे सहज लक्षात येईल.
वाढत्या शहरीकरणामुळे राहण्याचे, आरोग्यदायी वातावरणाचे, परवडणाऱ्या शिक्षणाचे असे अनेक प्रश्न आहेत. मुंबईचे आणि पुण्याचे प्रश्न कमी होत नाहीत. केवळ पायाभूत सुविधांची रेलचेल समस्या कमी करत नाही. भाषिक व प्रादेशिक अस्मिता एकवेळ दबाव निर्माण करेल पण त्यातून दैनंदिन जीवनाचे प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आहे. मुंबईचा तोंडवळा गेल्या दोनेक दशकात कमालीचा बदलला आहे. वेगवेगळ्या उद्योगांचे शहर आता फक्त सेवा क्षेत्रापुरते सिमीत झाले आहे. कापड गिरण्यांपाठोपाठ अभियांत्रिकी, औषधनिर्मिती आदी उद्योगांच्या जागा रहिवाशी व व्यापारी कारणांसाठी वापरात आल्या. कामगार हा मुंबईचा कणा होता. तिथे आता फक्त व्हाईट कॉलरवाले सेवाक्षेत्र उरले आहे. मुंबईतला माणूस शक्यतो हे महानगर सोडून जात नाही. त्याची मुले-बाळं इथेच काहीतरी करू इच्छितात. त्यांचे प्रश्न काय, हे समजून घेता आले तर राजकीय लाभ होईल.
मुंबईत ठाकरेंना जे प्रश्न लोक विचारतील तसेच पुणेकर पवारांना विचारतील. पुण्याची बेसुमार वाढ नवनव्या समस्यांना जन्म देत आहे. कायदा व सुव्यवस्था हा केवळ राज्य सरकारचा विषय नाही तर राजकीय आश्रयाखाली समांतर व्यवस्था चालविण्यामुळे निर्माण झालेला आहे. ते चालवणारे कोणाचे ना कोणाचे कार्यकर्ते, समर्थक आहेत. पुण्यात अनेक गृहसंकुले तयार झाली. त्यापैकी किती संकुलांना सक्तीने टँकरचा पाणीपुरवठा स्वीकारावा लागतो आणि किती संकुलांना पालिकेकडून तात्काळ नळजोडण्या मिळाल्या याचा लेखाजोखा निवडणुकीत मांडला जाऊ शकतो का? टँकर लॉबी कोणाच्या आशिर्वादाने काम करते याच्या उत्तरात सारे दडले आहे.
आपल्या जाहीर सभेतल्या भाषणांनी लोक खुश होतात व आनंदाने घरी झोपी जातात असे समजण्याचे काही कारण नाही. जुनी पिढी अस्वस्थ आहे तर नवी पिढी संतप्त आहे. तुमच्या समस्या आम्हाला मान्य आहेत एवढेच म्हणून चालत नाही तर त्या सोडविण्यासाठी किती सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत हे लोकांना पाहिजे आहे.
मुंबईतला मतदार बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे एकवटला व त्या एकगठ्ठा मतांच्या भरवशावर शिवसेना विस्तारली. त्यांच्या थेट आणि स्पष्ट भूमिकेमुळे केवळ मुंबईच नव्हे तर इतर भागातले लोक फिदा झाले. तेव्हा सेनेला कधी पैसे देऊन जाहीर सभांना लोक गोळा करावे लागले नाहीत किंवा उमेदवार आपल्याला किती देणार हे मतदारांनी विचारले नाही. हा काळ आता गेला.
आपल्याबद्दल लोकांना औत्सुक्य आहे ते केवळ नावामुळे नव्हे तर तसे कामही करावे लागणार आहे. केवळ भाजपाप्रणित महायुती कशी वाईट आहे हे सांगण्यापेक्षा आम्ही दोन भाऊ एकत्र येऊन तुम्हाला काय देऊ शकतो हे सांगितले तर ठाकरेंचे मतदार वाढतील. मतदारांनी आपली बांधिलकी मानावी यासाठी केवळ मराठी भाषा व मराठी अस्मिता एवढे पुरेसे नाही. नव्या पिढीचा मतदार रिझल्ट मागतोय. आमच्या समस्या तुम्हाला पटतायत का आणि त्यासाठी कार्यक्रम काय, हे तो विचारणार आहे.
मुंबई महापालिका वर्षानुवर्षे ताब्यात असूनही कोणते प्रश्न तुम्ही सोडविले अशी विचारणा ठाकरेंचे विरोधक उपस्थित करत आहेत. याचे उत्तर २०१७ ते २२ च्या एकट्या सेनेच्या राजवटीवर आधारित द्यायचे की त्याआधी वर्षानुवर्षे सत्तेत भाजपा सहभागी होती त्या आधारावर द्यायचे हा त्यांचा प्रश्न असेलच. एकत्र आलोय ही घोषणा करताना दोन्ही भावांनी जागा किती लढणार हे सांगितलेले नाही. मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत आणि त्यात दोन पक्षांची भर पडलीय असा त्यांचा रोख होता. एक काळ असा होता की कट्टर शिवसैनिक कधीही अमिषाला बळी पडत नसे. नेते सेना सोडून गेले तरी सामान्य सैनिक कधीच बदलला नाही. त्यातूनच तयार झालेले उमेदवार प्रतिस्पर्धी पळवून नेतील ही चिंता का तयार झाली याचाही विचार दोघा भावांना करावा लागणार आहे.
पुण्यात पवारांना अनेक प्रश्न पुणेकर विचारतील. तुम्ही एकत्र येण्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची सोय होईल. पण आमच्या कोणत्या समस्या तुम्हाला पटतात आणि त्यावर तुमचा कार्यक्रम काय, हा प्रश्न निर्माण होतो. विद्वानांचे, मध्यमवर्गीय नोकरदारांचे, शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी राहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे, निवृत्तीनंतर स्थायिक झालेल्यांचे पुणे यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत.
महापालिकास्तरावर मोजमाप होणाऱ्या पुनर्विकास प्रकल्प, एफएसआय, टीडीआर, सार्वजनिक मालकीच्या जमिनी वापरण्याचे हक्क, वेगवेगळी कंत्राटे, पुरवठ्याची कामे यापलीकडे एक वेगळे जग आहे व ते आपल्याकडे रोज आशेने पाहते याची जाणीव राहिली तरच वेगळ्या राजकीय समिकरणांकडे मतदार आकर्षित होईल. अन्यथा रोज तेच तेच.
ravikiran1001@gmail.com