तेच ते आरोप - प्रत्यारोप!

आपलाच मेळावा अभूतपूर्व ठरावा, यासाठी दोन्ही गटांकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते
तेच ते आरोप - प्रत्यारोप!

दसऱ्याच्या दिवशी मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि ठाकरे गटापासून फारकत घेतलेल्या आणि आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दोन स्वतंत्र दसरा मेळाव्यांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले. या दोन्ही मेळाव्यांसाठी दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपलाच मेळावा अभूतपूर्व ठरावा, यासाठी दोन्ही गटांकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्रातील विविध गावे आणि शहरांमधून सीमोल्लंघन करून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या दोन्ही गटांनी भव्य शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडेल. अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. तसेच या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, राडा होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. दोन्ही मेळावे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न होता पार पडले. उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेऊन ४० आमदार आणि १२ खासदारांसह आपला स्वतंत्र गट स्थापन केलेल्या आणि भाजपच्या मदतीने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे गटास आणि उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपापल्या गटाची ताकद किती आहे, हे दाखवून द्यायचे होते. आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यामध्ये दोन्ही गट बऱ्याच अंशी यशस्वी झाले, असे म्हटले तर ते तसे चुकीचे ठरणार नाही. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे कार्यकर्ते पूर्वीप्रमाणे उभे राहतील का, अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण, आपल्या मागे अजूनही शिवसेनेशी ‘एकनिष्ठ’ असलेला शिवसैनिक उभा असल्याचे या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखवून दिले. शिंदे गटाने वेगळी चूल मांडली तरी, आमची ताकद भक्कम असल्याचे या शक्तिप्रदर्शनातून ठाकरे गटाने दाखवून दिले. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सत्तेवर आल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळाली होती. शिंदे गटातील सर्व आमदार, खासदार आणि अन्य नेत्यांनी आपले समर्थक या मेळाव्यास मोठ्या संख्येने येतील यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शिवतीर्थ आणि बांद्रा - कुर्ला परिसरातील मैदान कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने फुलून गेले होते. दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन झाले; पण दसऱ्याच्या निमित्ताने या मेळाव्यांसाठी आलेल्या समर्थकांपुढे काही विचारांचे सोने लुटले गेले का? काही विचार घेऊन हे सर्व समर्थक माघारी घेणे का? या दोन्ही मेळाव्यांमध्ये तेच ते जुने आरोप आणि प्रत्यारोप केले जात असल्याचे दिसून आले. आम्हीच कसे हिंदुत्वाशी वचनबद्ध आहोत आणि शिंदे गटासमवेत असलेला भाजप सोयीस्करपणे कशी भूमिका बदलत राहतो, यावर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या खोके सरकाररूपी रावणाचे दहन आपल्याला करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. मशिदीमध्ये जाऊन संवाद साधणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपणास हिंदुत्वाचे शहाणपण शिकवू नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनाही उद्धव ठाकरे यांनी टीकेचे लक्ष्य केले. गद्दारी केलेल्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का आयुष्यभर तसाच चिकटून राहणार आहे तो पुसला जाणार नाही, अशी टीका शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करूच, असा शब्द त्यांनी आपल्या समर्थकांना दिला. तर बांद्रा-कुर्ला संकुलात आयोजित सभेत एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. बाळासाहेबांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. खरी शिवसेना आमचीच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सत्तेसाठी शिवसेनाप्रमुखांचे विचार विकणारे, अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. खरे गद्दार आपणच आहात, असे शिंदे यांनी ठाकरे यांना ठणकावले. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले विविध आरोप शिंदे यांनी फेटाळून लावले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे शिंदे यांनी तोंड भरून कौतुक केले. शिवसेनेत कोणी मोठा होताना दिसला की त्याचे पाय कापले जातात, असे सांगून, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आनंद दिघे यांचे महत्व कसे कमी केले गेले, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. एकंदरीतच विचारांचे सोने लुटण्याऐवजी हे दोन्ही दसरा मेळावे दिवाळीपूर्वीच आरोप - प्रत्यारोपरुपी भुईनळे आणि फटाके फोडून साजरे झाले!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in