- शरद जावडेकर
शिक्षणनामा
नुकतीच २२ जून रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते व विचारवंत भाई वैद्य यांची ९६ वी जयंती झाली. समाजवादी समाजरचना हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजवाद संपला अशी हाकाटी सुरू झाली. पण सामान्य जनतेच्या विकासाचा ध्यास असलेल्या भाईंचा समाजवादावरील विश्वास अखेरपर्यंत अढळ होता.
अनुकूल वातावरणात चळवळीत सामील होणारे अनेक असतात; पण प्रतिकूल परिस्थितीत अनेकांची पांगापांग होते. विचारावर अविचल निष्ठा ठेवून, ठामपणे वादळाला तोंड देणारे फार कमी असतात! अशा समाजवादाच्या निष्ठावंतांमध्ये भाई वैद्य हे प्रमुख आहेत. २०व्या शतकाच्या सुरुवातीला रशियन राज्यक्रांतीतून समाजवादाचा उदय झाला. वाऱ्यासारखा हा विचार जगभर पसरला व अनेक जणांनी समाजवादी समाजरचना हे आयुष्याचे ध्येय मानले! मात्र २०व्या शतकाच्या उत्तरार्धात, संगणक क्रांतीमुळे समाजाचा व अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून गेला. त्यातून ‘एन्ड ऑफ आयडीयोलॉजी’, ‘एन्ड ऑफ हिस्टरी’, ‘थर्ड वेव्ह’ इ. विचारांची भुरळ बुद्धिजीवींना पडली. ‘समाजवाद संपला’, ‘भांडवलशाही अमर आहे’ अशी हाकाटी काहींनी दिली व जगभर खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे सर्व समस्यांना उत्तर आहे असा प्रचार केला गेला व समाजवाद हा चेष्टेचा विषय केला गेला, पण भाई तथा भालचंद्र सदाशिव वैद्य हे हाडाचे समाजवादी होते.
या प्रतिकूल परिस्थितीतही भाईंनी समाजवादाचा ध्यास सोडला नाही. १९९० मध्ये भाई सतत सांगत राहिले की, जागतिकीकरणामुळे केवळ अर्थव्यवस्थेचे बाजारीकरण होत नाही तर मानवी जीवनाचे बाजारीकरण होणार आहे. म्हणून शेती, शिक्षण, आरोग्य, कामगार क्षेत्र, कल्याणकारी राज्यपद्धती उद्ध्वस्त होईल याकडे लक्ष वेधताना भाईंनी समाजवादाला पर्याय नाही, असेही म्हटले होते. १९९० च्या दशकात जागतिकीकरणाच्या झगमगाटात भाईंच्या इशाऱ्याकडे कोणी लक्ष दिले नाही; पण आज २५-३० वर्षांनंतर ते इशारे खरे ठरलेले दिसतात! शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभावासाठी आंदोलने, महाग शिक्षण व आरोग्य सेवा, बेकारी, प्रचंड विषमता हे ‘खाउजा’ धोरणाचे दुष्परिणाम ७० ते ८० टक्के जनता भोगत आहे! २९ एप्रिल २०२१ मध्ये अमेरिकन काँग्रेससमोर पहिले भाषण करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, “किमान सरकारचा कमाल फायदा मूठभरांना होतो, वॉल स्ट्रीटमुळे देश बळकट होत नाही, सामान्य जनता देश बनवते, झिरपण्याच्या सिद्धांतावर अर्थव्यवस्था चालणार नाही तर अर्थव्यवस्था खालून वर विकसित झाली पाहिजे”. भाई जे १९९० मध्ये सांगत होते तेच बायडन यांनी तीस वर्षांनंतर सांगितले.
भाईंचा जन्म २२ जून १९२७ रोजी दापोडे, ता. भोर, जि. पुणे येथे झाला व लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात भाई मोठे झाले व पुढे भाईंनी एसेमना गुरू मानले होते. भाईंवर गौतम बुद्ध, मार्क्स, गांधी, आंबेडकर व लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे भाईंची समाजवादाची मांडणी समग्र होती, पण त्याच वेळेला ते रस्त्यावरच्या चळवळीचे नेते होते. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संरक्षण कामगार युनियन, आणीबाणीविरोधी आंदोलन, सेझविरोधी आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन व मोफत शिक्षण आंदोलन अशा अनेक आंदोलनांत भाई पुढे होते.
गृहराज्यमंत्री असताना भाईंनी लाच देणाऱ्या व्यक्तीला स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आता आपल्या राजकारणाला नवलकथेसारखी आहे. भाईंनी तत्त्वनिष्ठा व साधेपणा कधीही सोडला नाही. हे सुद्धा आजच्या राजकारणात अद्भूत वाटावे असेच आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राष्ट्र सेवा दलाची व्याप्ती व खोली वाढवली.
भाईंनी शेवटची २० वर्षे शिक्षणाच्या प्रश्नासाठी खर्च केली. ‘खाउजा’ धोरणाच्या परिप्रेक्षात त्यांनी शिक्षणाच्या प्रश्नांची मांडणी केली व शिक्षणाचे खासगीकरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे अशी मांडणी भाईंनी २००० मध्ये केली व ‘के.जी. ते पी.जी. सर्व शिक्षण, सर्व मुलांना मोफत, समान व गुणवत्तापूर्ण मिळालेच पाहिजे’ ही घोषणा भाईंनी दिली. शिक्षण हे राजकारण आहे व त्यामुळे शिक्षणातील बदलासाठी जनआंदोलन आवश्यक आहे हा व्यापकतेचा विचार भाईंनी मांडला! त्याआधी शिक्षणातील चळवळ ही शिक्षकांच्या ‘नोकरीच्या प्रश्नाभोवती’ केंद्रित होती. ती चळवळ भाईंनी ‘बहुजन समाजाच्या शिक्षण’ हक्काभोवती केंद्रित केली! मोफत शिक्षणाच्या मागणीची सुरुवातीला अवास्तव म्हणून टिंगल केली गेली; पण भाई आपल्या मुद्यावर ठाम होते. नंतर अनिल सद्गोपाल यांनी ‘ऑफ इंडिया फोरम फॉर राइट टू एज्युकेशन’च्या चळवळीत मोफत शिक्षणाची मागणी समाविष्ट करून ही मागणी अखिल भारतीय पातळीवर नेली! डॉ. अनिल सद्गोपाल कृतज्ञतापूर्वक या संद र्भात भाईंचा उल्लेख करतात.
भाईंच्या द्रष्टेपणामुळे शिक्षण चळवळीची दिशाच बदलून गेली आहे. शिक्षणातील वरवरच्या प्रशासकीय प्रश्नांवर विरोध करण्यापेक्षा ‘सरकारच्या मार्केटस्मृती व मनुस्मृती’च्या धोरणांवरच हल्ला करण्याची भूमिका भाईंनी घ्यायला सांगितली. या प्रश्नावर जनआंदोलन घडवून आणण्यासाठी भाईंनी महाराष्ट्रभर दोन महिन्यांची ‘शिक्षणयात्रा’ काढली. तर दुसऱ्या बाजूला शिक्षण हक्कासाठी दोन सत्याग्रह केले व चळवळीला संघर्षाची धार दिली. भाईंचे निधन २ एप्रिल २०१८ रोजी झाले. भाई आज असते तर बदलते तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, भारताची परिस्थिती व २१व्या शतकातील समाजवाद यावर त्यांनी वेगळी मांडणी केली असती. समाजवादी, मोफत, धर्मनिरपेक्ष व समान शिक्षणाची चळवळ भारतात उभी करणे यातूनच भाईंचे स्मरण कायम राहील.
(लेखक अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)
sharadjavadekar@gmail.com