-डॉ. तारा भवाळकर
विशेष
कधीही क्षय होत नाही ते अक्षय. अक्षय तृतीयेचा दिवस आणि त्यानिमित्त होणारे साजरीकरण हेच तत्त्व सांगते व प्रत्येक चांगल्या गोष्टीचा क्षय रोखण्याची समज देते. ऋतूचक्रातील संहार आणि सर्जन या दोन्ही बाजू दाखवणारा हा काळ देशाच्या विविध भागांमध्ये विविध नावांनिशी आणि विविध उपचारांनी साजरा होतो. वसंतोत्सवाचे हे दिवस रस, रंग आणि गंधांनी भारलेले असतात. हे दान अक्षय ठेवणे आपल्या हाती आहे.
मराठी पंचांगाप्रमाणे वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरा होणारा अक्षय तृतीयेचा दिवस महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. बंगालमध्ये अक्षय तृतीयेला ‘वसुबारस’ मानून गाय-गोऱ्याचे कौतुक केले जाते. आपल्याकडे ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला ‘आखिती’ म्हणतात. आखिती हा देशी भाषेतला उच्चार आहे. वर्षातील साडेतीन मुहूर्त सर्वात शुभ मानले जातात. अक्षय तृतीया हा त्यापैकी एक आहे. काही ठिकाणी तो अर्धा मुहूर्त मानला जातो, तर काही ठिकाणी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो.
काहीजण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाल्याचे मानतात तर काहीजण हा सत्ययुगाचा प्रारंभ मानतात. ओडिसामध्ये या दिवशी ‘चंदनयात्रा’ सजते. या दिवशी चंदनाच्या लेपाने अभ्यंगस्नान केले जाते. काही ठिकाणी या दिवशी मदनमोहनाची मूर्ती पालखीतून मिरवून तिची पूजा केली जाते. आपल्याकडे या दिवशी परशुरामाचा जन्म झाला असे मानतात आणि त्या निमित्ताने चिपळूणला मोठी यात्रा भरते. वेगवेगळ्या ठिकाणी या दिवसाचे वेगवेगळे पारंपरिक महत्त्व समोर येते. हा वैष्णव संप्रदायाकडे कलणारा दिवस मानला जातो.
मे महिन्याच्या सुरूवातीच्या काळात येणारा हा दिवस असल्याने या काळात रखरखीत ऊन असते. बोलीभाषेत या तापणाऱ्या दिवसांना ‘वैशाख वणवा’ असेही म्हणतात. रानात वणवा लागावा तसा सूर्य तापत असतो. सध्या आपण याचाही अनुभव घेत आहोत. रखरखीत उन्हाळ्याच्या या दिवसात संपूर्ण सृष्टी रसरसलेली, तापलेली असते. पण याच वेळी वसंत ऋतूची पालवीही फुटत असते. सृष्टीचे हे मोठे मजेशीर कौतुक आहे. एकीकडे भाजून काढणारे ऊन असते तर दुसरीकडे झाडांची पाने शिशिरात आधीच गळून गेलेली असतात. पण नंतर ऐन चैत्रात उन्हाचा तडाखा वाढतो तेव्हा मात्र कोवळी पालवी फुटायला लागते. काही झाडांना मोहर लगडतो. आंबा, शेवगा बहरतो. म्हणजेच एकीकडे काही गोष्टी नाहिशा होत असतात तर दुसरीकडे नवी सृष्टी निर्माण होण्याच्या कोवळ्या खुणाही याच काळात दिसत असतात. म्हणूनच हा ‘वसंतोत्सव’ मानला जातो. हा काळ संपूर्ण उत्तरेत आणि बंगालमध्ये वसंतोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. तिथे या ऋतूमध्ये राधाकृष्ण क्रीडा खूप मोठ्या प्रमाणावर रंगतात आणि खेळल्या जातात.
दुसरीकडे या काळात रानात ‘धुळपेरणी’ (उन्हाळ्यातील पेरणी) केली जाते. विशेषत: अक्षय तृतीयेला वेलभाज्यांची टोकणी केली जाते. म्हणजेच लहान लहान पिशव्यांमध्ये बीजे भरुन टोकणी करतात आणि त्यात थोडे पाणी घालतात. पुढे ही रोपे फुटत असतानाच पावसाळा सुरू होतो. वळीवाचा एखाद-दुसरा पाऊस पडून गेला की ही बीजे मुळे धरु लागतात आणि त्याला अंकुरही फुटू लागतात. म्हणजे झाडांना पालवी फुटत असते, मोहर येत असतो तर बीजांना अंकुरही फुटत असतात. एकीकडे ही निर्मिती होत असते तर दुसरीकडे उष्णतेमुळे जमीन भाजून संहारही होत असतो. म्हणजेच संहार आणि सर्जन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला सृष्टीचक्रातील या काळात बघायला मिळतात. या सगळ्या वसंत आगमनाच्या खुणा असतात.
याच चैत्र-वैशाखाच्या काळात उत्तरेत आणि बंगालमध्ये ‘दोलोत्सव’ पार पडतात. त्यामध्ये अन्नपूर्णा देवीला पाळण्यात घालून झोके दिले जातात. ‘दोलोत्सव’ साजरा करत तिला झुलवले जाते. आपल्याकडे जुन्या परंपरेनुसार अन्नपूर्णा देवीची डोलाऱ्यामध्ये स्थापना करुन पूजा केली जाते. त्या निमित्ताने हळदीकुंकवाचा समारंभ केला जातो. त्यावेळी उन्हाळ्यात आवश्यक असणारा आणि सृष्टीने आपल्याला आपसूक दिलेला आहार सेवन केला जातो. या काळात एकीकडे भूमीतील पाणी नाहिसे होते खरे पण फळे मात्र रसदार येत असतात. मग हळदी-कुंकवाच्या निमित्ताने बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींना काकडी, कलिंगड, टरबूज आदी रसदार फळांचे वाटप केले जाते. थंडगार पन्हे दिले जाते. पारंपरिक धर्म वा कर्मकांड मानणारी मंडळी या काळात ब्राह्मणाला दक्षिणा, घडा तसेच शीतपेय देतात. अशा वेगवेगळ्या मार्गांनी हा रंगोत्सव साजरा होतो. तो ‘रसरंग’ या सुंदर नावानेही ओळखला जातो.
आणखी एक गंमत म्हणजे या काळात येणारी सगळी फुले अतिशय सुगंधी असतात. म्हणजे उन्हाळा कडक तितका मोगरा, चाफा यासारख्या फुलांचा गंध मादक असतो. म्हणजेच एकीकडे निसर्ग पाणी आटवतो पण फळांमध्ये पाणी येते. झाडे सुकतात पण नवी पालवी येते. दुसरीकडे सृष्टीमध्ये नानाविध गंध दरवळतात. म्हणजेच जणू पृथ्वीतून सगळे गंध फुलांमध्ये उतरत असतात आणि त्यानंतरच पाऊस येतो. वळीवाचा पाऊस पडल्यानंतर या तापलेल्या मातीतून गंध दरवळतो. जणू या मृद्गंधाच्या आधारे सृष्टी ‘गंधोत्सव’ साजरा करत असते. पाने, फुले आणि मातीमधून हा गंधोत्सव साजरा होतो. म्हणूनच अशा मातीला, जमिनीला आपण ‘गंधवती’ म्हणतो. थोडक्यात हा निसर्गाशी जोडलेला एक उत्सव आहे. पण हाच नव्हे तर, आपल्याकडचे सगळेच उत्सव निसर्गाशी जोडलेले आहेत. निसर्ग बदलतो तसे माणसाचे जगणे बदलत असते. मग कधी आपण त्याला देवाधर्माचे, रुढी-परंपराचे अधिष्ठान देतो आणि एखादी देवता त्याची अधिष्ठात्री असल्याचे मानतो.
एकंदरच क्षय झाला असे वाटत असतानाच पुन्हा उसळून नवी निर्मिती होते असा हा अक्षय तृतीयेचा संहार आणि सर्जन यांच्या संधीकाळाचा हा काळ. सुप्रसिध्द लेखक पु. ल. देशपांडे यांचे आजोबा ऋग्वेदी यांच्या ‘आर्यांच्या सणांचा इतिहास’ या पुस्तकात सर्व सण हे मूलत: सामाजिक उत्सव आहेत परंतु त्यांना धार्मिक अधिष्ठान दिले गेले, असे म्हटले आहे. सख्यांनी, प्रियकर-प्रेयसीने एकमेकांच्या संगतीत राहणे आणि सगळ्या साधनांद्वारे मनातील प्रेमभाव वृद्धिंगत करणे याला ते एक प्रकारचा ‘प्रणयोत्सव’ म्हणतात. राधा-कृष्णाची गीतं, सर्जनाची गीतं रंगणे हा त्याचाच एक भाग आहे. या अर्थी हा सुफलनाचा काळ असतो. या काळात फलन होण्याची लक्षणे दिसतात. आपण त्याला सामाजिक विधि-विधानांचे अधिष्ठान देतो. म्हणजेच त्याला धर्माचे, सामाजिकतेचे, प्रणयाचे अधिष्ठान देतो. त्यामुळेच आपण ग्रामीण भागात गेलो तर या काळात प्रणयाची गाणीही रंगताना दिसतात. विशेषत: लावण्यांमधून हा प्रणयरंग मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसतो.
निसर्गातील संहार आणि सर्जन याच्या सीमारेषेवरचे असे उत्सव जगाच्या पाठीवरील जवळपास सगळ्या संस्कृतींमध्ये निरनिराळ्या नावांनी साजरे होतात. उदाहरणार्थ, ख्रिश्चन लोकांमध्ये साजरा होणारा ईस्टर नामक सणही एक प्रकारे वसंतोत्सवच असतो. थोडक्यात, हा भारतीय परंपरेतील ‘व्हॅलेंटाईन सिझन’ असतो, असे मला गंमतीने म्हणावेसे वाटते. सृष्टीतील तसेच मानवी जीवनातील नवसर्जन सात्विक पद्धतीने होण्यासाठी रसरंगांची बरसात करणारा हा काळ आहे. तो अक्षय टिकावा, त्यातील प्रेमभाव, सर्जनभाव अक्षय रहावा आणि आपणही जगावे व लोकांना जगू द्यावे हीच भावना यात दिसते. लोकजीवनात ग्रामीण तसेच शहरी भागात याच काळात पाणपोया सुरू होतात. जनावरांच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. सर्वसामान्य माणसेही पक्ष्यांसाठी दारात छोटे घडे भरुन ठेवतात. परळामध्ये पाणी ओतून ठेवतात. कारण जगा आणि जगू द्या, हे सूत्र आपण मानतो. पाणी आणि माती याशिवाय कोणाचेही जगणे अपूर्ण आहे. म्हणून माणूस, प्राणी, पक्षी आणि प्रणय या सगळ्यांची सांगड घालणारा हा काळ महत्त्वाचा आहे.
अर्थात सृष्टीचक्राने आपली अखंडता कायम राखायचे ठरवले असले तरी बऱ्याचदा माणूस स्वार्थासाठी विकासाच्या नावाने हे सृष्टीचक्र भकास करु पहातो. याचे अतिशय उग्र रुप सध्या आपण सगळेच अनुभवत आहोत. सृष्टीचक्रात नको ती ढवळाढवळ केल्यामुळे पर्जन्यमान, उष्णतामान, वनस्पती निर्मिती, पीक-पाणी या सगळ्यांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. मात्र आता या सगळ्याला सावरण्याचे काम मनुष्यच करणार आहे. मात्र माणसाने ते लवकर केले नाही तर सृष्टीच्या या अनमोल देणगीअभावी माणूस भिकारी होईल आणि पुढच्या पिढ्या संकटात येतील. म्हणूनच पुढील पिढ्यांचा विचार करुन तरी माणसाने सावध होऊन निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी कार्यरत होणे गरजेचे आहे. विशेषत: पाणी, वनस्पती आणि वातावरणाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते. कारण हे सगळे घटक अक्षय राहिले तरच अक्षय तृतीयेला अर्थ आहे. अन्यथा सगळेच निरर्थक होईल.
(लेखिका समाज-संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)