लढाई अस्तित्वाची

एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्काच बसला आहे
लढाई अस्तित्वाची

चार दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. विरोधकांनी अनेक वेळा पालिकेतील सत्ता बळकावण्यासाठी प्रयत्नही केला; मात्र निष्ठावंत शिवसैनिक व मुंबईकरांचा विश्वास यामुळे मुंबई महापालिकेतून शिवसेनेला बाहेर फेकणे कुठल्याही राजकीय पक्षाला जमले नाही; मात्र एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्काच बसला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेसह अन्य ठिकाणच्या महापालिकेत सत्ता काबीज करण्याचा भाजपचा आत्मविश्वास वाढला हे नक्कीच. राजकारणात काहीही शक्य, असे बोलले जात असल्याने मुंबई महापालिकेतील सत्ता टिकणे ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे.

शिवसेनेचे निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात ओळख. ठाणे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असली तरी ती काबीज करण्यात एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहेच. मुंबई महापालिकेत शिंदे यांचा दबदबा नसला तरी बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे यांची महापालिकेतील अनेक नगरसेवकांवर चांगलीच पकड आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील २० ते २५ नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेतच. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्याच तर ९४ हा विजयी आकडा गाठणे शिवसेनेसाठी मोठे आव्हानच असणार आहे, यात दुमत नाही.

शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगत असताना शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आणि एक प्रकारे भाजपला बळ देण्याचे काम केले आहे. त्यात भाजप विरोधात जाणाऱ्यांवर ईडीची कारवाई, अशी भीती नेते मंडळींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे यांच्या समर्थनात आमदार, खासदार गेले असताना नगरसेवकही समर्थनात पुढे येणे ही शिवसेनेला सत्ताबदलाचा हा इशाराच आहे. त्यामुळे बंडखोरांना त्यांची जागा दाखवत नव्याने उभारी घेत शिवसेना ही शिवसेनाच आहे, हे मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा एकदा काबीज करून दाखवणे गरजेचे आहे.

बेधडक नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत ओळख असली तरी मुंबई महापालिकेत शिंदे यांचा तसा दबदबा नाही; मात्र शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याची भाजपची आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यात येनकेनप्रकारेण सत्ता काबीज करता येईल; परंतु मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे हा भाजपचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट दिसून येते. २०१९मध्ये सत्तेच्या वादावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला तो आजही सुरूच आहे; मात्र शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिकेत तब्बल चार दशकांनंतर सत्तेचा उपभोग घेता येईल, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे, यात दुमत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता टिकणे, ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असून भाजपला सत्ता काबीज करणे ही शिवसेनेला पायउतार करण्याची संधी आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहण्याचा राजकीय पक्षांचा दृष्टिकोन. त्यामुळे मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता घेता आली नाही, तरी शिवसेनेबरोबर २०१९पर्यंत भाजपने सत्तेचा उपभोग घेतला; मात्र शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तेबरोबर मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवणे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवत भाजपनेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एक हाती सत्ता काबीज करणे भाजपची लढाई, तर अस्तित्वात असलेली सत्ता टिकवणे, ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई झाली आहे.

मतभेद झाले की, राजकीय समीकरण बदलण्यास वेळ लागत नाही, हे राज्यात दिसून आले. वाद कसला तर खुर्चीचाच. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत लक्षात घेता सर्वपक्षीय नेते मंडळींनी मुंबई महापालिकेकडे लक्ष वळवले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९८ नगरसेवक असून, २० ते २५ नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत. तर भाजप नगरसेवकांची संख्या ८०च्या घरात आहे. शिवसेनेच्या ९८ पैकी २५ नगरसेवकांनी शिंदे यांच्या माध्यमातून भाजपचे कमळ हाती घेतले, तर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार. तर २५ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपची कॉलर टाईट होणार. त्यामुळे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांसाठी शिंदे यांचे बंड किती फायदेशीर ठरत हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच; मात्र मुंबई महापालिका काबीज करण्याबरोबर शिवसेना व भाजपसाठी ही लढाई निर्णायक ठरणार हेही तितकेच खरे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in