
ग्राहक मंच
मधुसूदन जोशी
आजच्या आधुनिक जीवनशैलीत ग्राहकांच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. विजेचा अमर्याद वापर, अन्नाची नासाडी, प्लास्टिकच्या वस्तूंचा प्रचंड वापर आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांमुळे पर्यावरणीय संकट वाढत आहे. १५ मार्च २०२५ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ‘कंझ्युमर्स इंटरनॅशनल’ ही संघटना ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मागणी करत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन सवयी बदलून शाश्वत जीवनशैली अंगिकारू शकते. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
स्नेहलने स्वयंपाकघरातील काम आटोपले आणि ती बाहेर आली. पाहते तो दिवाणखान्यात पंखा आणि दिवे सुरू होते, टीव्ही सुद्धा सुरू होता, पण दिवाणखान्यात कुणीच नव्हते. स्नेहल चरफडली, विजेचा अमर्याद वापर तिला अस्वस्थ करून गेला. दिवाणखान्यातील कॉर्नर टेबलवर काल रात्री मुलांनी मागवलेल्या हॉटेलच्या अन्नाचे प्लास्टिक कंटेनर्स त्यातील शिल्लक अन्नासह तसेच पडून होते. अन्न वाया जात होते, रिकाम्या प्लास्टिकच्या कंटेनर्सनी उद्या कचऱ्यात भर पडणार होती. मुलांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे त्यांना शिकविण्याच्या पलीकडे मुले गेलेली होती. रोजच्या बाहेरच्या खाण्याने मुलांच्या जीवनशैलीत फरक पडत होता. विजेच्या अमर्याद अनाठायी वापराने, ऊर्जेचे अनाठायी नुकसान होत होते. मुले त्यांच्या खोलीत एसी आणि पंखा दोन्ही लावून गाढ झोपली होती, आपण दिवाणखान्यात दिवे, टीव्ही वगैरे चालू ठेवून झोपलो आहोत, हे मुलांच्या गावीही नव्हते.
जगातील कित्येक देशांसाठी, मागील दशक हे उष्णतेच्या दृष्टीने उच्चांकी, तीव्र वातावरणीय बदलाचे आणि त्यायोगे जीवन आणि उपजीविकांवर परिणाम करणारे ठरले आहे. त्याचवेळी जैव-विविधतेचे नुकसान आणि प्रदूषण हे आपल्या सृष्टीला आणि आरोग्याला वाढता धोका दर्शविणारे ठरत आहे. यावरून एक निष्कर्ष असाही निघतो की, पर्यावरणीय धोके याला केवळ कारणीभूत नसून आपली सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुद्धा याला तितकीच जबाबदार आहे, जी आपल्या शाश्वत प्रगतीच्या जीवनमूल्यांवर परिणाम करत आहे- मारक ठरत आहे. आपल्या सृष्टीच्या मर्यादेत आपण नक्की कसे आपले जीवन कंठतो यात आपल्याला मूलभूत बदल करायला हवेत जसे आपले खानपान, आपल्या प्रवासाची साधने, आपल्या घरी आपण वापरत असलेली उष्णेतेची-ऊर्जेची- वातानुकूलनाची साधने इत्यादी. १५ मार्च २०२५ च्या जागतिक ग्राहक हक्क दिनी ‘कंझ्युमर्स इंटरनॅशनल’ आपले सहयोगी सभासद आणि भागीदारांसह शाश्वत जीवनशैलीकडे परिवर्तित होण्याकरिता ग्राहकांच्या हक्क आणि संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी ठोस उपायांची मागणी करत आहे.
‘दि लॅन्सेट’ने जून २०२२ च्या अहवालात असे नमूद केले की, २०१५ साली ९ दशलक्ष अकाली मृत्यूला प्रदूषण हे कारणीभूत होते. याला आपले अवाजवी औद्योगिकरण आणि घातक रसायनांचे प्रदूषण मुख्यतः जबाबदार आहे. मानवी उत्पत्तीचा कचरा हवेत, जमिनीवर, पाण्यात, समुद्रात सोडणे, त्याच्या परिणामांची पर्वा न करणे हे आपल्या जीवसृष्टीला घातक आहे. मागील दोन दशकांत मानवी मृत्यूचे प्रमाण वाढण्याला कारणीभूत असणारे प्रदूषण हे मुख्य कारण असून यात वातावरणीय वायू प्रदूषण आणि रासायनिक प्रदूषण हे दोन मुख्य घटक आहेत. प्रदूषणाच्या कारणाने होणारे ९० टक्के मृत्यू हे कमी उत्पन्न किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत होतात. वायू प्रदूषण, शिसामुळे होणारे विषारी प्रदूषण आणि रासायनिक प्रदूषण हे टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याकरिता खालील मुख्य कारणांवर सक्रियतेने काम करण्याची गरज आहे.
अ. वायू प्रदूषण आणि त्याने आरोग्यावर होणारे परिणाम यावर लक्ष ठेवणे.
ब. शिशाच्या अमर्याद वापराने मुले आणि गर्भवती स्त्रिया यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे ज्यावर नियंत्रण आणणे.
क. पाणी आणि स्वच्छता विशेषतः मुली आणि स्त्रिया यांच्यात याबाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी.
ड. रासायनिक प्रदूषणावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे.
याबाबतीत जागतिक स्तरावर काम व्हायला हवे अशी व्यापक भावना व्यक्त होते आहे. ग्लोबस्कॅनने केलेल्या ३१ देशांतील सुमारे ३० हजार ग्राहकांच्या सर्वेक्षणातून असे व्यक्त झाले की साधारणपणे ९४ टक्के जणांना आपण शाश्वत जीवनशैलीकडे पाऊल टाकले पाहिजे. ८० टक्के जणांच्या मते सरकारे, उद्योग-व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी शाश्वत जीवनशैली सर्वसामान्यांना परवडेल, सहज उपलब्ध होईल अशा तऱ्हेने प्रयत्न करायला हवेत. गेल्या पाच वर्षांत राहणीमानाच्या खर्चात ज्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे सुद्धा कठीण होत आहे. या शाश्वत जीवनशैलीच्या उपलब्धतेसाठी खालील चतु:सूत्रीचा अवलंब व्हायला हवा असे वाटते :
१. ग्राहकाच्या कायदेशीर- नियमित गरजांची कायमता- अन्न आणि ऊर्जेची उपलब्धता तसेच आरोग्य आणि सुरक्षेचे संरक्षण.
२. शाश्वत आणि निरोगी पर्यायांची उपलब्धता- वैयक्तिक ग्राहकावर याची जबाबदारी न टाकता हे मिळायला हवे.
३. शासकीय आणि औद्योगिक-व्यावसायिक पातळीवर सर्वसामान्य कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांचे म्हणणे सुद्धा ऐकले गेले पाहिजे.
४. शाश्वत जीवनशैलीचे मार्ग कालानुरूप, भौगोलिकतेनुरूप बदलत जातील ज्यात एका स्थळाचे निकष दुसऱ्या स्थळास समान असतीलच असे नाही. स्थानिक प्राधान्ये आणि गरजा भिन्न असू शकतात.
शाश्वत जीवनशैली अंगिकारण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत नेहमीच आपल्या ग्राहक सभासदांना उद्युक्त करत असते. उपभोगावर संयम हे मुंबई ग्राहक पंचायतीचे सूत्र आपल्याला विविध प्रलोभनांपासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता ही ग्राहकाची जबाबदारी आहे की जागतिक तापमान वाढ, प्रदूषण वाढ यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार, उद्योग-व्यवसाय यांच्यावर दबाव वाढविला पाहिजे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्नेहलप्रमाणेच प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या सवयी शाश्वत जीवनशैलीला अनुकूल करायला हव्यात. आपला खारीचा वाटा उचलायला हवा. जेणेकरून आपल्या पुढील पिढ्या सुकर जीवनप्रवास करू शकतील.
जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या शुभेच्छा.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com