भौतिक सुखाचा परीघ ताणतणावाचा

कुटुंबीयांना त्रास देणे, पत्नीचा छळ करणे, स्वत:ला - इतराना किंमत न देणे, अपराधी भाव जपणे, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ या गोष्टी होताना दिसतात.
भौतिक सुखाचा परीघ ताणतणावाचा

चार वर्षे झाली मंगळसूत्र बदलूया, थोडं मोठं करूया म्हणून नवऱ्याच्या मागे भुणभुण लावणारी ज्योती खूप रडत होती. तिच्या मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. हिच्या सर्व नातेवाईकांमध्ये हिची आर्थिक बाजू थोडी कमकुवत होती; परंतु जो पैसा घरी येत होता तो अत्यंत प्रामाणिकपणे येत होता. कष्टाचा होता; परंतु ज्योतीच्या सततच्या कटकटीमुळे तिचा नवरा जो एका कंपनीत मॅनेजर होता. त्या कंपनीत त्याने पैशांची अफरातफर केली. नंतर घाबरून फरार झाला. त्याने खोटं-नाटं सांगून मित्राकडून ते पैसे ज्योतीपर्यंत पोहोचवले. सोबत चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं. तुझ्या मंगळसूत्राला पोहोचतील एवढे पैसे मी तुला पाठवत आहे. यापेक्षा जास्त पैसे मी कंपनीतून काढू शकत नाही. इतरांबरोबरच्या तुलनेमुळे ज्योतीला नवरा गमवावा लागला. त्याला घरापासून पळ काढावा लागला.

आर्थिक ताणामुळे घर सोडणे, व्यसनाधीन होणे, आत्महत्या करणे, निराशेत राहणे, राग, चिडचिड करणे, कुटुंबीयांना त्रास देणे, पत्नीचा छळ करणे, स्वत:ला - इतराना किंमत न देणे, अपराधी भाव जपणे, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ या गोष्टी होताना दिसतात. बऱ्याचवेळा मोठ्या गुन्ह्यांकडे लक्ष वेधलं जातं; परंतु दैनंदिन जीवनात येणारे ताण, त्याची कारणं, परिणाम याकडे बघितलं जात नाही. खरंतर भोवताली वाढलेला चंगळवाद हे ताणतणावाचं एक मोठं कारण आहे. याबाबत प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे. वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी बहुसंख्य लोकं कर्ज काढतात; मात्र चांगल्या मार्गाने कर्जाची परतफेड करणं, जेव्हा अशक्य होतं, तेव्हा काही इतर चुकीचे मार्ग वापरतात. तेव्हा असमाधान वाट्याला येतं. स्वास्थ्य बिघडतं. नात्यात तणाव येतो. बिकट आर्थिक परिस्थिती लपवण्याचा एक वेगळाच ताण असतो. या ताणातून सुटका करून घेण्यासाठी अनेकविध उद्योग केले जातात. सतत नोकऱ्या बदलल्या जातात. शिवाय एक खड्डा बुजवायला, दुसरा खड्डा खोदला जातो. एक दिवस खड्डा खोदणाराच खड्यात पडतो, असं काहीसं होतं. खड्डे वाढत जातात. एवढ्या सगळ्या उद्योगात आपल्या क्षमता, आपल्या गरजा, आपल्या चुका यांवर पुनर्विचार करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

अलीकडे माणसांच्या भौतिक सुखाचा परीघ मोठा झालाय. या परिघात माणसांच्या ब्रँडेड महागड्या वस्तूंचं प्रदर्शन असतं. या वस्तू वापरण्याचा आनंद घेण्यापेक्षा इतरांना या वस्तू दिसाव्यात यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. या प्रदर्शनाच्या हव्यासासाठी मिळकतीपेक्षा जास्त प्रमाणात खर्च केला जातो. खर्च करण्याची ही सवय शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. आर्थिक ताणाची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. त्याचा शोध घ्यायला हवा. मिळकत मोजकी आणि तुटपुंजी असेल तर व्यवहार जपून करावेत. गुंतवणूक करताना कोणत्याही लोभाला बळी पडू नये. थोडेच पैसे गुंतवा आणि फायदा जास्त मिळवा, अशा भुलथापांना बळी पडू नये. डोळ्यात तेल घालून कष्टानं मिळवलेले पैसे, दागिने सांभाळायला हवेत. नाहीतर पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने गेल्याची कित्येक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर होणारा पश्चाताप झोप उडवतो. स्वत:ला दोष देण्याची वृत्ती वाढते.

त्याचबरोबर श्रीमंतीच्या प्रदर्शनाचं स्तोम इतकं वाढलंय की, ते लोकांना दाखवता नाही आलं तर अस्वस्थता येते. कोविडमध्ये सरकारी निर्देश वापरून अनेक विवाह थाटामाटात संपन्न झाले; परंतु लग्नात मिरवायला, लाखो खर्च करून उभं करण्यात आलेले स्टेज डेकोरेशन, जेवणाची लज्जत चाखायला मोठ्या संख्येने माणसंच उपस्थित नव्हती. लग्न खूप सुंदर झालं; पण काय उपयोग बघायला कोणच नव्हतं. ही उदासीनतेची किनार अजूनही अनेक लोकांमध्ये दिसून येते. पैसा खर्च करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असते. अतिश्रीमंत लोक त्यांच्या कुवतीप्रमाणे खर्च करतील; परंतु त्यांच्याशी तुलना करून इतरांनी आपलं स्वास्थ्य बिघडून घेण्यात काही अर्थ नसतो.

कोणत्याही शॉपमधे जाताना आपलं बजेट समजा एक हजार रुपये असेल तर खरेदी दोन हजारहून जास्त रुपयांची होते. शॉपिंग मॅनिया नावाचा आजार काहींना झालेला असतो. कोणतंही व्यसन एकदा लागलं तर ते लवकर सुटत नाही. मध्यमवर्गीय सर्वसामान्य आर्थिक स्तरामधे आर्थिक स्थिती मोजण्याचे मापदंड दिवसेंदिवस बदलत आहेत. पूर्वी साधे घर, एखादी नोकरी समाधानाने राहायला पुरायचं. आता उत्पन्न वाढलं असलं तरी आपण पुरेसे श्रीमंत झालो आहोत. आता थांबायला हरकत नाही. असं कुणालाही वाटत नाही.

मुलांचं शिक्षण, घरातील ज्येष्ठांची आजारपण यासाठी मोठी तरतूद करून ठेवावी लागते. इंग्रजी माध्यमांच्या खासगी आणि महागड्या शाळेत शिकल्याने मुलं खूपच मोठी होतील म्हणजे भरपूर पैसे मिळवतील ही भावना कित्येक वर्षात वाढत गेली. त्यामुळे प्रत्येक पालकाना आपल्या मुलांना श्रीमंत शाळेत घालण्याची घाई असते. त्यासाठी आर्थिक ओढाताण होते. ते प्रचंड कष्ट करतात. पूर्वी आपल्या गरजा मर्यादितच होत्या; परंतु बाजारपेठेला आपल्यासमोर अनेक क्षेत्रं आकर्षकरीत्या मांडण्यात मोठं यश मिळालंय. त्यामुळे शिक्षण, घर, परदेशवारी, मोठ्या गाड्या, बंगले अशा अनेक गोष्टी मिळवणं सोपं झालंय. याचा परिणाम असा की, सगळं आपलंच असूनही त्यावर मालकी मात्र बराच काळ कायदेशीरपणे बँकेची, सावकाराची राहते. बाजारपेठ कधीही आपल्याला अशक्य असं कोणतंच स्वप्न दाखवत नाही. बाजारपेठेच्या आणि सर्वांच्या वाढलेल्या गरजांचा चक्रव्यूह भेदण्याचं कौशल्य अनेकांकडे नाही. आजूबाजूला इतकी प्रलोभनं आहेत की, आपण त्याला बळी पडण्याची शक्यताच जास्त आहे. अशा वेळी परिस्थितीला समजूतदारपणे सामोरे जाण्यातच शहाणपण असते. त्यामुळे समस्या जरी बदलल्या नाहीत तरी किमान आर्थिक आव्हानं पेलण्याची क्षमता निर्माण होईल. बाजारपेठेकडे सगळे पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे लोक अजून हवंयच्या चक्रव्यूहात गुंतत जातो. अजून प्रगती, अजून पैसा, अजून आनंद, अजून मजा, अजून हवंय, अजून हवंयचा हट्ट कुठे घेऊन जाणार आहे, याची जाणीव असायला हवी. जाणीवपूर्वक जगण्याचं प्रयोजन विचारात घ्यायला हवं. त्यानुसार गरजा, इच्छा, अपेक्षा, मागणी, हट्ट याचा नेमकेपणाने विचार करायला हवा. आपण जीवनाकडे जी मागणी करतोय, त्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे महत्त्व देतोय की बाजारपेठेप्रमाणे, हे स्वत:ला एकदा विचारून पाहावं.

आर्थिक ताण येऊन हताश होणं, हतबल होणं, अशाने परिस्थिती आणखी बिघडू शकते. तेव्हा निराशेला झटकून मी विचारपूर्वक स्वत:मध्ये बदल करू शकतो. माझी परिस्थिती मीच सुधारू शकतो. या आत्मविश्वासाने नव्या उत्साहाने कार्यरत झाले पाहिजे. आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी इतरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करू नये. जोडीदार, शेजारी, मित्रमैत्रिणी, बॉस, समाज, राजकारण सर्वांना दोष देणे थांबवले पाहिजे. कष्टाची, जिद्दीची तयारी ठेवायला पाहिजे. सकारात्मक विचारांचा सातत्याने पाठपुरावा करायला पाहिजे.

आर्थिक ताणाचं ओझं मनावरून उतरवावंच लागेल. नाहीतर वयाच्या नको त्या टप्प्यांवर शारीरिक - मानसिक आजार उद्भवू लागतात. आपलं जीवन अमूल्य आहे; मात्र ते स्वस्थ असावं यासाठी आपल्या जोडीदाराशी सुसंवाद असायला हवा. खर्चाचे अंदाजपत्रकही वर्षाच्या सुरुवातीला आणि महिन्यातून एकदा कुटुंबीयांनी एकत्र येऊन कागदावर मांडायला हवं. त्यानुसार नियोजन करायला हवं. आपल्यासह आपल्या जवळच्या लोकांच्या भौतिक सुखाचा परीघ आटोक्यात आणायला हवा. आर्थिक ताणतणावातून बाहेर पडण्याचा संकल्प करून त्यातून सावरणे निश्चितच कठीण आहे. असे असले तरी परिस्थितीची जबाबदारी ठरवून घ्यायली हवी. त्यामुळे तणाव किंचित हलका होऊ शकतो. जी परिस्थिती येईल तिला ठरवून सामोरे जाण्यातच यशस्वी आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in