विपरीत काले विनाश बुद्धी !

लोकसभा निवडणुकीचे बिगुल तर वाजले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४०० चा टप्पा पार करण्याच्या इर्ष्येने भाजपप्रणीत ‘एनडीए’ मैदानात उतरली आहे. तथापि, या रणांगणात प्रतिस्पर्धीच दिसत नाही. काँग्रेसप्रणीत विरोधी ‘घमंडिया’ आघाडीची अवस्था फारच बिकट आहे.
विपरीत काले विनाश बुद्धी !

- केशव उपाध्ये

मत आमचेही

एखाद्याचा विनाश काल जवळ आला की, त्याची बुद्धी फिरते आणि ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशा पद्धतीचे निर्णय तो घेतो, असा समज आहे. यालाच म्हणतात ‘विनाश काले विपरीत बुद्धी’! पण आत्ताच्या राजकारणात डोकावून पाहिले तर यामध्ये थोडासा बदल करण्याची वेळ आली आहे, हे झटकन लक्षात येते. ‘विपरीत काले विनाश बुद्धी’ असे आता म्हणावे लागेल!

लोकसभा निवडणुकीचे बिगुल तर वाजले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४०० चा टप्पा पार करण्याच्या इर्ष्येने भाजपप्रणीत ‘एनडीए’ मैदानात उतरली आहे. तथापि, या रणांगणात प्रतिस्पर्धीच दिसत नाही. काँग्रेसप्रणीत विरोधी ‘घमंडिया’ आघाडीची अवस्था फारच बिकट आहे. प्रत्येकाचा सवतासुभा, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, उमेदवार ठरत नाहीत, त्यासाठी बैठका नाहीत, अशी विदारक परिस्थिती विरोधी आघाडीवर कोसळली आहे.

देशामधील अवस्था बरी म्हणावी, अशी अवस्था महाराष्ट्रातील ‘महाविकास’आघाडीची झाली आहे. बोलण्यासारखे हातात काहीही नाही, राज्यातील ‘महायुती’ सरकारचा कारभार अपेक्षेपेक्षा चांगला चालला आहे आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सुसाट सुटलेला अश्वमेध रोखणे अशक्य आहे. एकीकडे मोदींचे विकसित भारताचे स्वप्न आणि त्या दिशेने टाकली जाणारी पावले, तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांची खैरात, शिव्याशाप, टोमणे आणि मोदी यांच्या सरकारविषयी अहोरात्र ओकली जाणारी गरळ! हातात कोणताच अजेंडा नसल्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन ठेवून केंद्रीय मंत्र्यांबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत उठल्यापासून शिवराळ भाषेपासून ते बोटे मोडण्यापर्यंत दुसरा उद्योगच राहिलेला नाही! म्हणूनच म्हणावे लागेल, सध्या ‘विपरीत काल’ आहे आणि यांना ‘विनाश बुद्धी’ आठवली आहे!

शरद पवार, तुम्ही सुद्धा?

केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळे विकासकामांची गाडी नुसती रुळावरून चाललेली नाही तर अतिशय वेगाने सुसाट सुटली आहे. विकासाचे एक एक स्टेशन मागे टाकत तुफान वेगाने तिची धाव आहे. यावर टीका करण्यासारखे कोणते हत्यार मिळत नसल्यामुळे मग, टोमणे, अपशब्द, शारीरिक व्यंग, इतिहासाचे दाखले, वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या उपमा देऊन निर्भत्सना करण्याकडेच या घमंडिया आघाडीचा कल आहे. अशा प्रकारच्या तोल आणि तोंड सुटलेल्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांचे चेले, त्याचप्रमाणे नाना पटोले, विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत. ही मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे ‘नरेटिव्ह’ पसरवण्यात स्वतःला धन्य मानत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तर्फे सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांनी अशा भूलथापा पसरवण्यात आघाडी घेतली होती. या गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आतापर्यंत परिपक्व आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देत होते. पण आता मात्र त्यांचाही तोल ढासळला आहे. मोदी यांच्याबाबत खोट्या वावड्या उठवण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. कुणी किती जागा जिंकण्याचा दावा करावा, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. याच पद्धतीने मोदी यांनी ‘४०० पार’चा दावा केला आहे. पण त्याची टिंगल करण्याचे काम सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आता तर म्हणे, देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना ४०० पेक्षा जास्त जागा पाहिजे आहेत. त्यांना त्या मिळतील का नाही ते काळ ठरवेल. पण शरद पवार यांच्या पक्षाला पूर्वी चार जागा मिळाल्या होत्या. आता एखादी मिळाली तरी खूप झाले, अशी अवस्था आहे. आपला पक्ष देशोधडीला लागला आहे, तरी त्याची चिंता करण्याऐवजी शरद पवारांचे सगळे चमचे फक्त अफवा आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात सध्या मश्गूल आहेत, हे लक्षात घ्यायला हवे!

रडतरौताना कोण बोलणार?

उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वशून्य आणि भ्रष्ट कारभाराला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे सुमारे ५० आमदार फुटले आणि भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून त्यांनी सत्ता स्थापन केली. ही बाब संबंधितांच्या एवढी जिव्हारी लागली की त्या दिवसापासून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या चमच्यांची बोलण्याची पातळी पूर्णपणे घसरली आहे. सुरुवातीला ‘गद्दार’ आणि ‘खोके’ घेतल्याची टीका शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केली जात होती. नंतर साप, नाग, बेडूक, डोमकावळे, डुक्कर, रेडे, गाढव यांच्या उपमा देण्यापर्यंत ती गेली. हरामखोर, नालायक या शिव्या अगदी किरकोळ वाटाव्यात, अशा आया-बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात झाली. भाजपचे नेते देवेंद्र यांचा उल्लेख अगदी हीन पातळीवरील शब्दांनी केला गेला. त्यांच्या आरोपांना फारशी कोणी भीक घालेना, त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना थेट औरंगजेब, कंस मामा यांच्याशी केली जाऊ लागली आहे. लुटारूंची टोळी, मौत के सौदागर यापासून ते त्यांच्या परिवारापर्यंत जाण्याची मजल विरोधकांनी गाठली आहे. महिला नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याबाबतही त्यांच्यात आता स्पर्धा सुरू झाली आहे. हातचे सर्वस्व गेल्यानंतर वेडेपणाचा झटका यावा किंवा एखाद्याचा ‘गजनी’ व्हावा, अशा विमनस्क अवस्थेतून घमंडिया आघाडीची ही मंडळी प्रवास करीत आहेत.

शिवतीर्थावरील सभा म्हणजे नकारघंटा!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्याय पदयात्रेच्या सांगता समारंभाला सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेते मुंबईतील शिवतीर्थावर जमले होते. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, बाळासाहेब आंबेडकर तसेच दोन राज्यांचे मुख्यमंत्रीही होते. आपल्या देशाचे आदर्शवत भवितव्य, देशाच्या भवितव्याबाबतचा अजेंडा किंवा दृष्टिकोन कोणीही सांगितला नाही. फक्त आणि फक्त केंद्रातील मोदींच्या सरकारच्या नावाने खडे फोडणे आणि लाखोली वाहणे यालाच सर्वजण प्राधान्य देत होते. आपली घमंडिया आघाडी सत्तेवर आली तर आपण काय करू, याचा साधा उल्लेखसुद्धा कोणी केला नाही, एवढी ही मंडळी मोदीद्वेषाने पछाडलेली आहेत, हे कोणाच्याही लक्षात यावे, इतके स्पष्ट आहे. केवळ ‘जीवाची मुंबई’ करून सगळे नेते आपापल्या राज्यात परतले आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने शिवीगाळ करणे, टोमणे मारणे सुरू झाले.

सातारा, कोल्हापूरच्या गादीबद्दल

सध्या साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीबद्दल भाजपविरोधी गोटात चर्चा सुरू आहे. तथापि, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, याच शाहू छत्रपतींचे चिरंजीव संभाजीराजे यांना गेल्या वेळी भाजपने राज्यसभेवर घेतले होते, तर उदयनराजे हे आता भाजपचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर आहेत. त्यांच्याकडे छत्रपती शिवरायांचे वारस असल्याबद्दलचा पुरावा मागितला गेला होता, हे जाणूनबुजून विसरले जात आहे का? कोल्हापुरात डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यामुळे शाहू महाराजांना उभे केले का, असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

सगळा भर तुष्टीकरणावर

‘एनडीए’विरोधी असलेल्या या आघाडीचा सगळा भर हा मुस्लीम तुष्टीकरणावर आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण देशात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबविल्यास विजय मिळू शकतो. मुस्लिमांची मते एकवटली, तर मोदींचा पराभव होऊ शकतो, असले काहीतरी आडाखे या मंडळींच्या सडक्या मेंदूमध्ये घट्ट बसले आहेत आणि त्याआधारेच त्यांची वाटचाल सुरू आहे. मोदी यांच्या विरोधात वातावरण भडकावण्यासारखी आता परिस्थिती नाही. उमेदवार कोणताही असला तरी ‘कमळ हाच उमेदवार’ असा ठाम निर्णय अगदी तळागाळातील, खेड्यातील शेतकऱ्यांनीही केलेला असल्यामुळे आता अशा देशद्रोह्यांची आणि नतद्रष्टांची डाळ मुळीच शिजणार नाही, याची कल्पना त्यांना आली आहे. त्यामुळे फक्त नकारात्मक प्रचाराच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी आखला आहे. थोडक्यात काय, एकीकडे ठरविल्याप्रमाणे प्रत्यक्षात उतरविलेल्या प्रचंड कामांचा डोंगर आहे, तर दुसरीकडे निराशा, हाणामाऱ्या आणि समाजात पसरवलेल्या नरेटिव्हची दरी आहे. दहा वर्षे देशाच्या विकासासाठी केलेली धडपड, मिळालेले यश आणि विकासकामांची जंत्री दाखवून एनडीए मतदारांना सामोरे जाणार आहे, तर मोदी यांच्यावर टीका आणि त्यांचे अपयश दाखवून ही घमंडिया आघाडी मते मागणार आहे!

पाहू या, निवडणुकांचा फड अगदी जवळ आला आहे. मोदी यांच्याकडे पुन्हा सत्ता देऊन सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि सर्वच क्षेत्रांमध्ये घेतली जात असलेली झेप यांचा सुखद अनुभव घ्यायचा, अशी खूणगाठ देशातील ९७ कोटी मतदारांनी आपल्या मनाशी बांधलेली आहे, हे मात्र निश्चित!

(भाजप मुख्य प्र‌‌‌‌वक्ता)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in