-अरविंद भानुशाली
प्रासंगिक
हाराष्ट्राच्या राजकारणात रोज राजकीय बॉम्ब फुटत आहेत. काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू असलेले मुरली देवरा यांच्या चिरंजीव मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना व काँग्रेसचे ऋणानुबंध १९८४ पर्यंत होते. त्याकाळी मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले ते केवळ शिवसेनाप्रमुखांमुळे.
बॅ. रजनी पटेल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात शिवसेनेवर बंदी घालावी, असे जोरदार प्रयत्न केले. त्यावेळी शिवसेनेच्या मदतीला धावले ते मुरली देवरा, बॅ. ए. आर. अंतुले, सुधाकरराव नाईक, बॅ. रामराव आदिक इत्यादी नेते होते. पुढे शिवसेना बंदीचे सावट कमी होत असतानाच मुंबई महापौरपदाची निवडणूक लागली होती आणि काँग्रेसने मुरली देवरा यांना उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी उतराई म्हणून मुरली देवरा यांना पाठिंबा दिला आणि मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले.
मुंबई व महाराष्ट्रात लाल बावट्याचाच जोर त्याकाळी वाढला होता. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला हाताशी धरून लाल बावटा नष्ट करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले. त्याकाळी मुंबईमध्ये लाल बावट्याचा जोर मोठ्या प्रमाणात होता. मुंबईतील गिरणी कामगार हा लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारशी संघर्ष करीत होता. कम्युनिस्ट नेते व संयुक्त महाराष्ट्र समितीचे आधारस्तंभ श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप १७२ दिवस चालला. त्याकाळी मुंबईतून विधानसभेवर पाटकर, संझगिरी, कृष्णा देसाई असे अनेक दिग्गज नेते विधानसभेवर गेले होते, तर डांगे हे लोकसभेवर १९५७ ते १९६२ पर्यंत लोकसभेचे खासदार होते. अशाच वेळी शिवसेनेचा जन्म झाला आणि लाल बावटा नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू झाले. त्याची भीषणता एवढी होती की, लाल बावट्याचे आमदार कृष्ण देसाई यांची हत्या करण्यात आली आणि मामा वाईरकरांपासून अनेक शिवसेना नेत्यांना त्याकाळी अटक झाली. त्याकाळी विशेष म्हणजे शिवसेनेच्या बाजूने बॅ. रामराव आदिक यांनी वकीलपत्र घेतले होते. ही सर्व पार्श्वभूमी पाहता शिवसेना ही आजच काँग्रेसच्या बरोबर गेली असे नाही, तर पूर्वीपासून १९७८ पर्यंत शिवसेना काँग्रेसधार्जिणी होती. एका निवडणुकीत तर जनसंघाचे वसंतकुमार पंडित यांच्या विरोधात बॅ. रामराव आदिक उभे होते. त्यांना शिवसेनेचा विशेषतः बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता. पुढे रामराव आदिक पराभूत झाले आणि बॅ. वसंतकुमार पंडित हे विजयी झाले. शिवसेनेने १९७५ नंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस बरोबर होती. एवढेच कशाला, तर १९७८ मध्ये भाजपचे खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस उमेदवार प्रभाकर हेगडे यांच्या प्रचारार्थ मोठी जाहीर सभा घेतली होती. परंतु त्यावेळीही भाजपचे जगन्नाथ पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. हा सर्व पूर्वइतिहास पाहता शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत गेले.
हे सर्व असताना २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपबरोबर लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी युती केली होती. या युतीमुळे भाजपचे २३, शिवसेनेचे १८ असे खासदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला बहुमतही मिळाले. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती करून १९७८ पर्यंत काँग्रेसबरोबर असलेले प्रेम दाखवून दिले. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. त्यानंतर आता शिवसेना हा पक्षच ठाकरे घराण्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. शिवसेना नाव व धनुष्य बाण ही निशाणी शिंदे यांना मिळाली आहे. निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंची आहे यावर शिक्कामोर्तब केले आणि याच पार्श्वभूमीवर मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश घेतला आहे आणि आता त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.