बोलाची कढी....

अभिव्यक्त होणाऱ्या समाजाच्या आशा-आकांक्षा आता राज्यकर्त्यांना पूर्ण कराव्या लागतील, अशी अपेक्षा होती.
बोलाची कढी....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सोमवारी देशाला संबोधित केले. त्यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात ‘पंचप्राण’ ओतण्याचा प्रयत्न केला. त्यांचे भाषण नेहमीप्रमाणेच आदर्शवादी विचारांना पूर्णपणे वाहिलेले होते. त्यांच्या भाषणात भारतीय संस्कृती-परंपरांच्या गौरवशाली वारशाचा उल्लेख होता, तसेच स्वातंत्र्यवीरांची थोरवी होती. भारताची विविधतेतील एकता कशी शक्ती बनली आहे, याचे दाखले होते. संस्काराचे सामर्थ्य असलेली लोकशाहीची जननी म्हणजे भारतभूमी असल्याचे सांगतानाच, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, शेतकरी, दिव्यांगांना आधार देण्याचे काम करण्यासाठी आपण स्वत:ला समर्पित केले असल्याचा दावा होता. अभिव्यक्त होणाऱ्या समाजाच्या आशा-आकांक्षा आता राज्यकर्त्यांना पूर्ण कराव्या लागतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या भाषणात शतप्रतिशत मानसिक गुलामी झुगारून देण्याची आस होती. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी एकता व एकजुटता दाखविण्याचा निर्धार होता. सध्याच्या मानवी जीवनमानातील ताणतणाव लक्षात घेता, भारतीय कौटुंबिक मूल्ये, प्राचीन आयुर्वेद, योगाचे महत्त्व किती आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांनी आपल्या भाषणात नदीला आई, झाडांमध्ये दैवत्व, नरामध्ये नारायण, जीवात शीव मानणाऱ्या प्राचीन भारतीय संस्कृतीचेही दाखले दिले. आम्ही जनकल्याणापासून जगकल्याणाच्या मार्गावर चाललो असल्याचा दावा त्यांनी केला. महिलांचा सन्मान, समाजातील उच्च-नीचतेचे भेदाभेद दूर करण्याची, भ्रष्टाचार, घराणेशाही संपविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, त्यांनी आगामी २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन साऱ्या देशवासीयांना केले. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रविकासासाठी ‘पंचप्राण’ ही आगळी संकल्पना मांडली. विकसित राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण करायची आहे, हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण मानसिक गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. तिसरा प्राण म्हणजे आपल्याला आपल्या गौरवशाली वारशाप्रति गर्व असायला हवा. चौथा प्राण म्हणजे देशातील १३० कोटी जनतेची एकता आणि एकजुटता होय. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्राण आहे. पाचवा प्राण म्हणजे नागरिकांचे कर्तव्य हे आहे. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश आहे. आगामी २५ वर्षांतील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची प्राणशक्ती असल्याचे सांगत मोदी यांनी ही पंचप्राणाची संकल्पना मांडली. स्वातंत्र्याचा संकल्प मोठा होता. हा संकल्प मोठा असला तरी तो पूर्ण केला गेला. त्याचप्रमाणे आगामी २५ वर्षांत आपल्याला भारताला विकसित करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी तरुणाईला पुढाकार घ्यावा लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या निर्णयात गतिशिलता, सर्वव्यापकता, सर्वसमावेशकता असेल, तर विकासात प्रत्येक जण सहभाग घेतो, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातून केला. भारत देश हा लोकशाहीची मातृभूमी आहे. आमच्याकडे अनमोल सामर्थ्य असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. २०१४ साली देशाने मला संधी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेला मी पहिला पंतप्रधान आहे. मी माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. देश स्वतंत्र झाल्यानंतर लोक आपसात लढतील, भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या; परंतु प्रत्यक्षात आपण अन्नाचे संकट झेलले. दहशतवाद, नैसर्गिक संकटांचा योग्यरीत्या मुकाबला केला. आज भारत देश पुढे चालला आहे. भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडले; पण देशात वास्तववादी चित्र नेमके कसे आहे, यावर त्यांनी भाष्य केले असते, तर ते अधिक समायोचित ठरले असते. आपल्या लोकशाहीवादी देशात लोकप्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. साम, दाम, दंड, भेद यासारख्या कुटनीतीने सरकारे पाडली जात आहेत. सत्ताधारी-विरोधक यांच्यातील सुप्त संघर्ष शिगेला पोहोचला आहे. देशातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. देशात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन होऊनही सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार काही कमी झालेला नाही. जात, धर्म, प्रांत, पंथावरून समाजात भांडणे लावण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असताना, त्यावरील सत्ताधाऱ्यांचे मौन अचंबित करणारे आहे. देशाचा विकासदर घटला आहे. महागाई, जीएसटी करप्रणालीने सामान्यांचे जगणे अधिकच अवघड केले आहे. गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढतच चालली आहे. हे लक्षात घेता, पंतप्रधानांचे भाषण म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ या संज्ञेत बसणारे आहे. लोकांना आता तत्त्वज्ञानी विचारांबरोबरच, कृतिशील जोडही तितकीच अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in