स्त्री हिंसेचा वाढता आलेख
विशेष
तिलोत्तमा झाडे
आजच्या समाजात स्त्रियांवरील वाढत्या हिंसेच्या घटना मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. बलात्कार, शोषण, अन्याय आणि हिंसाचाराच्या विरोधात स्त्रिया मोठ्या प्रमाणावर एकत्र येत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना स्त्रियांनी भूतकाळातील संघर्षांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पितृसत्ताक समाजव्यवस्थेमुळे प्रत्येक स्त्रीला दुय्यम वागणूक मिळते. जाती, धर्म, राजकीय स्वार्थ आणि अंधश्रद्धा यामुळे स्त्रियांचे शोषण अधिक गडद झाले आहे. त्यामुळे शिक्षण, आत्मभान आणि संघटन शक्ती वाढवून स्त्रियांना या अन्यायाविरोधात उभे राहावे लागेल. समाजात खरी समता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आज आपण जेव्हा आपल्या देशातील स्त्रियांवरील बलात्काराच्या, हिंसेच्या, शोषणाच्या घटना वाढत असताना पाहतो, तेव्हा मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता आणखी वाढते जेव्हा स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी, निषेध करण्यासाठी स्त्रिया मोठ्या प्रमाणावर एकत्र येत नाहीत. आज ज्या स्त्रिया ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करतात त्यामागे जगभरातील स्त्रियांनी माणूस म्हणून सन्मान व समानतेचा हक्क मिळवण्यासाठी मोठा लढा दिला हे विसरले जाते का? असा प्रश्न पडतो.
पुरुषप्रधान व्यवस्थेत अपमान, अन्याय, हिंसा, दुय्यम वागणूक प्रत्येक स्त्रीच्या वाटेला कधी ना कधी येतेच. यातून कोणत्याही स्त्रीची सुटका झालेली नाही. त्यामुळे अन्यायाविरोधात लढण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देण्याची आजही प्रचंड गरज आहे. आज आपण पाहतोय की, ८ मार्च महिला दिन ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. महिलांचे सत्कार केले जातात. गृहिणी असलेल्या महिलाही आपापल्या परीने ८ मार्च साजरा करतात किंवा किमान एकमेकींना शुभेच्छा तरी देतात. पण केवळ एक दिवस महिला दिन साजरा केला आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या की, परत वर्षभर वाटेल, तसे वागायला पुरुषांना मोकळीक मिळते का? असे आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यावर वाटते. दररोजच्या बातम्या पाहिल्यावर आपल्याला हादरवून टाकणाऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या अशा कितीतरी बलात्काराच्या, स्त्री हिंसेच्या बातम्या आपण वाचतो म्हणजे हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होणे अपेक्षित आहे, पण उलट वाढतच आहे. स्त्री हिंसा का वाढत आहे? त्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या समाजात परधर्मातील, परजातीतील पुरुषांना धडा शिकवण्याचे साधन म्हणून स्त्रियांकडे बघितले जाते. त्यामुळे आजच्या धर्मांध राजकारणात स्त्रियांवरील हिंसेचे प्रमाण वाढत आहे. समाजात असलेली जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांमुळे स्त्रियांच्या शोषणाचे प्रश्न पूर्वीपासूनच खूप गंभीर आहेत. एका बाजूला परधर्म द्वेषातून दुसऱ्या धर्मातील स्त्रियांचा बळी घेतला जातो, तर दुसऱ्या बाजूला स्वधर्मातील स्त्रियांना गुलाम करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मनुस्मृती जाळली, तरी पुन्हा पुन्हा ती लागू करण्याचे प्रयत्न होतात.
स्त्री म्हणून आवश्यक असलेल्या आत्मभानाच्या अभावात अनेक स्त्रिया अशा द्वेषपूर्ण आणि हिंसात्मक राजकारणाच्या वाहक बनतात. याची अनेक उदाहरणे आपण गेल्या दहा वर्षांत अनुभवली आहेत. देशात कुठेही बलात्काराची घटना घडली की, सर्वात पहिल्यांदा ती स्त्री कोणत्या जाती-धर्माची आहे याचा विचार अनेक जण पहिल्यांदा करतात.
एकीकडे स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत असताना त्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे. त्याची काही उदाहरणे म्हणजे, बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्या ११ आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आल्यावर त्यांचे हार घालून सत्कार करण्यात आले; हे घडले तेव्हा संपूर्ण देशातील स्त्रियांनी याचा निषेध करायला हवा होता. पण तसे घडले नाही, कारण अत्याचार झालेली स्त्री ही इथल्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढत होती. हेच मणिपूर, कथुआ, हाथरस, विनेश फोगाट व तिच्या सहकारी खेळाडूचा लढा यांसारख्या गंभीर प्रकरणांत अनुभवायला मिळाले. कारण अन्याय झालेली स्त्री कोणत्या जातीची आहे किंवा धर्माची आहे की, सत्ताधारी पक्षातील पुरुषाविरोधात लढत आहे याचा विचार करून आपण निषेध करायचा की नाही हे स्त्रिया ठरवायला लागल्या. म्हणजे विवेकाची जागा अविवेकाने घेतली. धर्मांध राजकारणाने स्त्रियांना परत एकदा मागासलेल्या विचारसरणीकडे न्यायला सुरुवात केली आहे, हे खूप चिंताजनक आहे. जाती-धर्म विसरून जोपर्यंत स्त्रिया आपल्यावरील अन्यायाविरोधात एकत्र येऊन लढणार नाहीत, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत.
स्त्रिया अंधश्रद्धेच्याही मोठ्या प्रमाणात बळी आहेत. स्त्रिया मानसिक आधार शोधतात आणि कुठलातरी बाबा-बुवा शोधून त्याच्या नादी लागतात. तो बाबा त्यांना अमुक-अमुक करा, तुमच्या सर्व समस्या सुटतील, असे सांगतो आणि या करत राहतात आणि शोषणाच्या बळी ठरतात.
भारतात हजारो वर्षे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अंधश्रद्धा आणि शोषण यांच्या त्या मोठ्या प्रमाणात बळी ठरल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांचे शोषण कमी व्हावे, त्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय, हक्क मिळावे यासाठी प्रचंड प्रयत्न केले. कायदे तयार केले. पण आज किती स्त्रियांना त्यांनी केलेले प्रयत्न माहिती आहेत? विशेष म्हणजे या सगळ्यांनी सर्व जाती-धर्मातील स्त्रियांसाठी कष्ट घेतले. पण आजच्या धर्मांध राजकारणाच्या काळात किती स्त्रियांना याची जाणीव आहे? चळवळीत काम करणाऱ्या सर्व स्त्रियांना तरी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची व त्यांनी स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव आहे का? की अजूनही आपल्या जातीचे हितसंबंध सांभाळण्यातच काही जणींना धन्यता वाटते? स्त्रियांमध्ये भगिनीभाव खरोखर वाढत आहे का? की अजूनही जाती श्रेष्ठतेत गुंतण्यात त्यांना मोठेपणा वाटतो?
दुसरीकडे गेल्या काही वर्षांत समाजात धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. स्त्रियांना या धार्मिक कार्यक्रमाला जायला घरातले कुणी थांबवत नाही. दुसरीकडे पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांची घरात प्रचंड घुसमट, गळचेपी होत असते, अशा परिस्थितीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी घरात राहणाऱ्या स्त्रियांना मिळते व त्या जात राहतात. त्यामुळे शिक्षण, अभ्यास, संशोधन, वैज्ञानिक दृष्टी यापासून त्या दूर राहतात. बहुजन स्त्रियांचे प्रश्न या बाबतीत जास्त गंभीर आहेत. भारतात बहुजन जातीतील आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील स्त्रियांचे शोषण जास्त होते. अज्ञानामुळे त्याच जास्त अंधश्रद्धाळू असतात आणि शोषणाच्या बळी ठरतात. या चक्रातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी त्यांना मिळायला हव्यात. दुसरीकडे स्त्री चळवळीमध्ये सुद्धा जर वैयक्तिक हितसंबंधांचे राजकारण होत असेल व तिथेही जात-धर्म यांचा प्रभाव वाढत असेल, तर परिस्थिती अजून गंभीर होत जाणार आहे. लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या स्त्रियांना शिक्षणासाठी संशोधनासाठी योग्य वातावरण देशात उपलब्ध न होता त्या फक्त धार्मिक कार्यक्रमात आणि उत्सवात गुंतवल्या जाणार असतील, तर तो देश अजून पुढची शेकडो वर्षे मागासलेल्या अवस्थेतच राहील.
पुरुषप्रधान व्यवस्था ही नैसर्गिक नाही, तर ती समाजानेच निर्माण केली आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेला उगम आहे, तर त्याचा अंतही होऊ शकतो. पितृसत्तेशी लढा सोपा नाही. कारण ती हजारो वर्षे चालत आलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था पुरुषांच्या जरी जास्त फायद्याची असली, तरी ती अंतिमतः पुरुषांचेही नुकसानच करते. स्त्री-पुरुष जेव्हा एकमेकांना सन्मानाने, समतेने वागवतील तेव्हाच ते आनंदात राहू शकतील. त्यामुळे समाजातील जातीच्या धर्माच्या लिंगाच्या आधारे होणारे सर्व प्रकारचे शोषण संपवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.
स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक