राज्यातील राजकीय अस्वस्थता वाढीस!

शिवसेनेची ज्यांनी स्थापना केली ते बाळासाहेब ठाकरे हे हयात नसताना, शिवसेनेचा ताबा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे.
राज्यातील राजकीय अस्वस्थता वाढीस!

-अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

शिवसेनाप्रमुख हयात असताना शिवसेनेत अनेक बंड झाली, परंतु मुख्य शिवसेना कुणी हस्तगत करू शकले नाही. मात्र त्यांच्या पश्‍चात शिवसेनाही गेली आणि मुख्य म्हणजे धनुष्यबाण निशाणीही गेली. आता या विरोधात लढाई न्यायालयात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार हयात असताना त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांच्याच पुतण्याने अजितदादा पवार यांनी हायजॅक केला आहे. त्यातून राज्यात राजकीय अस्वस्थता वाढीस लागली आहे.

शिवसेनेची ज्यांनी स्थापना केली ते बाळासाहेब ठाकरे हे हयात नसताना, शिवसेनेचा ताबा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. दुसरीकडे ज्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ते शरद पवार आज हयात असतानाही त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द केली गेली आहे. हा निर्णय वरकरणी एकसारखा असला तरी त्यात गुणात्मक फरक आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी स्वत: बंड केलीत. त्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचे राज्य आणले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे काही आमदार, जनता दलाचे, जनसंघाचे, शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांना घेऊन सरकार स्थापन केले होते हे महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यानंतर त्यांनी राजीव गांधी हयात असताना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते केंद्रात अनेक वर्षे मंत्री होते. सन १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पाडल्यानंतर शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे होते; परंतु त्या अगोदर सोनिया गांधींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही. त्याचा राग म्हणून सोनिया गांधी परदेशी आहेत असे म्हणून ते काँग्रेसमधून बाहेर पडले. सन १९९९ मध्ये शिवाजी पार्कवर भव्य मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तो काळ जर पाहिला तर पवार हे सोनिया गांधींच्या विरोधात किती आक्रमक होऊ शकतात याचे प्रत्यंतर येते. त्यावेळी तर त्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशीच्या मुद्यावरून टीकेचे मोहोळ उठविले आणि राष्ट्रवादीने १९९९ मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर प्रथम निवडणूक लढवली. ज्यावेळी महाराष्ट्राची सत्ता विरोधकांच्या हातात जाणार हे लक्षात आल्याने पवारांनी काँग्रेसबरोबर समझोता केला आणि ज्यांना परदेशी ठरवले होते त्यांच्याच सोबत तब्बल १४ वर्षे महाराष्ट्रात सरकार चालविले. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री ठरवून सुखनैव राज्य केले. त्यांनी प्रारंभीच्या काळात छगन भुजबळ यांना व नंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री केले. पुढे सलग दहा वर्षे अजित पवार हे काँग्रेससमवेत उपमुख्यमंत्री होते. हा झाला त्यांचा पूर्वेतिहास. पुढे २०१४च्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादीने मार्ग बदलला आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार पाडून त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. पुढे २०१४ ते २०१९ या काळात चौकशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी राष्ट्रवादीने चक्क भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा दिला आणि २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे देवेंद्र फडणवीस हे तब्बल पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्याकाळात प्रारंभी शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून दंड थोपटले आणि एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेतेपदी उभे केले. पुढे पाच-सहा महिन्यांनंतर शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सामील झाली. कमी दर्जाची मंत्रिपदे घेऊन शिवसेनेने भाजपशी पुन्हा घरोबा केला. हे करत असताना मधल्या दरम्यान सरकारमध्ये राहून अडथळे आणण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी केला. एवढेच नव्हे, तर सत्तेत राहून प्रथम कल्याण महापालिकेच्या निवडणुकीत दंड थोपटले. ती निवडणूक खूप गाजली. एकनाथ शिंदेंनी तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सभास्थानी जाहीर केले. पुढे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्तेत एकमेकांचे मित्रपक्ष राहिलेले शिवसेना व भाजप यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि भाजपचे गावित हे निवडून आले. हा घटनाक्रम सांगण्याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना सत्तेत राहूनही भाजपशी संघर्ष करीत होती. नेमके त्याचवेळी संजय राऊत यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु काँग्रेस नेतृत्वाने संमती न दिल्याने ते पुन्हा भाजपबरोबर आले. सन २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप म्हणून एकत्र लढले. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा करून महाविकास आघाडी तयार केली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, नेमके त्याचवेळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बंड करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ८२ तासांचे सरकार स्थापन केले आणि मग एकच खळबळ उडाली. पुढे अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले. हे सरकार कोरोनाच्या काळात अडीच वर्षे सत्तेवर राहिले आणि मग शिवसेनेतील एका मोठ्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सुरतला पोहचले. त्यानंतर जवळपास ३९-४० आमदारांनी गुवाहाटी गाठली. विशेष म्हणजे त्यामध्ये उठावात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असलेले आठ मंत्रीही शिंदे गटात सामील झाले आणि पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला राजीनामा द्यावा लागला आणि त्याजागी भाजपने मोठी चाल खेळून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले आणि शिवसेनेतील हे वादळ पुढे वाढत गेले.

आता परिस्थिती पाहिल्यास शिवसेनेकडे व राष्ट्रवादीकडे थोडे-थोडे आमदार राहिले आहेत. प्रारंभी निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला नाही, तर ज्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष व निशाणी धनुष्यबाणही शिंदे गटाला देऊन त्यांचीच शिवसेना खरी असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष खालसा झाला. निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना १९९९ची घटना मान्य करून उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख नाही तर पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे ते शिवसेना कार्यकारिणीच्या निर्णयाशिवाय एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना काढू शकत नाहीत आणि हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे असा निर्णय दिला. आता हे सगळ प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी राष्ट्रवादी स्थापन केली ते शरद पवार आजही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यांचे पाठबळ न राहिल्याने शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या हातात देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

शिवसेनेत यापूर्वी अनेक बंड झाले. शिंग्रे बंधूंनी प्रतिशिवसेना काढली, छगन भुजबळ हे बाहेर पडले तेव्हा अठरा शिवसेना आमदारांना घेऊन बाहेर पडले. शेवटी मत चाचणीच्या वेळी केवळ सहा आमदारच भुजबळांबरोबर राहिले. त्यानंतर गणेश नाईक व नारायण राणे बाहेर पडले. परंतु त्यांनी शिवसेना हा पक्ष हायजॅक केला नाही, तर एकनाथ शिंदेंच्या बाबतीत मात्र प्रकार वेगळाच घडला. त्यांनी शिवसेना हा पक्षच हायजॅक करून तो आमचाच आहे असे सांगून निवडणूक आयोगाकडून ती केस जिंकली आणि शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना व निशाणी धनुष्यबाण हायजॅक केला. मधल्या काळादरम्यान राज ठाकरे बाहेर पडले. मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंसारखा पक्ष हायजॅक केला नाही तर स्वतंत्र पक्ष स्थापन करून ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात उभे आहेत, तर इकडे राष्ट्रवादी स्थापन करणारे शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष व चिन्ह अजित पवार यांनी हायजॅक केला आणि शरद पवारांच्या जिवंतपणी त्यांनी उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष हा आज अजित पवारांच्या दारात उभा आहे. हे दृश्य अत्यंत खेदजनक असेच आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री म्हणून सत्ता असताना ४० आमदार उठाव करून बाहेर पडतात, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे ४२ आमदार अजितदादांकडे जातात. या सर्व घटनाक्रमामुळे राज्यात आज तरी राजकीय अस्वस्थतेचे वातावरण आहे यात शंका नाही.

logo
marathi.freepressjournal.in