महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीचे नेतृत्व

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा अधिक विकास व्हायचा असेल तर राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीचे नेतृत्व

- ब्रिजमोहन श्रीवास्तव

मत आमचेही

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा अधिक विकास व्हायचा असेल तर राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व असणे आवश्यक आहे. महायुतीचे सरकार राज्यात अधिक कार्यक्षमतेने काम करत आहे. यात अजित पवार यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक पकड या बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्याच्या प्रश्नांची अचूक जाण आणि जलद निर्णय हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अजित पवार यांच्या आर्थिक व्यवस्थापनातील अनुभवाचा फायदा राज्याला होत आहे.

सुमारे तीन लाख ३३ हजार रुपये दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्र देशातील सात सर्वात समृद्ध राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तीन लाख सात हजार ७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे राज्य समुद्राने वेढलेले आहे. या राज्यात संपूर्ण भारतातील नागरिकांसह जगातील विविध देशांचे नागरिक राहतात. महाराष्ट्राने केंद्रीय अर्थसंकल्पात १४ टक्के योगदान देऊन देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवला आहे. हा दर्जा अधिक वाढावा यासाठी महायुती सरकार प्रयत्न करत आहे. या आर्थिक शक्तीची मूळे म्हणजे आपले शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योगपती आहेत. हे लोक तन्मयतेने काम करू शकतील यासाठी राज्य सरकारने सुरक्षा आणि न्याय प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम कायद्यानुसार करण्यासाठी भक्कम नेतृत्व देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचा हा गतिमान आर्थिक विकास अधिक समृद्ध करण्यासाठी आणि पहिल्या राज्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम राजकीय वातावरण आणि प्रशासकीय यंत्रणा हवी. या परिस्थितीत महाराष्ट्राची ही गरज कोण पूर्ण करू शकेल? या प्रश्नाचे उत्तर म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांचीच टीम पुढे येते. या तिन्ही नेत्यांकडे राज्यासाठी काम करण्याची क्षमता आणि दृष्टी आहे. या नेत्यांच्या यशासाठी केंद्रात मजबूत सरकार असणे आणि या सरकारचा राज्याला पाठिंबा असणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या तिन्ही नेत्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाच्या आणि कल्याणाच्या अपार शक्यता आहेत. महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांमधील आपल्या निर्णयांमधून आणि कार्यपद्धतीतून महाराष्ट्रात आतापर्यंत स्थापन झालेल्या सरकारांपैकी युतीचे सरकार हे सर्वोत्कृष्ट आणि जलद निर्णय घेणारे सरकार असल्याचे सिद्ध केले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या या यशस्वी कारभारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. कारण महाराष्ट्राने त्यांची प्रदीर्घ राजकीय सक्रियता पाहिली आहे. त्यांची प्रशासकीय क्षमता तसेच त्यांच्या संघटनात्मक कार्यक्षमतेचा अनेक दशकांपासून अनुभव घेतला आहे. सर्वांना बरोबर घेऊन राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करण्याचा त्यांचा गुण राज्यातील जनतेला नवीन नाही. जनतेशी सतत संपर्क आणि भू-वास्तवाची माहिती हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या समस्यांवर ते नेहमीच बारीक लक्ष ठेऊन असतात. परिणामी त्यांचे निर्णय नेहमीच जलद आणि अचूक असतात. त्यामुळे जनतेला दिलासा मिळतो.

अजित पवार यांनी आपल्या निर्णयांनी एक विश्वसनीय नेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणूसही विश्वासाने सांगतो की, अजितदादांनी हो सांगितले म्हणजे ते काम पूर्ण होईल. अजित पवार यांच्या या वैशिष्ट्यामुळे कोविडच्या कठीण काळात महाराष्ट्रातील प्रत्येक पीडिताला उपचार मिळू शकले. आर्थिक प्रश्नांची अचूक जाण असलेल्या नेत्यांपैकी एक अशी अजित पवार यांची ओळख आहे. अल्पसंख्याक, महिला आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या विकासात मैलाचे दगड ठरले आहेत.

आज महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज आहे जे शेतकऱ्यांना चांगले बियाणे देऊ शकेल, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देऊ शकेल, रोजगार वाढवेल आणि सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवेल. राज्यातील शहरे नागरिकांसाठी अधिक चांगली आणि सुसज्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला कृतिशील रहावे लागेल. आज महाराष्ट्र मूलभूत बाबतीत पूर्वीपेक्षा चांगला झाला आहे. वाहतुकीसाठी रस्ते बांधले गेले आहेत. नवीन विमानतळं आणि बंदरे विकसित केली गेली आहेत. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी काम करावे लागेल. गरजेनुसार शासकीय यंत्रणेत बदल करावे लागतील.

महाराष्ट्राच्या झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे, रोजगार निर्मिती होणे, शहरी विकासाचा पर्यावरणीय गरजांशी समतोल साधणे गरजेचे आहे आणि यासाठी अनुभवी राजकारण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचेही सुसूत्रीकरण करण्याची गरज आहे. महायुतीच्या या तिन्ही नेत्यांना ही क्षेत्रे अधिक चांगल्या प्रकारे समजतात. अजित पवार यांच्या आर्थिक व्यवस्थापनातील अनुभवाचा फायदा सरकारच्या प्रत्येक निर्णयामध्ये होतो. यामुळेच या नेत्यांचे सामूहिक नेतृत्त्व महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देत ​​आहे.

विकासासाठी राज्याला दूरदृष्टी असलेल्या दृढ इच्छाशक्तीची गरज आहे, जी आज नरेंद्र मोदी आणि या तीन वास्तुविशारदांनी पूर्ण केली आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांवर मतदारांचा कल एनडीएच्या उमेदवारांच्या बाजूने आहे. कारण राज्यातील विकासाच्या समर्थकांना माहीत आहे की, राज्याच्या विकासासाठी केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाची गरज आहे.

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in