माहिती तंत्रज्ञानात संवादाची हरवली वाट

भविष्याची वाट लक्षात घेऊन शिक्षणातून ती आव्हाने पेलण्याची क्षमता, कौशल्य प्राप्त करून देण्याचा विचार केला जात असतो
माहिती तंत्रज्ञानात संवादाची हरवली वाट

शिक्षणनामा-

लोकशाही व्यवस्था आपल्याला पुढे घेऊन जायची असेल तर मुक्त संवादाला अधिक स्थान आहे. लोकशाहीत संवाद हरवला की लोकशाही धोक्यात यायला सुरुवात होते. लोकशाहीत सत्ता आणि जनता यांचा संवाद हरवला की उरतो तो केवळ भौतिक विकास. लोकशाहीत भौतिक विकासाइतकाच जनतेच्या आनंदाचा विचारही महत्त्वाचा असतो. व्यक्तीचा संवाद हाच आनंदाचा व जीवन बहरवण्याचा विचार आहे. तो संवाद निर्माण झाला तर आपल्याला आव्हाने पेलण्याची शक्ती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे, अन्यथा पराभवाचा मार्ग ठरलेला आहे.

भविष्याची वाट लक्षात घेऊन शिक्षणातून ती आव्हाने पेलण्याची क्षमता, कौशल्य प्राप्त करून देण्याचा विचार केला जात असतो. २१व्या शतकाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट कौशल्य शिक्षणातून रुजविण्याचा विचार पुढे आला आहे. जागतिक संघटनांनी त्यासाठी काही कौशल्य निश्चित केले आहे. त्या अनेक कौशल्यांपैकी एक महत्त्वाचे कौशल्य म्हणून संवाद कौशल्याचा विचार करण्यात आला आहे.

आपण ज्या काळात जगतो आहोत त्या काळात माहिती तंत्रज्ञानाने प्रचंड मोठी क्रांती केली आहे. तंत्रज्ञानाने संवादासाठी अनेक साधने आपल्या हाती दिली आहेत. त्या साधनांचा उपयोग करत संवादाची असलेली आपली भूक शमविण्याची अपेक्षा आहे. आज आपल्या हाती संवादाची अनेक साधने आली आणि चक्क माणसामाणसांतील संवाद मात्र हरवत चालला. माणसं मुकी झाली आहेत का? असा प्रश्न पडावा असे आपले वर्तमान आहे. घराघरात माणसं राहतात, पण घरातील माणसामाणसांतील संवाद मात्र हरवला आहे. प्रत्यक्ष आपल्या समोर माणूस असताना देखील त्याच्यासोबत संवाद होताना दिसत नाही. संवादाची भूक असली तरी त्यासाठीचा संवाद आभासी स्वरूपात घडतो आहे. संवादाची भूक दूरवर असलेला माणसाशी संवाद करत भूक भागवण्याचा विचार केला जात आहे. त्या आभासी संवादासाठी अनेकजण समाजमाध्यमावर गुंतलेले आहेत. माणसं एकत्र आली की पूर्वीसारखी संवादात गुंतत नाहीत. आज माणसं एकत्र आली की, प्रत्यक्ष संवादाऐवजी आभासी संवादात गुंतलेले दिसतात. संवाद ही माणसांची नितांत गरज आहे. ती प्रत्येक माणसाची भूक आहे. ती भूक आता मंदावत चालली आहे का? मंदावणाऱ्या भूकेमुळे माणसांच्या मस्तकी ताणतणावाचे ओझे वाढू लागले आहे हे मात्र खरे. त्यातून माणसाला एकाकीपणाचा अनुभव येतो आहे. तंत्रज्ञानाने संवाद होतो आहे, पण त्या तंत्रज्ञानाद्वारे मिळणारा अनुभव जिवंत नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे साधने हाती आली आणि आभासी संवाद होत असला तरी त्यातील आनंद मात्र खरा नाही. त्यातील आनंद हाही आभासी स्वरूपाचा आहे. त्यामुळे उद्याच्या समाजात संवादहीन व्यवस्था उभी राहिली तर समाजात अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यावर मात करायची असेल तर शिक्षणाने गंभीर विचार करण्याची गरज असते. उद्याचा माणसामाणसांतील संवाद हरवला जाऊ नये म्हणून शिक्षणातून संवाद कौशल्य रुजविण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. त्यादृष्टीने २१व्या शतकासाठीची कौशल्यात संवादाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

माणूस समाजशील प्राणी आहे असे ॲरिस्टॉटल यांनी म्हटले आहे. समाजशील माणसांशी संवाद ही गरज असते. आपण संवादाशिवाय जगू शकतो का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असे येते. माणसांची संवादाची भूक भागली जावी म्हणून कुटुंब संस्था निर्माण झाली असावी. संवादाची भूक असल्याने समूह संस्था देखील अस्तित्वात आल्या आहेत. संवादासाठी आज आपण भाषेचे उपयोजन करत आहोत. त्या भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपले विचार, मुद्दे, मत योग्य त्या पद्धतीने समोरच्याच्या गळी उतरवत असते. मुळात आपल्या मनातील विचार योग्य त्या पद्धतीने दुसऱ्याच्या गळी उतरवता आला तर संवाद योग्य पद्धतीने झाला असे मानले जाते. संवादासाठी दोन व्यक्ती किमान असाव्या लागतात. बोलणाऱ्याला जे काही सांगायचे आहे तो विचार योग्य तो भावासह समोरच्याच्या हृदयात पोहचायला हवा. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, “जे हृदयीचे ते हृदयी घालीले” असे ते व्हायला हवे. आपल्याला बोलता येते पण प्रत्येक बोलला जाणारा विचार, भाव म्हणजे संवाद असतोच असे नाही. प्रत्येक संवाद हृदयाशी नाते सांगणारा असतो. त्यामुळे आपला विचार, मुद्दा दुसऱ्याला किती प्रभावीपणे समजून दिला जातो ते अधिक महत्त्वाचे आहे. ते कौशल्य वर्तमानात अधिक गरजेचे झाले आहे. समाजासाठी संवाद महत्त्वाचा. संवादामुळे माणसं जोडली जातात. संवाद हरवला की माणसं तुटतात आणि नातेही हरवले जाते. संवाद योग्य नसेल तर प्रत्येक वेळी मला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणून खुलासा करण्याची वेळ येते. योग्य संवादाने माणसाचे नाते निर्माण होते. मुळात नाते जन्माने मिळत असले तरी ते फुलण्यासाठी आणि बहरण्यासाठी संवाद हवा असतो. आज नात्यात बेबनाव निर्माण झाला आहे. नात्याची वीण सैल होते आहे. माणसं भावनाशून्य बनत चालली आहेत. संवेदना बोथट होताना दिसत आहे. अशावेळी संवादाची गरज अधिक अधोरेखित होताना दिसते आहे. त्यासाठी शिक्षणातून जी कौशल्यं रुजविण्याची परिभाषा होते आहे त्यात संवादाचे मोल अधिक आहे. संवादाची भूक भागवण्यासाठी आपल्याकडे आज अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. या माध्यमांचा विचार करत जात असताना आपण खरच संवादाची पावले टाकत आहोत का? समाजमाध्यमं हाती आली आणि संवाद होत असला तरी त्या संवादातील विवेक हरवला आहे. संवादातील भावशून्यता उंचावते आहे आणि संवेदना गोठल्या आहेत. ही माध्यमे आपली भूकेची गरज भागवण्यासाठी अस्तित्वात आली आहेत. लोक त्याद्वारे आपली भूक भागवत असले तरी त्या संवादात संवेदनशीलता नाही. आज एखादी व्यक्ती एखाद्या समूहात भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि कोणताही क्षण वाया न जाता तत्काळ त्याच समूहात पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देते. पुन्हा त्या दिवशी काही विशेष असेल तर पुन्हा त्या दिवसाच्या विशेष शुभेच्छा देऊन तो मोकळा होता. आपण ज्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्या व्यक्तीबद्दलची थोडीशी देखील संवेदना, सद‌्भावना आपल्या मनात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यात कोणताही भाव नाही तर हा केवळ अक्षरांचा समूह आहे. शुभेच्छा देताना देखील कोणताच भाव नाही. हा सारा संवादाचा प्रवास अधिक चिंताजनक मानायला हवा. समाजमाध्यमांवर संवाद साधताना आपण विवेकही गमावला आहे. संवादात मुळात आदर असायला हवा आहे. संवाद करताना मर्यादांचा विचार कराला हवा. संवादातून योग्य ते पोहचायला हवे आहे. मात्र आज समाजमाध्यमांवर संवादाचा विचार जेव्हा होतो तेव्हा ते संवादासाठीचे व्यक्त होणे अधिक चिंताजनक बनत चालले आहे. संवादात जे भान असायला हवे ते भान सुटत चालले असल्याचे प्रतिबिंबीत होऊ लागले आहे. माणसं जे बोलत आहेत ते विवेकीपणाचे लक्षण नाही. माध्यमातील व्यक्त होणारी मोठी माणसं पाहिली की आपल्याला बोलण्यापेक्षा संवादाची अधिक गरज आहे हे पुन्हा अधोरेखित होते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अधिक प्रस्फोट होत जाणार आहे आणि त्याचवेळी माणसं अधिक एकाकी बनण्याचा धोका आहे. त्यातून बरंच काही गमावण्याची शक्यता आहे. अशावेळी संवादाची गरज आहे. त्यामुळे २१ व्या शतकासाठी संवादाचे कौशल्य विकसित करण्याचे आव्हान शिक्षणातून पेलण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात संवाद फुलण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत अधिकाधिक संधी देण्याचा विचार आहे. शिक्षणात आंतरक्रिया अधिक महत्त्वाची मानली जाते. ती आंतरक्रिया आपल्याला सुयोग्य प्रवासाची दिशा दाखवेल. लोकशाही व्यवस्था आपल्याला पुढे घेऊन जायची असेल तर मुक्त संवादाला अधिक स्थान आहे. लोकशाहीत संवाद हरवला की लोकशाही धोक्यात यायला सुरुवात होते. लोकशाहीत सत्ता आणि जनता यांचा संवाद हरवला की उरतो तो केवळ भौतिक विकास. लोकशाहीत भौतिक विकासाइतकाच जनतेच्या आनंदाचा विचारही महत्त्वाचा असतो. व्यक्तीचा संवाद हाच आनंदाचा व जीवन बहरवण्याचा विचार आहे. तो संवाद निर्माण झाला तर आपल्याला आव्हाने पेलण्याची शक्ती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे, अन्यथा पराभवाचा मार्ग ठरलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in