विलीनीकरणाचा नवा वाद!

'इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’विरोधात एक सक्षम पर्याय उभा करण्याची संधी आहे. भाजप अनेक पक्षांना खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्यामुळे आपण एकत्र येत लढायला हवे, असा विरोधकांचा सूर आहे.
विलीनीकरणाचा नवा वाद!

विश्लेषण- प्रा. अशोक ढगे

'इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’विरोधात एक सक्षम पर्याय उभा करण्याची संधी आहे. भाजप अनेक पक्षांना खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्यामुळे आपण एकत्र येत लढायला हवे, असा विरोधकांचा सूर आहे. विविध राज्यांमध्ये काँग्रेसपासून दुरावलेल्या अनेक पक्षांना मोदी सरकार नको आहे. त्यांच्यासाठीही काँग्रेस हाच पर्याय असू शकतो. हेच शरद पवार यांनी वेगळ्या सुरामध्ये मांडले आणि एकच गलका झाला. अद्यापही या वादाचे तरंग कायम आहेत. या विधानाचे वेगवेगळे अन्वयार्थ समजून घ्यायला हवेत.

नदीचा किंवा डोहाचा प्रवाह संथ असेल आणि त्याकाठी काही मुले उभी असतील, तर एखादा खोडकर मुलगा उगीच डोहात किंवा नदीच्या प्रवाहात दगड फेकतो. त्याचे तरंग किती आणि कसे उमटतात, हे तो पहात असतो. त्यातून आपल्या अंगावर किती शिंतोडे उडतात आणि इतरांच्या अंगावर किती याचा अदमास घेतला जात असतो. राजकारणी हे अशाच व्रात्य मुलांसारखे असतात. समाजमन एक विचार करत असताना ते अनेकदा संथ समाजमनात काही दगड भिरकावतात. त्यावर काय, कशा आणि किती तीव्रतेच्या प्रतिक्रिया येतात, हे ते आजमावत असतात. प्रतिक्रिया अनुकूल असल्या की आपले विचार पुढे न्यायचे आणि प्रतिकूल असल्या की माध्यमांवर खापर फोडून मोकळे व्हायचे, असा त्यांचा स्वभाव असतो. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला, हे वाक्य तर ठरलेलेच. लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर शरद पवार यांनी दिलेली एक मुलाखत अशीच देशभर चर्चेत आली. अद्यापही त्याचे तरंग विरलेले नाहीत.

महाराष्ट्रात मतदानाचे दोन तर देशात चार टप्पे शिल्लक असताना ही मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यतः दोन मुद्दे मांडले. यात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २३० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे ते सांगतात. याचा अर्थ देशात मोदी यांची सत्ता येणार नाही, याचा त्यांना विश्वास आहे. ‘इंडिया’ आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, हे त्यांचे दुसरे मनोगत. परंतु हा ‘जर-तर’चा खेळ आहे. मोदी यांची सत्ता जाण्याची शक्यता तूर्त तरी संभवत नाही. त्यांच्या जागा कमी होतील; परंतु सत्ता जाईल, असे संभवत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेल्या दुसऱ्या शक्यतेला जास्त महत्त्व आहे. येत्या दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या अधिक जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला आहे. मोदी आणि भाजपने आधी ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि नंतर ‘विरोधी पक्षमुक्त भारत’ अशी घोषणा केली होती. मोदी यांच्या सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोदाम सील केले गेल्याने संचालक अभिजित पाटील यांना महायुतीच्या उमेदवाराचे काम कसे करावे लागले आणि कर्जवसुली आयोगाने राज्य सहकारी बँकेची कारवाईच कशी अवैध होती, हे निकालात म्हणण्याचे उदाहरण या दृष्टीने पुरेसे बोलके आहे.

मोदी सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांमुळे अनेक राजकीय पक्षांचे लोक ‘भाजपम् शरणं गच्छामि’ म्हणत असले तरी मोदी आणि भाजप यांचे विचार मान्य नसणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्याशी एकाकी लढता येणार नाही, असा पवार यांच्या मुलाखतीचा थोडक्यात अर्थ आहे. अर्थात पवार म्हणतात तसेच होईल, असा काही त्याचा अर्थ नाही. काँग्रेसमधून फुटून निघालेले तृणमूल काँग्रेससारखे पक्ष आता चांगलेच बळकट झाले आहेत. लोकसभेच्या या निवडणुकीतही प्रादेशिक पक्ष बळकट होतील, असा अंदाज आहे. अशा वेळी हे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता नाही. विशेषतः दक्षिणेकडील पक्ष तर काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यताच नाही. वैचारिक पातळीवर एक असणारा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. मात्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कितीही मैत्री असली तरी त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची सूतराम शक्यता वाटत नाही. एक मात्र होईल, मोदी यांनी कोंडी केली तर त्यांच्याविरोधात पवार म्हणतात तसे अनेक राजकीय पक्ष काँग्रेसच्या अधिक जवळ येतील. शरद पवार यांनी यापूर्वी केलेल्या घोडचुकांमुळेच महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना वाढली, ही वस्तुस्थिती आहे. १९८० नंतर पवार यांची समाजवादी काँग्रेस राज्यात काँग्रेसला पर्याय ठरण्याची शक्यता निर्माण होत असताना पवार यांनी त्यांची समाजवादी काँग्रेस राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यामुळे रिक्त झालेली पोकळी शिवसेना आणि भाजपने भरून काढली.

थोडक्यात, दिल्लीत एवढी वर्ष राजकारण करूनही आणि काँग्रेसमध्ये राहूनही पवार यांना काँग्रेस पूर्णपणे समजली नाही. त्यांनी सीताराम केसरी यांच्यासारख्या सामान्य वकुबाच्या नेत्याविरुद्ध काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि पराभव पत्करला. त्याआधी पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करून माघार घेतली. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी नेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी वय पवार यांच्या बाजूने होते आणि काहीही करून दाखवण्याची जिद्दही होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पक्षात फूट पडण्याआधीपासून त्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याची ऑफर येत होती. आता त्यांनी त्याचा विचार केल्याचे सदर मुलाखतीतून दिसले. अर्थातच या मुलाखतीचे पक्षात आणि अन्य पक्षांमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे समोर आले आहेच. आता पवार आणि काँग्रेस या दोघांनाही परस्परांची गरज आहे, हे या मुलाखतीतून ध्वनित होत आहे.

मुळात शरद पवार यांनी आताच्या परिस्थितीत हे वक्तव्य का केले, असा प्रश्न पडतो. मुलाखतीत जाणवलेला भाजप विरोधातील पैलू लक्षात घेता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्या विचारधारेला समोर ठेवून अनेक छोटे पक्ष आपल्यासोबत येतील, असा विश्वास पवार यांनी बोलून दाखवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर विलीनीकरणाची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. राष्ट्रवादीतील एका गटाचे त्यावेळीही म्हणणे होते की, आपण काँग्रेसमध्ये विलीन होऊन निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला यांनी पवार यांच्यासमोर हाच प्रस्ताव ठेवल्याची माहिती होती. देशातील राजकारणात शरद पवार यांची ख्याती अनेकांना ज्ञात आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पवारच मोदी यांच्या हिटलिस्टवर होते. पक्षफुटीनंतर पवार डगमगले नसले, तरी राजकीयदृष्ट्या पक्षाची मोठी हानी झाली, हे नाकारून चालत नाही. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे एकहाती लढत आहेत. त्यातच पवार यांनी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले. या राजकीय बाॅम्बने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात कोण कोण राजकीय लढाई लढणार हा खरा प्रश्न आहे. अर्थात अजून तरी काँग्रेसमध्ये थेट विलीन होण्याचा निर्णय पवार यांनी जाहीर केलेला नाही. व्यावहारिकदृष्ट्या त्यात काही चूक वाटत नाही. मोदीविरोधातील गटांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग व्यावहारिक वाटतो. शरद पवार यांनी आजपर्यंत केलेली विविध वक्तव्ये आणि त्याचे टाइमिंग लक्षात घेता काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या या वक्तव्याचे टायमिंग आणि त्याचे महत्त्व यालाही काही अर्थ आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांनी कोणताही कौल दिला, तरी देशातील विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा पवार यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. काँग्रेस आणि आमची विचारधारा एकच आहे, असे त्यांनी सुचवले आहे. राजकारणातील नवीन पिढीला कोणत्याही परिस्थितीत सत्तेच्या दिशेने आणि सत्तेच्या बाजूने जायचे आहे. साहजिकच काँग्रेसच्या विचारधारेसाठी अशा प्रकारचे विलीनीकरण किंवा एकत्रीकरण गरजेचे आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे गेल्या १३९ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विघटन होऊन प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवर अनेक नवे गट तयार झाले. काळाच्या ओघात त्यापैकी अनेक गट किंवा पक्ष पुन्हा काँग्रेसला मिळाले असले तरी राज्याराज्यांमध्ये काँग्रेसची विचारधारा मानणारे पण वेगळा सवतासुभा करणारे अनेक राजकीय पक्ष आजही अस्तित्वात आहेत. असे अनेक पक्ष आपला मूळचा काँग्रेसचा डीएनए जपून काम करत आहेत. पण आज काही राज्यांमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले प्रादेशिक पक्ष एवढे मोठे झाले आहेत की पुन्हा मूळ पक्षामध्ये सामील होण्याची कोणतीही शक्यता नाही. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष, बिहारमधील लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल असो किंवा दक्षिण भारतातील द्रमुकसारखे पक्ष असोत, असे अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता खूपच कमी आहे; पण हे पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊ शकतात. शरद पवार यांना या मुलाखतीद्वारे हेच सुचवायचे आहे.

(लेखक ज्येष्ठ राजकीय अभ्यासक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in