थोरल्या पवारांच्या डावपेचांशी ‘फडणवीस नीती’चा सामना!

सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्व काही आलबेल असल्याचे भासवले. परंतु एकापेक्षा अधिक पक्ष सोबत असल्याने कोणाची ना कोणाची नाराजी ओढवून घेण्याची वेळ आल्याने आघाडी आणि महायुती दोन्हीकडे असंतोषाचा स्फोट झालेला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनाही असंतोष शमविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे आणि सोबतच त्याच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत.
थोरल्या पवारांच्या डावपेचांशी ‘फडणवीस नीती’चा सामना!

- राजा माने

राजपाट

महाराष्ट्रात सूर्यनारायण तीव्रतेने तळपायाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक धरणे कोरडी पडत असल्याने अर्ध्या महाराष्ट्रात आजच पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा संपन्न झाला आहे. शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाविकास-इंडिया आघाडी’ आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ यांच्यातील राजकीय संघर्ष आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. राजकारणाची मांडणी तुम्हा-आम्हाला जशी दिसत होती, त्यापेक्षा दररोज वेगळेच घडत आहे. राज्याच्या राजकारणातील ‘थोरले पवार’ आणि ‘फडणवीस नीती’ हा संघर्ष टिपेला पोहोचणार हे स्पष्ट दिसत आहे. त्याचे परिणामही दिसत आहेत. अगदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हा काँग्रेसचा हुकमी मोहरा टिपण्यापासून शरद पवारांच्या गळाला लागलेले महादेव जानकर पुन्हा महायुतीत येऊन बसण्याच्या घटना घडत आहेत. आता हा संघर्ष थांबणार नाही. त्यात कोण आणि कशी बाजी मारणार आणि त्याचा मतदारराजावर किती परिणाम होणार हा खरा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने अतिशय चतुराईने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तोडीस तोड उमेदवार देण्याकरिता अतिशय सावध पवित्रा घेतला जात आहे. त्यातूनच उमेदवारी जाहीर करायला उशीर होत आहे. मात्र, जसे उमेदवारांचे चेहरे समोर येत आहेत, तशी मित्रपक्षांत कोणत्या ना कोणत्या कारणावरून अस्वस्थता पसरत आहे. सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्व काही आलबेल असल्याचे भासवले. परंतु एकापेक्षा अधिक पक्ष सोबत असल्याने कोणाची ना कोणाची नाराजी ओढवून घेण्याची वेळ आल्याने आघाडी आणि महायुती दोन्हीकडे असंतोषाचा स्फोट झालेला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनाही असंतोष शमविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे आणि सोबतच त्याच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत.

महाविकास आघाडीत जागावाटप सुरळीत पार पडावे, यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. राज्यात खूप उलथापालथ झाल्याने आणि त्याच्या सर्वाधिक झळा शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसला बसल्याने सावधपणे जागावाटप होईल आणि साथीला वंचित आघाडीही येईल, असे चित्र होते. त्यादृष्टीने अतिशय सावध पावले टाकली जात होती. परंतु आता उमेदवारी घोषित करण्याची वेळ येऊन ठेपलेली असतानाही जागावाटपाचे सूत्र ठरत नाहीए. खरे तर बऱ्याच जागांचा गुंता सुटला होता. मोजक्याच आणि कळीच्या जागांवरून खरा वाद होता. तोच तिढा शेवटपर्यंत संपलेला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपापली बाजू मांडत राहिले. त्यात शरद पवार यांनी प्रमुख भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबईच्या दोन जागा आणि सांगली, भिवंडीवरून तिढा कायम राहिला.

अशा स्थितीतही वंचितला सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला गेला. परंतु महाविकास आघाडी यात यशस्वी होऊ शकली नाही. कारण मुळातच तीन प्रमुख पक्षांचे जागावाटप वेळेत मार्गी लागू शकले नाही. अशा स्थितीत आणखी एखादा पक्ष आपली फरफट का करून घेईल, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सामोपचाराने जागांचे वेळेत वाटप केले असते तर कदाचित आणखी काही पक्ष साथीला येऊ शकले असते आणि अर्थातच महाविकास आघाडी अधिक सक्षम ठरली असती. परंतु अखेर जे व्हायचे तेच झाले. कारण सांगली आणि मुंबईच्या दोन जागा काँग्रेसला हव्या होत्या, त्या जागांचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. काँग्रेसला वायव्य मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवी होती. परंतु वायव्य मुंबईचे उमेदवार जाहीर केल्याने आणि दक्षिण-मध्य मुंबईतही अनिल देसाई यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात असल्याने काँग्रेस नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे.

ही नाराजी केवळ मुंबई किंवा सांगलीपुरती मर्यादित नाही, तर सर्वच काँग्रेस नेत्यांत अस्वस्थता पसरवणारी ठरली. खरे तर संवादातून मार्ग काढणे हाच खरा पर्याय आहे. परंतु त्याचे कोणीही तंतोतंत पालन केले नाही. यात काँग्रेसनेही रामटेक मतदारसंघात उमेदवार जाहीर करून टाकला. यावरून समन्वयापेक्षा कुरघोड्या केल्या गेल्या. त्यातूनच हा नाराजीचा स्फोट झाला. सांगलीचे गाऱ्हाणे दिल्लीपर्यंत पोहोचले आणि माजी खा. संजय निरुपम यांनी वायव्य मुंबईच्या उमेदवारीचा राग थेट ठाकरे गटावर हल्लाबोल करून आणि काँग्रेसवरही टोकाची टीका करून बाहेर काढला. एवढेच नव्हे, तर त्यांनी थेट काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याची भाषा वापरली. दुसरीकडे शिवसेनेतही नाराजी आहेच. नाशिकमध्ये ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक उमेदवार विजय करंजकर नाराज झाले आणि त्यांनी दंड थोपटले. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुद्द विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज आहेत. आता यातून सर्वच नेते संयमाने कसा मार्ग काढतात, यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

उमेदवारीवरून केवळ महाविकास आघाडीतच असंतोष आहे असे नाही, तर महायुतीत यापेक्षा अधिक गोंधळ आहे. महायुतीतही सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दाखविण्यात आले. परंतु कधी शिंदे गट, तर कधी भाजप, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खदखद समोर येत आहे. त्याचा स्फोट होऊ नये म्हणून महायुतीचे सर्वच नेते काळजी घेत आहेत. मात्र, कुठे ना कुठे धुमसणारा असंतोष बाहेर निघत आहे. एक तर महायुती म्हणून भाजपने एक पाऊलही मागे टाकले नाही. उलट शिंदे गट आणि राष्ट्रवादीला जेवढे बॅकफूटवर आणता येईल, तेवढे आणले आहे. परंतु महायुती म्हणून त्यांना आवाज उठवता येत नाही, ही त्यांची अगतिकता पावलोपावली दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत तर तब्बल १३ विद्यमान खासदार आले होते. परंतु त्यातील बऱ्याच खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल, याची शाश्वती नाही. कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, नाशिक, वायव्य मुंबईच्या विद्यमान खासदारांची गोची झाली आहे. ते सातत्याने फिल्डिंग लावत आहेत. मात्र मुख्यमंत्री त्यांना ठाम शब्द द्यायला तयार नाहीत. आता तर भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे जागावाटपात शिंदे गटाची फार मोठी कोंडी झालेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, माढा, सोलापूर आदी भागात प्राबल्य आहे. तसेच नाशिक, गडचिरोली, नगर, भंडारा-गोंदिया, परभणी, धाराशिवमध्येही त्यांची ताकद मोठी आहे. मात्र राष्ट्रवादीच्या जागांचे बळ चारच्या पुढे जायला तयार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बॅकफूटवर येण्याची वेळ आली आहे. या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी, ‘साताऱ्यात घड्याळ चिन्हाचा प्रभाव असून जर उमेदवारीच मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय?’ अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली. माढ्यात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिलेली असताना अकलूजचे मोहिते पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर घराण्याने महायुतीचा धर्म न पाळण्याची भूमिका घेतली आहे. तसेच अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपमधून उमेदवारी देण्याच्या भूमिकेमुळे भाजप, शिंदे गटासह मित्रपक्षाचे नेते असलेल्या बच्चू कडू यांनी युतीचा धर्म न पाळण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाढती खदखद ऐन निवडणुकीत कोणाला मारक ठरते, हा येणारा काळच ठरविणार आहे.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in