
एकेकाळी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेले सेनानी, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत अग्रणी, सामाजिक चळवळीतील नेतेमंडळी राजकारणात सक्रिय होती. समाजाला दिशा देण्याचे कार्य ही मंडळी करीत होती. कृषी, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्रांती घडविण्यात या समाजधुरिणांचे मोठे योगदान होते. वैज्ञानिक आणि सुधारणावादी दृष्टिकोनातूनच अनेक जण राजकारणात सहभागी होत होते. समाजवादी, डाव्या विचारांच्या नेत्यांची भूमिका नेहमीच समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याची राहिली. शिवसेनेच्या शाखांमध्ये पूर्वी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचे धडे दिले जात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांप्रमाणेच आता शिवसेना नेतेही राजकारणात चांगलेच मुरले आहेत, अलीकडच्या बंडखोरीतून ते सहज लक्षात यावे. आधी विरोधी पक्षात असले काय, सत्ताधारी पक्षात असले काय, नेत्यांना काही फरक पडत नसे. यापूर्वी लोकप्रतिनिधी मग तो कोणत्या पक्षाचा आहे, हा मुद्दा गौण होता; परंतु तो कशाप्रकारे आपल्या भागाचा विकास घडवून आणतो, याला अधिक महत्त्व दिले जात होते. आधीचे नेते राजकारणही सुसंस्कृतपणे करीत असत. राजकारण्यांमध्ये दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांविषयी आदर होता. मानसन्मान दिला जात होता. अलीकडच्या काळात राजकारणाने अगदी हीन टोक गाठायला सुरुवात केलीय. आजकालच्या नेत्यांची अरेरावीची भाषा, त्यांची राजकीय सौदेबाजी, त्यांची गुंडगिरी पाहता, राजकारण हा सभ्य लोकांचा विषय राहिलेला नाही. आजकाल दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांविषयी विखारी भाषेचा प्रयोग केला जात असून, त्याने सामान्य माणसे व्यथित झालेली आहेत. आधीची नेतेमंडळी परस्परांचा आदरसन्मान राखून विधायक टीका करीत असत; परंतु आता या टीकेची जागा द्वेषभावनेने, चिथावणीने घेतली आहे. आजकाल ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे, असे कुणीही शेंबडे पोर उठून राजकारणावर कुत्सितपणे बोलत आहे, ज्येष्ठ नेत्यांच्या वयाचा, अनुभवाचा मान न राखता त्यांची खालच्या भाषेत निर्भत्सना करीत आहे. त्यामुळे सभ्य, सुसंस्कृत, सामंजस्याच्या राजकारणाची जागा आता कुटील राजकारणाने घेतली आहे. राजकारणात आता सात्त्िवकता, नैतिकता उरलेली नाही. राजकारण्यांचा दर्जाही दिवसेंदिवस ढासळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ‘राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झाल्याची खंत व्यक्त करतानाच, ‘आता राजकारण कधी एकदा सोडतोय’ असे झाल्याची भावना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. “राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की, सत्ताकारण, हे समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले, त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते; पण आता १०० टक्के सत्ताकारण झाले आहे. माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो, तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते,” असेही गडकरी म्हणालेत. दुसरीकडे “काँग्रेसमुक्त भारत घडवणार असा नारा काही वर्षांपूर्वीच भाजपने दिला असला, तरी देशाला काँग्रेसची गरज आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर मी टीका करू शकत नाही,” असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “पंडित नेहरूंवर अनेक जण टीका करतात. मी, एका विशिष्ट राजकीय पक्षातून आलो असलो, तरी मी पंडित नेहरू किंवा कोणत्याही भारतीय पंतप्रधानावर टीका करू शकत नाही. मी, भारतीय पंतप्रधानांच्या हेतूवर शंका घेऊ शकत नाही. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धादरम्यान त्यांचे धोरण चुकले असेलही; पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. भारतावर वाईट नजर टाकणारा कुणीही असो, आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. यापुढे कोणतेही युद्ध होऊ देत, भारत नक्कीच विजयी होईल. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि भारताचाच भाग राहील,” असे २३व्या कारगिल विजयदिनानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. गडकरी काय किंवा राजनाथ सिंह काय, या दोन्ही अनुभवी नेत्यांनी लोकभावनाच व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांची सरकारे फोडायची, तिथे आपल्या बगलबच्च्यांना आणायचे, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध चौकशा लावायच्या व ते जर का भाजपमध्ये आले, तर त्यांच्या चौकशा बासनात गुंडाळून ठेवायच्या, हे पक्षपाती व खुनशी राजकारण उबग आणणारे आहे.