अफवांचं मानसशास्त्र आणि झुंडशाही

दंगलीच्या अफवा पसरवून त्यातून आपली राजकीय पोळी भाजण्यात अनेक संस्था पुढे होत्या
अफवांचं मानसशास्त्र आणि झुंडशाही

अफवेचे पंख मिळाले तर खोट्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त होतो. आजकाल अनेक राज्यांमध्ये मुलं पळवणाऱ्‍या टोळीची अफवा उठत आहे. सत्य समोर येण्याआधी जमावाने अनेक निष्पाप लोकांना बेदम मारहाण केली आहे. साधूंना मुलं पळवणारी टोळी म्हणून मारहाण करण्यात आली. एखाद्या अफवेत इतकी ताकद असते की, जीव घेतल्यानंतरच जमाव शांत होतो. अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि झुंडशाहीला जन्म देतात.

समूहाला कधीच शहाणपण नसतं. झुंडशाहीला फक्त निमित्त हवं असतं. गेल्या काही वर्षांपासून गोवंश हत्येच्या तसंच दंगलीच्या अफवा पसरवून त्यातून आपली राजकीय पोळी भाजण्यात अनेक संस्था पुढे होत्या. त्यातच मुलं पळविणारी टोळी आल्याच्या संशयातून गेल्या दोन वर्षांमध्ये साधूंसह काही पर्यटकांच्या हत्या झाल्या. ओदिशात समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या दोघांचा मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून बळी घेतला गेला. त्यानंतर पालघरमध्ये दोन साधूंना जमावाने अशाच प्रकारे मारलं. त्यावरून देशभरात वादंग झालं. कोणत्याही गोष्टीचं राजकारण करण्याची आपली वृत्ती असल्याने अफवा पसरवणाऱ्‍या समाजकंटकांचं फावतं. मुझफ्फरनगरच्या दंगलीतून तर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन झालं. ज्या वेगाने अफवा पसरवल्या जातात, त्याच वेगाने त्यांचं निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. आताही सांगलीत दोन साधूंना मारहाण करण्यामागे गैरसमजच जास्त आहेत. तिथल्या घटनेवर पडदा पडत नाही, तोच नांदेड, बुलडाण्यातही मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून काही जणांना मारहाण करण्यात आली. अपहरणकर्ते शहरात फिरत असल्याचे संदेश ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असून त्याच धास्तीतून राज्यात अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. नाशिकमध्ये मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप दिला. बुरखाधारी तरुण अपहरणकर्ता असल्याचा समज झाल्याने नागरिकांनी त्याला मारहाण केली. पोलीस वेळीच पोहोचल्यानं या तरुणाची सुटका झाली. जळगावमध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या एका महिलेला मारहाण करण्यात आली.

पुणे आणि नागपूरमध्येही अलीकडे अशा प्रकारच्या अफवा पसरल्याने घबराट पसरली. मुंबईप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही मुलं चोरणाऱ्‍या टोळीबाबतची अफवा पसरली. नागपूर शहरातल्या अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपवर एक चित्रफीत व्हायरल झाली. या टोळीने एका मुलाचं अपहरण केल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी तातडीने मुलाला शोधलं. त्याच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय आहे. मुलगा दूध वितरणासाठी गेला. घरी परतताना दुधाच्या कॅनचं झाकण कुठे तरी पडलं. वडील रागावतील, या भीतीने मुलगा बेपत्ता झाला होता. पोलिसांनी नेहमीप्रमाणे अफवा पसरवणाऱ्‍यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे; परंतु अशा किती प्रकरणांमध्ये कारवाई झाली, याचं उत्तर मिळत नाही.

सांगलीमध्ये जमावाने कारमध्ये बसलेल्या साधूंना त्यांचं आधार कार्ड मागितलं. ते त्यांनी दाखवलं; पण गर्दीने जणू साधूंची ठेचून हत्या करायचं हे ठरवून टाकलं होतं. एक माणूस गाडीत बसलेल्या साधूचा पाय ओढू लागतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती भिक्षूला बेल्टने मारायला लागते. साधूचे केस पकडून गाडीतून बाहेर काढलं जातं आणि मग लोक साधूला बेदम मारहाण करू लागतात. हा सर्व प्रकार मुलं पळवणारी टोळी असल्याच्या अफवेमुळे घडला. हे चार साधू विजापूरहून पंढरपूरला दर्शनासाठी जात होते. चारही साधूंनी सांगलीच्या लवंगा गावातल्या मंदिरात मुक्काम केला. त्यांनी एका दुकानात थांबून रस्ता विचारला. यादरम्यान त्यांनी एका मुलालाही रस्ता विचारला. त्यामुळे काही स्थानिक लोकांना संशय आला आणि त्यांनी साधूला लहान मुलं उचलणारी टोळी समजलं. साधू जीव वाचवण्याची याचना करत राहिले; परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ग्रामस्थांनी साधूंना काठ्यांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी साधू धावू लागले, तेव्हा धावणाऱ्‍या लोकांनी त्यांना पकडून मारहाण केली. सुदैवाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने साधूंचे प्राण वाचले. साधूंना लोकांची भाषा समजत नव्हती. त्यामुळे प्रकरण चिघळलं आणि लोकांनी साधूंना मारहाण केली. ‘मॉब लिंचिंग’ला बळी पडलेल्या साधूंनी या घटनेबाबत कोणतीही तक्रार किंवा फिर्याद दिलेली नाही.

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये जमावाने दोन साधूंसह तिघांची हत्या केली होती. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. ७० वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि सुशील गिरी आणि त्यांच्या ड्रायव्हरला जमावाने बेदम मारहाण केली. त्या वेळी पोलिसांनी सुमारे २५० जणांना अटकही केली होती. हे साधू आपल्या गुरूंच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईहून सुरतला जात होते; मात्र टाळेबंदीमुळे पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर साधू ग्रामीण भागाकडे वळले. तिथे त्यांना मुलं पळवणारी टोळी असल्याचं समजून जमावानं मारलं, तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. पालघरच्या घटनेवरून त्या वेळी बरंच राजकारण झालं होतं आणि आता सांगलीच्या घटनेनंतरही राजकारण सुरू झालं आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातल्या नांदेडमधूनही समोर आली आहे. तिथे दोन तरुणांना मुलं चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावानं बेदम मारहाण केली. काही दिवसांपासून नांदेडमध्ये अशी टोळी त्या भागात फिरत असल्याची तक्रार होती. त्यामुळे संशयाच्या आधारे जमाव जिथे तिथे संशयितांना विचार न करता मारहाण करू लागला.

उत्तर प्रदेशमध्येही मुलं पळवण्याच्या अफवा पसरल्या. प्रतापगडमध्ये मुलं पळवण्याच्या संशयावरून एका व्यक्तीवर जमाव एवढा तुटून पडला की, जमावाच्या तावडीतून तरुणाला बाहेर काढणं पोलिसांना कठीण झालं. जमावानं बळी घेतलेला तरुण हा मानसिक रुग्ण होता. जौनपूरमध्ये एका व्यक्तीला जमावानं पकडलं. मुलं पळवणारा असल्याच्या संशयातून जमावानं तरुणाला खांबाला बांधलं. अफवेची ताकद एवढी जास्त असते की, कधी कधी पोलीसही आपलं कर्तव्य विसरून जमावाचा भाग बनतात. महाराष्ट्राअगोदर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये लहान मुलांना पळवल्याच्या अफवांमुळे निरपराध लोकांच्या ‘मॉब लिंचिंग’च्या घटना घडल्या. उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये बाईकवरून एक जोडपं आपल्या मतिमंद मुलीला डॉक्टरांकडं घेऊन जात होतं. जमावानं त्यांनाही संशयावरुन बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशमधल्या बिजनौरमध्ये गावकऱ्यांनी एका महिलेला गावात खेळणाऱ्या मुलांकडे गेल्याच्या संशयावरून पकडलं आणि मारहाण केली. उत्तराखंडमधल्या उधमसिंगनगरमध्ये मुलं पळवण्याच्या संशयावरून शालेय विद्यार्थ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली; मात्र घटनास्थळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून तरुणाची विद्यार्थ्यांच्या तावडीतून सुटका केली. बिहारमध्येही मुलं पळवण्याच्या संशयावरून निरपराधांना जमावाने बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओ जवळपास रोजच व्हायरल होत आहेत. पाटण्यापासून मुझफ्फरपूरपर्यंत मुलं चोरीची अफवा खरी मानून जमाव रस्त्यावरच न्याय करण्यात गुंतला आहे आणि कायदा हातात घ्यायला घाबरत नाही. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये २५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये ‘मॉब लिंचिंग’च्या घटना घडल्या आहेत. ‘मॉब लिंचिंग’च्या आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी एकच अफवा का पसरत आहे आणि मॉब लिंचिंगच्या अशाच घटना का घडत आहेत, हेही समजून घ्यायला हवं. अफवा पसरवणाऱ्या या व्हायरल मेसेजेसमुळे लोक घाबरले आणि प्रत्येक अनोळखी व्यक्तीकडे चोर म्हणून पाहू लागले. एका संशोधनानुसार, मुलं पळवण्याच्या अफवेमुळे होणाऱ्या ‘मॉब लिंचिंग’च्या ७७ टक्के घटनांमध्ये ‘सोशल मीडिया’ हाच अफवेचा स्रोत आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, कोरोना महामारीच्या काळात जगात सर्वाधिक अफवा भारतात पसरल्या होत्या. अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की, भारतात बहुतांश लोक इंटरनेटचा वापर करतात, मात्र इंटरनेट साक्षरता खूपच कमी आहे. त्यामुळे भारतात अफवा सहज पसरतात. एके काळी गणेशमूर्ती दूध पित असल्याची अफवा पसरली होती.

मानसशास्त्रानुसार, लोक सत्यघटनेपेक्षा अफवेवर लवकर विश्वास ठेवतात. एका संशोधनानुसार, ‘सोशल मीडिया’वरील अफवा कोणत्याही खऱ्या बातमीपेक्षा सहापट वेगाने पसरते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्ञानाचा अभाव. त्यामुळे लोक दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्याही सत्य म्हणून स्वीकारतात आणि नंतर ही खोटी माहिती अफवा बनते. अफवा पसरण्याचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे समाजात पसरलेला गोंधळ. समाज जगात घडणार्‍या गोष्टींबद्दल संभ्रमात असतो आणि त्याबद्दल कोणतंही स्पष्ट मत बनवू शकत नाही, तेव्हा अफवा वेगानं पसरतात. चिंतेच्या आणि कुतुहलाच्या वातावरणात अफवा वाढतात. २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक जास्त चिंताग्रस्त किंवा उत्सुक असतात, ते अफवांना लवकर बळी पडतात आणि अफवा पसरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in